Tuesday, May 11, 2021

5 आधुनिक बलुतेदार

 *(५) *  *(आधुनिक बलुतेदार)*


          

असा पेपरवाला कितीजणांना भेटलाय... आजकालची तरुण पिढी इ-पेपरच वाचत असते. फक्त जेष्ठांना मात्र समोर पेपर हवा असतो, असं मला वाटतं, तेव्हां हा पेपर वाला त्यांना जास्त जवळचा वाटला असावा.


आतां आजच्या बलुतेदाराला भेटू. 


           *भाजीवाला*



पूर्वी प्रत्येकाच्या शेतांत थोडंफार माळवं असायचं. माळवं म्हणजे भाजीपाला, घराच्या परसांतही झाडं, वेली असायच्याच. त्यामुळे भाजी शक्यतोवर घरचीच असायची. इतरांच्या शेतांतील  वानवळा,वानोळा (नमुनाही) असायचा.

 त्यामुळे भाजीवाले हा प्रकार जवळपास नव्हताच. 


पण आतां...


दारावर भाजी घेऊन येणारे भाजीवाले किंवा भाजीवाल्या आपला मोठा प्रश्न सोडवणारे मदतनीस असतात. बाहेर जाऊन पायपीट न करावी लागता ते स्वतः मात्र पायपीट करून आपल्याला घरपोच भाजी आणुन देत असतात. वर्षानुवर्षे त्यांच्याकडून भाजी घेत गेलं कीं कोणत्या वेळेस कोणाला काय पाहिजे असते हे त्यांना बरोबर कळते. "घ्या ना ताई, तुमच्यासाठी मुद्दाम आणल्या बघा शेवग्याच्या शेंगा, ताज्या आहेत एकदम' असं म्हटलं कीं किती बरं वाटतं, पण त्याच वेळी ""एवढ्या महाग काय,जरा कमी कर, बाजारात तर स्वस्त मिळतात." अशी आपण जेव्हां घासाघीस करत असतो तेव्हां त्यांच्या डोक्यावर किंवा हातगाड्यावर भलं मोठं ओझं घेऊन ते उन्हांतान्हांत किती किलोमीटर पायपीट करतात हे आपण सोयीस्कर पणे नजरेआड करतो. आणि अशा किती तरी गोष्टी फिक्स रेट असलेल्या माँलसारख्या ठिकाणी निमुटपणे घेऊन टाकतो हे ही विसरून जातो.

   याऊलट एखाद्या वेळेस त्यांना चहा निदान थंड पाणी जरी देऊ केले,त्यांच्या घरच्यांची चौकशी केली तर त्यांच्या मनांत अगदी कृतकृत्य झाल्याची भावना निर्माण होते.आणि नेहमीसाठीच एक ऋणानुबंध तयार होतो.

       आतां आँनलाईनच्या काळांत तर याचा चांगलाच अनुभव येतोय.


- आतां पुढच्या बलुतेदाराची ओळख करून घेऊ… पुढच्या भागांत


सौ.भारती महाजन - रायबागकर

bharati.raibagkar@gmail.com

9763204334

Sunday, May 9, 2021

4 *आधुनिक बलुतेदार*

 *(4)*  *आधुनिक बलुतेदार*


याआधी आपण दूधवाल्याची नव्याने ओळख करून घेतली. आतां दुधाच्या पिशव्या मिळत असल्यामुळे ते किती फँटचं आहे हे वरूनच कळतं, त्यामुळे पाणी घालण्यापेक्षा फक्त उशिरा येणारा किंवा आधी सुचना न देता दूध देणारा एवढाच मुद्दा राहतो…


              *पेपरवाला*


      पूर्वी खेड्यांत घरोघरी कुणी पेपर वाचत नसत. जवळपास सर्वच जण निरक्षर असत. क्वचित दोन चार शिकलेल्या डोक्यांसाठी ग्रामपंचायतीतील हक्काचे पेपर असतंच.


आतां मात्र....

    असाच आपल्या कुटुंबाशी निगडित असलेला एक अपरिहार्य सदस्य म्हणजे पेपर टाकणारा... याच्यांत आणि दूधवाल्यांत खूप साम्य आहे. आपल्याला जसा सकाळचा चहा ताज्या दुधाचाच लागतो, तसाच त्या चहाची लज्जत वाढवण्यासाठी सोबत ताजा पेपर ही लागतो. मग भलेही आदल्या दिवशी त्या बातम्या टीव्हीवर बघितलेल्या असतील आणि त्याच त्याच,निरर्थक म्हणुन वैतागलेही असु.पण पेपर यायला जरासा उशीर झाला कीं आपल्या आत बाहेर फेर्‍या सुरू होतात आणि अशावेळी जर तो पेपर टाकणारा आपल्या तावडीत सांपडला कीं आपला भडिमार सुरु होतो तो अगदी, "बंद करून टाक पेपर उद्यापासून" येथपर्यंत येऊन थांबतो. बहुतेकदां ही मुलं अगदी पोरवयातील असतात. दूधवाल्या प्रमाणे त्यांनाही थंडीची, पावसाची पर्वा न करता पेपर भिजु नये याची काळजी घेत पहाटेच उठून पेपरचे गठ्ठे घेऊन फिरावं लागतं.नाहीतर मालकाची बोलणी ठरलेलीच,शिवाय कामावरून काढुन टाकण्याची टांगती तलवार. पण प्रत्येकालाच तो लवकर पेपर कसा देऊ शकेल हे आपल्या ध्यानांतच येत नाही.

     कांहीजण सकाळी पेपर टाकुन दुपारी शिक्षण घेत असतात. कारण बहुतेक जण गरीब परिस्थितीतीलच असतात. घराला हातभार लावण्यासाठी त्यांना अशी कांही कामं करावी लागतात. आणि कधीकधी मालक आणि गिऱ्हाईक म्हणजे आपण अशा दोघांची बोलणीही खावी लागतात.

मालकाला तर आपण कांही सांगु शकत नाही,तेव्हां आपणच थोडंसं संवेदनशीलतेने वागलो तर....


आतां ओळख करून घेऊ पुढच्या बलुतेदाराची… पुढच्या भागांत


सौ. भारती महाजन- रायबागकर

चेन्नई

9763204334

bharati.raibagkar@gmail.com

3 आधुनिक बलुतेदार

 *(३)*  *आधुनिक बलुतेदार*


याआधी  आपण बलुतेदारी बद्दल

वाचलं, आतां बघुयात *आधुनिक बलुतेदार*  कोण कोण आहेत ते...


           *दुधवाला*


 पूर्वी खेड्यांत घरोघरी गाई, म्हशी असायच्या, किमान एखादी शेळी

 तरी नक्कीच असायची. दूध क्वचितच विकत आणावं लागे. आणि परिस्थितीनुसार आणावं लागलंच तर ज्याच्या घरी मुबलक दूध त्यांच्या घरी जाऊन आणायचं ही पद्धत, त्यामुळे घरोघरी जाऊन दूध देणारा दुधवाला तेव्हां अस्तित्वात नसावा.  

        दूधवाल्याच्या हांकेबरोबरच बेल वाजते आणि आपण साखरझोपेतील स्वप्नांतून एकदम जागे होऊन वास्तवात येतो, स्वयंपाकघरांतुन भांडी घेऊन दार उघडतो, डोळे चोळत चोळत दुध घेतां घेतां भैयाला म्हणतो, ' इतनी जल्दी कायको आता हैं? हमारी नींद मोडती हैं ना! तो आपलं झोपेइतकंच मोडकं हिंदी ऐकुन म्हणतो," बहनजी, बाकी सब लोगों को भी ताजा दूध की ही चाय लगती हैं, इसलिये जल्दी आना पडता हैं, देर हो गई तो उनका भी मूड खराब होता हैं ना "असं म्हणत तो घाईघाईने पायऱ्या उतरून जातो सुद्धां.....

   संवयीप्रमाणे आपण स्वयंपाक घरात येऊन चहाचं आधण ठेवतो. मनाशी म्हणतो, आपल्यालाही ताज्या दुधाचा पहिला चहा लागतो नाहीतर अजिबात फ्रेश वाटत नाही. भैया उशिरा येऊन कसं चालेल! त्याला तर आपल्यासारख्या सगळ्यांच्याच वेळा सांभाळाव्या लागत असतील. एखादा दिवस तो उशिरा आला तर आपणच त्याला रागावत असतो. आपल्याला हसू येतं, खरंच आपला दिवस सुरू होतो दूधवाल्या पासून, आपल्याला वेळेवर दूध मिळावं म्हणून त्याला किती लवकर उठावं लागत असेल याचा विचार आपल्या डोक्यात कधीच येत नाही. आता दूधांत घालणाऱ्या पाण्याचं प्रमाण या विषयावर गृहिणी आणि दूधवाला यांच्यातील घरोघरी होणारा  संवाद हा एक मनोरंजनाचा विषय असतो…"इतना पानी कायकु डालता है दुधमे?बरं,डालता है तो बिसलरीका डालते जाव नं,हमारा पोट बिघडता नं…इ.इ.इ.

काय,बरोबर नं?


पुढच्या बलुतेदाराची ओळख...पुढील भागांत


सौ. भारती महाजन रायबागकर

चेन्नई

9763204334

bharati.raibagkar@gmail.com

अलक

 *अलक*


तिचा नवरा आठ-दहा दिवसांच्या दौऱ्यावर जातांच तिनं वहिनीला फोन करून बाबांना सांभाळायला सांगितलं आणि आईला एकटीलाच आपल्याकडे बोलावून घेतलं. आई आली आणि लगोलग पदर खोचुन म्हणाली,"तुला काय काय खायचं बोल, सगळ्ळं तुझ्या आवडीचं करून खाऊ घालते, आजकाल फारसं येणं होत नाही तुझं माहेरी." तसे आईचे दोन्ही हात धरून तिला अलगद झोपाळ्यावर बसवुन तिनं म्हटलं,"आतां तूंच निवांत बसायचं इथं. मी *तुझंच* माहेरपण करणार आहे.


आईनं मान वळवुन हलकेच डोळे टिपले.


 सौ. भारती महाजन- रायबागकर

चेन्नई

9763204334

bharati.raibagkar@gmail.com

Saturday, May 8, 2021

२ *आधुनिक बलुतेदार*

 *(२)*   *आधुनिक बलुतेदार* 


याआधी आपण लॉक डाऊनच्या काळांत कोण कोणत्या भूमिका निभावल्या ते पाहिलं...आतां पुढे......


 थोडक्यांत काय तर, 'तूं च तुझ्या जीवनाचा शिल्पकार' या धर्तीवर  शिल्पकार तर नाही, पण आपण आपलेच बलुतेदार झालो. आत्तांच्या पिढीला नाही तरी आमच्या पिढीला ऐकुन तरी नक्कीच माहीत असतील.

(मी तर अगदी छोट्याशा खेड्यांत राहून हा अनुभव घेतला आहे.)

 पूर्वी भारत हा 'भारतच' होता. त्याचा 'इंडिया' झाला नव्हता. कारण तेव्हां बव्हंशी जनता खेड्यांतच राहायची आणि त्यांचा मुख्य व्यवसाय शेती हाच होता. तेव्हां 'उत्तम शेती, मध्यम व्यवसाय, कनिष्ठ नोकरी' असाच समज होता. त्यामुळे बाकीचे गांवकरी आणि शेतकऱ्यांमध्ये अलिखित असा करार झालेला असे. गावात एखादं किराणा दुकान असे. जरा बरं, मोठ्ठसं गांव असलं तर एखादा सोनार, क्वचित एखादं कापड दुकान... बस्... पण लोहार, चांभार, सुतार, शिंपी, न्हावी,भटजी मात्र नक्कीच असत. आणि या सर्वांमध्ये एकमेकांशी कामाच्या बदल्यात धान्य...( आत्ताच्या भाषेत कॅशलेस म्हणता येईल काय )असाच व्यवहार चाले. वर्षभर शेतकऱ्यांचे मोट, पायतान दुरुस्त करणे, हजामत करून देणे, कपडे शिवणे, किराणामाल देणे, सोन्याचा दागिना घडवणे, शेतीची अवजारं नीट करणे इत्यादी इत्यादी कामं करून द्यायची. त्याबदल्यात पैशांऐवजी सुगीच्या दिवसांत शेतांतील खळ्यांत जाऊन कामाच्या प्रमाणांत धान्य घेऊन येणे असा व्यवहार चालायचा. याला *बलुतं* असं म्हणत आणि या लोकांना *बलुतेदार* असं नाव होतं. हे साधारण बारा असत.आतां खेडी ओस पडली, शेती ही बहुतांशी उजाड झाली. कनिष्ठ नोकरी उत्तम झाली आणि बलुतेदारी जवळजवळ लयाला गेली. पण जुनी बलुतेदारी जरी कालबाह्य झाली तरी नवे बलुतेदार मात्र नव्याने उदयाला आले. फक्त ते रोख पैसे घेऊनच आपली सेवा देतात. 


भेटायचंय कां तुम्हांला या सगळ्या बलुतेदारांना? मग ऊद्यापासुन एक एक करून येतील ही मंडळी…पण तेव्हां त्यांना पुरेसा मेहेनताना द्यायला विसरू नका हं...आणि मी त्यांना तुमच्या भेटीला आणलं म्हणुन मला…?☺️आपण सूज्ञ आहांत...(पुढील लेखांत)


सौ. भारती महाजन- रायबागकर

चेन्नई

9763204334

bharati.raibagkar@gmail.com

1 आधुनिक बलुतेदार

 आधुनिक बलुतेदार*


*(१)* काय म्हणता मंडळी ? मजेत ना?

असायलाच पाहिजे.( हसतांय ना च्या चालीवर) कारण आपलं तर ठरलंय...लाँकडाउन असो कीं मोकळीक, आनंद घ्यावा, आनंद द्यावा. (सुर नवा,ध्यास नवा)च्या चालीवर...


तर मंडळी, आतां मुद्यावर येते...

मागील लाँकडाउनच्या काळांत आपण कोण कोण झालो हे कळलं कां तुम्हांला? काय म्हणालांत? प्रश्न नाही समजला? अहो...म्हणजे आपण सर्वांनी यांपैकी कोणकोणत्या भूमिका निभावल्या?

भांडेवाली, झाडूवाली, कपडेवाली म्हणजे आपल्याकडे ही सर्व कामं बायाच करतात म्हणून...'वाली' (मुंबईसारख्या शहरांत रामागडी, बाल्या अशी  पुरुषमाणसं सुध्दां करतात ही कामं असं ऐकलंय हो) तर आणखी इस्त्रीवाला, स्वयंपाकी, स्वयंपाकीण इ.इ.इ.  ????


याच्या पुढचा खुलासा....नंतर


सौ. भारती महाजन- रायबागकर

चेन्नई

9763204334

bharati.raibagkar@gmail.com

Monday, October 27, 2014

"Jain Dharmiyanchi Diwali"

जैन धर्मीयांची दिवाळी

http://www.loksatta.com/chaturang-news/special-article-on-diwali-occasion-8-1034504/#.VE5MeX911ss.gmail