Wednesday, June 2, 2021

30. आधुनिक बलुतेदार

 *30*     *आधुनिक बलुतेदार*


 नवीन भांडी घेऊन आलो. आणि ती लगेच वापरण्याचा मोह तर होणारच. म्हणून लगबगीनं स्वयंपाक करायला जावं तर... डब्यात कणिक पीठ काहीच नाही. आतां.... काय म्हणता...? नुसता भात किंवा खिचडी करून खायची...! छे...ते! आपल्या नाही बुवा पोट भरत तेवढ्यांन... पोळी भाकरी पाहिजे म्हणजे पाहिजेच... त्यासाठीच तर...


 पहिली माजी ववी ग। 

द्येवा पांडुरंगाला।।

उदंड आऊक्ष लाभू दे।

कपाळीच्या कुक्काला


दुसरी माजी ववी ग।

माझ्या धुरपतीला।।

ल्येक आली म्हायेराला।

पंचिमीच्या सनाला


जात्याच्या घरघरीत आपला सूर मिसळून पुराणांतल्या, इतिहासातल्या, संसारातल्या घटनांची, नात्यांची सांगड घालुन, ओव्या म्हणत दळणाचे श्रम हलके करणाऱ्या ग्रामीण स्त्रिया आतां आतांपर्यंत दिसायच्या. पहाटेच्या पवित्र वातावरणांत त्या सुरांनी पहाट मंगलमय होऊन जायची. पण हे कानांना कितीही गोड लागत असलं आणि व्यायाम- बियाम होऊन शरीर काटक, घाटदार होतं हे कितीही खरं असलं तरी आता ऐकायला रेडीओ,  मोबाईलवरचं प्रभात संगीत असतं आणि व्यायामाचं म्हणाल तर त्यांना इतर कामं काय थोडी असतात होय? आणि शहरांत जर गिरण्या किंवा रेडिमेड आटा वापरला जातो तर ग्रामीण स्त्रियांनी तरी जात्यावर दळण्याचे कष्ट कां करायचे?(आणि व्यायामासाठी जिम असतंच कीं... शहरांत)


 बरोब्बर! आजचा बलुतेदार आहे...


*पिठाची गिरणीवाला*


पीठ, कणिक ही तर आपली अत्यावश्यक दैनंदिन गरज. ते घरचं असो, गिरणीचं असो किंवा रेडिमेड. आपला एक दिवसही त्यावाचुन निभणार नाही. मग पिठाच्या गिरण्या सुरू होणं तर अपरिहार्य! एक छोटासा गाळा असला की पुरे! मग तेथे पांढरट दगडाचं मोठं जातं, ते चालवण्यासाठी मोटार, त्याला आणि धान्य टाकायच्या यंत्राला जोडणारा एक रुंद पट्टा, धान्य टाकण्यासाठी एक गोल, मोठ्या तोंडाचं पत्र्याचं नळकांड्या सारखं भांडं आणि खालच्या बाजूला दळलेलं पीठ पडण्यासाठी एक रुंदसं तोंड.


पूर्वी ही गिरणी डिझेलवर चालायची. तिचा फक् फक् असा वेगळाच आवाज यायचा. एखादी बाई बापडी दळण घेऊन यायची आणि म्हणायची, 


 "दादा, अर्जंट पायजेल बग, पीट न्हाई घरात आन् पाव्हनं यिवुनश्यान बसल्यात". 


त्यावर तो नाईलाजानं म्हणायचा, 


"ते समदं खरं आहे,पण डिजल संपलंय, काय करू मग!"त्यावर


"अरे द्येवा! आता उसनवारी कराया पायजेल"


असं म्हणून ती हताशपणे निघून जाई. 


हळूहळू अपवाद सोडले तर खेड्यापाड्यातही वीज आली. आणि गिरण्या विजेवर चालू लागल्या. आता डिझेल सारखी तीही संपतेच कधीकधी. संपते म्हणजे येणं-जाणं हा लपंडाव चालूच असतो ना! लोडशेडिंगच्या काळांत तर वीज असण्याच्या वेळी त्या गिरणीवाल्या वरच अधिक लोड असतो. कारण सगळ्यांनाच लवकर पीठ हवं असतं. 


बरं त्यांतही गहू, बाजरी, ज्वारी, हरभरा दाळ असे विविध प्रकार आणि ते एकाच घरचे असले तर मग आणखीच पंचाईत. कारण पुढच्या नंबरच्या गिर्‍हाईकाला गव्हांवर गहूच दळुन हवे असतात. मग पहिल्या नंबरचे ज्वारी, डाळ इत्यादी इत्यादी साईड ट्रॅकवर पडतात. असे पुढचे नंबर जितके जास्त तितके हात चोळत, चरफडत बसण्याचा वेळ जास्त.

कारण आपल्याला आपल्यासमोरच दळण दळून हवं असतं नं! नाहीतर पीठ जाड, बारीक तरी व्हायचं किंवा पीठ खाल्ल्याचा (शब्दशः) तरी संशय असतो. अखेर 

"तुझ्या सवडीनं ठेव दादा दळून, नंतर येऊन नेता येईल, कामं पडलीत माझी" असं म्हणत आपण रागारागांत निघून जातो. आणि गिरणीवाला त्या समोरच्या गिर्‍हाईकाला म्हणतो,

"आतां मी चार धान्यांच्या चार गिरण्या लावु कां काय? एकाचं ऐकावं तर एक नाराज होतो. भाव वाढवला तर मात्र सर्वजण कुरकुर करतात. मला पण पोट आहे कीं नाही?"


पिठाचं जाड-बारीक पण हा तर नेहमीच वादाचा मुद्दा असतो.एखादेवेळेस आपल्याशिवाय म्हणजे (आपणच,) दुसरं कोणी गेलं तर... 

"लक्ष कुठे होतं? कुठे गेले होते? त्या मोबाईल मध्ये डोकं घालून बसले असाल...आतां ह्या जाड पीठाच्या पोळ्या नाही, रोटले करून खाऊ घालते जाडजाड"

असा शाब्दिक आहेर मिळतो.


कधी हरभरा डाळ कितीही गरम करून नेली तरी तो हात लावून म्हणणार,

"सादळली आहे, आतां नाही दळल्या जाणार, पुन्हा गरम करून आणा."

'आता काय शेगडी घेऊन येऊ इथे' 

असं आपण  म्हणतो (अर्थात...मनांतल्या मनांत) अशावेळी आपलं डोकं मात्र नको गरम व्हायला.


आतां कितीतरी कंपन्यांचा रेडीमेड आटा जरी मिळत असला  

आणि *घर के चक्की जैसा आटा* अशी कितीही भलामण करत असले तरी तो नाइलाज म्हणूनच वापरला जातो. कधी गिरणी जवळ नसते, कधी आपल्याला वेळ नसतो, कधी गहू मिळत नाहीत अशी अनेक कारणं असतात.


यावर उपाय म्हणून आता घरघंट्या उपलब्ध झाल्याहेत. अगदी एका स्टुलच्या आकारापासुन ते एखाद्या छोट्याशा टेबलाच्या आकारापर्यंत जागेच्या उपलब्धतेनुसार त्या आपल्याला घेता येतात. पण त्या साफ करण्याची ही कटकट नको म्हणून रेडीमेड आटा घेणारे आहेतच. शिवाय हेही काम बहुतांशी स्त्रियांनाच करावं लागतं.अपवाद सोडा.


सैन्य पोटावर चालते असं म्हणतात. त्यांच्या पोटासाठी टनावारी पीठ दळण्यासाठी काय वापरत असावेत बरं! मला फक्त औरंगाबादची पाणचक्की तेवढी माहित आहे.


तर असा हा गिरणीवाला...दिवसभर ते बारीक पीठाचे कण नाकातोंडावाटे शरीरांत जाऊन त्याला अपाय तर होत नसेल? पीठ उडू नये म्हणून गिरणीच्या तोंडाला एक कपडा बांधलेला असायचा. तसं कांही तो तेव्हां *आपल्या* तोंडाला बांधत नसे. *आतां*?  


जातां जातां एक गंमत... मी लहानपणी रावळगाव चॉकलेट फॅक्टरी गेले होते. तेथे अशा गिरणी सारख्या यंत्रातुन वरून कोरडे मिश्रण टाकल्यावर खालुन मिंटच्या चौकोनी गोळ्या पडतांना पाहिल्या होत्या.


 मनात आलं...वरून पीठ टाकुन खालुन आपोआप तयार पोळ्या मिळणारं *छोटसं घरगुती यंत्र* आलं तर...


सौ. भारती महाजन- रायबागकर

bharati.raibagkar@gmail.com

9763204334

4 comments:

  1. मस्त., वरून पीठ टाकून खालून आपोआप तयार पोळ्या मिळणारं छोटसं घरगुती यंत्र... सुंदर कल्पना...

    ReplyDelete
  2. कधी अमलात येणार पण
    धन्यवाद

    ReplyDelete
    Replies
    1. Aahe asa machine pan Bharatat nahiye. . . Khup chan lihilai . . Giraniwala ubha rahila dolyasamor

      Delete
  3. पण आपण भारतात रहातोय नं
    आपल्याला माझं लिखाण आवडलं,धन्यवाद

    ReplyDelete