Monday, August 9, 2021

तिमिरातुन तेजाकडे

 

*तिमिरातुनी तेजाकडे*

हाती लेखणी देऊन
अंध:कार अज्ञानाचा
प्रकाशाने उजळेल
*लावु दिपक ज्ञानाचा*

दारिद्र्याने, नैराश्याने
जीवनेच्छा संपवती
द्रव्य, धीर मिळताच
*जगी सुखाने नांदती*

व्यसनाच्या गर्तेमध्ये
जाती संगतीच्या पायी
नको दु:स्वास तयांचा
*सावरावी तरूणाई*

भ्रष्टाचारी तुडविती
नीतिमूल्य पायदळी
नसो सहभाग त्यांत
*जन जीवन उजळी*

कन्या, जननी उदरी
घुसमटे तिमिरात
*जन्म ज्योत पणतीची*
काळोखाच्या गाभाऱ्यात

तत्त्वज्ञान आचरण
*दीप धर्माचा जगती*
निज-स्वरूप-दर्शन
साधेलच आत्मोन्नती

सौ.भारती महाजन-रायबागकर
चेन्नई
9763204334

Friday, August 6, 2021

दरी सांधु या

 *दरी सांधु या*


कमी करा पुस्तकांचे

ओझे बाल पाठीवरी

नच सुचला पर्याय

तज्ज्ञ हात वर करी


कधी मिळे बोजा ऐसा

दिसे डोळ्यांमध्ये भाव 

ललाटीच्या रेषांमध्ये

काय लेख? कोणा ठाव


जगण्याच्या लढाईस

गोळा करी ज्ञानकण

त्याच युद्धाच्या कारणे

कचर्‍यात वेचे धन


परस्परभिन्न मार्ग

दोन रेषा समांतर

कशा व्हाव्यात एकत्र

कसे मिटावे अंतर


ईश्वराला नको दोष

न्याय अन्याय अटळ

ज्याचे त्याला भोगायाचे

भलेबुरे कर्मफळ


बदलुया मन:स्थिती

यत्न नकोत तोकडे

दोघांतील *दरी सांधु*

घालु मनाला साकडे


सौ. भारती महाजन-रायबागकर

चेन्नई

९७६३२०४३३४

Wednesday, August 4, 2021

मी आणि ती

 *मी आणि ती*


*पाॅंडिचेरी…*


काळा कातळी किनारा...सरत्या पौषाचा सुखद गारवा... *रात्रीचा समय सरूनी येत उषःकाल हा...* अशी पंच पंच उष:कालची मंगल प्रभात...समोर अथांग दर्या…त्याच्या निळसर लाटा हळुवारपणे किनार्‍यावर येऊन, त्यापेक्षाही अलवारपणे परत जाताहेत...मंद, शितल वारा अंगावर शिरशिरी उठवतोय…

कातळापासून समुद्र जरासा खाली...त्यामुळे कधी लाटांकडे, कधी समोर बघत आम्ही पूर्वाभिमुख होऊन बसलोय...नि:स्तब्ध…मी...आणि… *ती*…


हळूहळू क्षितीजापासुन एक सुवर्णरेघ लांब लांब होत त्या रत्नाकराच्या मध्यापर्यंत येते...क्षितीजावरची केशरी शिंपण बाजुला सारून वर वर डोकावत येतोय...सुवर्ण गोल...सागरजलाची निळाई फिकट होतेय...त्यावर सुवर्णतेज चढतंय... मनातल्या सगळ्या विचारांचं धुकं विरत जाऊन ते निरभ्र होतंय...वरच्या आकाशा सारखंच…


प...ण...तिच्या मनांत काय असेल बरं... चेहऱ्यावरचे मिश्किल भाव पाहुन वाटतंय...


*दरिया किनारे एक बंगलो दे?*


*ती*...*समोरच्या* *तेजोमय उगवतीशी नातं सांगणारी…*


"चल उठुया?" *ती* हलकेच आधाराचा हात देऊन मला उठवते.


पुन्हा तेच कातळ...त्याच महासागरावरील, त्याच लाटांवर, तशीच सुवर्णआभा पसरलेली...निळ्या आकाशांत निसर्गाची तशीच रंगीबेरंगी चित्रकारी...पण आता त्यात मावळतीच्या धुसर सावल्यांचे सावळे रंग मिसळताहेत...आणि त्याच कातळावर बसलेल्या आम्ही दोघी...मी... आणि...*ती*...तशाच नि:स्तब्ध...स्वत:तच हरवलेल्या... आणि या संध्याछाया नातं सांगताहेत *माझ्याशी…*


*संधीकाली या अशा, रंगल्या दिशा दिशा*


सकाळच्या उत्साही लाटा आता धीरगंभीर वाटताहेत...त्यावर जणू कांही काळी शाई सांडलेली आहे...पण या जलधीची

मोहिनी मात्र तश्शीच...सकाळ इतकीच…


"चल उठुया?" जपुन... *तिचा*  आधाराचा हात आणखीनच घट्ट…


आज सुट्टीचा दिवस...पर्यटकांची अलोट गर्दी...आणि कळत नकळत...जाणवेल न जाणवेलसा...माझ्या नजरेचा पहारा...छे, छे, सुरक्षा कवच...तिच्याभोवती...


असे तब्बल एक नाही...दोन नाही...तीन वेळा उषेशी आणि  संध्येशी मनमुक्त भेटी…मी आणि *ती*…

दोघीही तृप्त...


आज त्याचा निरोप घ्यायचाय…


*जीवनात ही घडी अशीच राहू दे*


 असं वाटत असलं तरी…*


कारण... त्या तृप्ततेतही थोडंसं असमाधान टोचतंय...अखेर मानवी मनंच ते...कितीही दिलं तरी समाधान मुळी नाहीच...वाळुत किल्ला बांधायची हौस कुठे पूर्ण झालीय अजुन...? शिवाय मुक्कामाच्या ठिकाणाहुनही अविरत दिसत असलं तरी हे तर फक्त दूरदर्शनच होतं त्या पयोनिधीचं...किमान पावलांना तरी त्याचा उबदार स्पर्श व्हावा याची आस होतीच मनीं…


पण महर्षी अरविंदांसारख्या महान  व्यक्तीच्या पावन सानिध्याने पुनीत झालेल्या ह्या जलसिंधुला मात्र आप ल्यासारख्यांचे मलिन पाय त्याच्या पवित्र जलात भिजवावे असं वाटत नसेल...म्हणुन तर त्याने किनाऱ्यापासुन जरासं अंतर राखलं असावं…?


 म...ग?


*चलो महाबलीपुरम…*


उतरत चाललेल्या संध्याकाळच्या गडद छाया...पाॅंडिचेरीला दुरूनच पाहीलेल्या सागराचा आत्ता निदान पायाला तरी स्पर्श व्हावा म्हणुन आसुसलेल्या आम्ही...घेतली धाव त्याच्याकडे...पण...हाय...

निरव शब्दाने सुद्धा ती गुढ, गंभीर शांतता भंग पावेल असा माहोल...तरीही आमची मऊसुत वाळुत बैठक... पुन्हा एकदा दूरदर्शन...मी...आणि...*ती*…


अमावस्येची रात्र...वर आकाशगंगा नक्षत्रांचा चांदणचुरा  ऊधळुन दिमाखात आपली काळी चंद्रकळा मिरवतेय...आणि खाली आम्ही भारलेल्या...मंत्रमुग्ध...किती दिवसांनी बघितलं होतं बरं असं विशुध्द चांदणं...शांततेच्या ह्या मैफिलीत लाटांच्या आरोह-अवरोहांची सुरेल गाज..‌.अविस्मरणीय अनुभूती…वर्णन करायला शब्दसंपदा तोकडी पडतेय...


"चल, उठू या?" पुन्हा तोच आधाराचा हात...


प्रसन्न सकाळ...उतरता सागर किनारा... भरतीच्या लाटांच्या ओढीचे अनामिक भय...त्यामुळे पाऊलस्नानाचा जेमतेम उपचार...आणि मग…आतापर्यंतच्या गांभीर्याचं वलय बाजूला सारून अखंड बडबड करत, हसत-खेळत, वय विसरून वाळूत घर बांधणाऱ्या आम्ही दोघी...शंख शिंपल्यांची सजावट, आणि वाळूत कोरलेली आमची नांवं... 


आली...आली...एक मोठ्ठी लाट...आणि बघता बघता आमचं वाळूचं घर भुईसपाट...माझं हळहळणं...


"समुद्र काय सांगतो आपल्याला?"

*ती*…


"माझ्यासारखं विशाल ह्रदय ठेव…" हळहळ मनाच्या एकदम कोपऱ्यात ढकलून माझं धीर गंभीर वयाला साजेसं पोक्त उत्तर…


"आणि कुठल्याही संकटाला हसत हसत तोंड द्यावं…" *तिची वयाला साजेशी? पुस्ती*... 


"चला, निघायचं?"


अरेच्चा! *ती* म्हणजे कोण विचारतांय…?


*समान-शीले-व्यसनेषु सख्यम्...*


*कल्पनेच्या कुंचल्याने स्वप्नात रंग भरण्यासाठी…*


सागराच्या ओढीने आलेलो आम्ही दोघी...


*ती* म्हणजे…पुष्पकोशाचे अवगुंठन हलकेच बाजुला सारून, वार्‍याच्या झुळकीने इकडेतिकडे झुलत, उमलती मुग्ध कलिका...

*माझी दुधावरची साय!*


सौ.भारती महाजन-रायबागकर

 चेन्नई

९७६३२०४३३४.

Friday, July 30, 2021

नामी युक्ती

 नामी युक्ती


आज्जी कां गं रुसलीस?

डोळ्यांत कां गं पाणी?

अंगणी झोक्यावर एकटीच

बसलीस बापुडवाणी


आईचं नि तुझं आज 

भांडण झालं काय?

मला नाही सांगणार?

मी तुझ्या दुधावरची साय


आईचं बोलणं कधीच फार

मनांवर नको घेऊ 

आत्तां हाक मारेल तुला

'चला लवकर, जेऊन घेऊ'


ऑफिस आणि घर, 

वैतागुन जाते फार

मनांत मात्र जाणीव असते,

तुझा कित्ती आधार


गोष्ट सांगतेस परीची?

कीं खेळायचा खेळ

बोल ना कांहीतरी आतां, 

होउ दे तुझा माझा मेळ


आई शेजारच्या काकुला,

मघाशी सांगत होती बाई

सासुबाई सांगण्यापुरत्या,

आहेत माझी दुसरी आई


आजी म्हणे"थांब" तिच्या

आवडीची भाजी करते मी

रुसवा घालवण्यासाठी 

कशी केली युक्ती नामी



सौ.भारती महाजन-रायबागकर

चेन्नई

९७६३२०४३३४


Thursday, July 29, 2021

पुन्हा तुझाच पुकारा

 *पुन्हा तुझाच पुकारा*


तप्त होऊनी अवनीचा

उष्ण, श्वास-नि:श्वास

गंध ओल्या मातीचा

मन भरून घेता खास


धसमुसळ्या जलदांनी

अत्तर कुप्या लवंडल्या

भांडणांचा लाभ आम्हां

मनकुंभ भरुनी गेल्या


साठवण? नसे युक्ती

निरंतर अनुभूती घेण्यास

धरा तावून-सुलाखून

तेव्हांच मिळे हमखास


असे अद्भुत रसायन

कस्तुरी सुवास अहा!

हस्तलाघव निसर्गाचे

*एकस्व* घेतले पहा


आलबेल असता, कवतिक

संगम महाप्रलयात

खारं पाणी डोळ्यांतलं

मिसळलं निष्ठुर गोड्यात 


आतां गंध नकोसा ओला

स्पर्शही उठवी शहारा

पण रखरखत्या वाळवंटी

*पुन्हा तुझाच पुकारा!*


सौ. भारती महाजन रायबागकर

 चेन्नई

९७६३२०४३३४

Wednesday, July 28, 2021

ज्ञानाई

 ज्ञानाई


शाळा आमची फारच भारी

व्ही.जे. हायस्कुल तिचं नांव

दुमजली, दगडी, देखणी इमारत

शंभरावर वय, तालुका नांदगाव


नदीकाठी, मोठ्ठे, मोकळे मैदान

विज्ञानासाठी सुसज्ज प्रयोगशाळा

खो-खो, लंगडी, हुतुतू, पळापळी

हवं तेवढं, हवं ते, भरपुर खेळा


शाळेमध्ये मिळाल्या कितीक

जिवलग मित्र मैत्रिणी

कलागुणांना वाव मिळतसे

वार्षिक स्नेहसंमेलनांनी 


थोर थोर गुरूजन आमचे 

ज्ञानदानाची तळमळ

आयुष्य-रणांगणी सोडिले

शहाणे करून सकळ


अशी आमची आवडती शाळा 

विद्यार्थ्यांसाठी *ज्ञानाई*

स्मरणरंजन-अंजुली वाहते

कृतज्ञतेने तिच्यापायी


सौ.भारती महाजन-रायबागकर

चेन्नई, 

9763204334

Tuesday, July 27, 2021

नवोढा ते माता

 - *नवोढा ते माता*


आज जणू धरित्रीचा

विवाह सोहळा

रंगीबेरंगी फुलांच्या

घाली पुष्पमाळा


हिरवा शालू नेसली

निर्झरांचे चाळ 

आरस्पानी जलबिंदु

मौक्तिकांची माळ


पाखरांची किलबिल

मयूर नर्तन

निसर्गाच्या वऱ्हाड्यांचे 

प्रसन्न वर्तन


मीलन होईल जेव्हां

भूमी पर्जन्याचे

मनमोर आनंदाने

थुई थुई नाचे


फुलारुन आली धरा

रोमांचित झाली

आला साजण भेटाया

नवा साज ल्याली


रत्नगर्भेचा शृंगार

सोज्वळ, सात्विक

फलश्रुती, तरारेल

बीजं-बाळं-पीक


नवोढा वसुंधरेला

मातेचा सन्मान 

पृथ्वीमाय प्रसवेल

भरघोस धान


सौ.भारती महाजन-रायबागकर

चेन्नई