Friday, June 25, 2021

आधुनिक सावित्री, तळ्यांत- मळ्यांत

    *आधुनिक सावित्री* 


      शीर्षक- *तळ्यांत मळ्यांत*


सत्यवान-सावित्रीची कथा आपण

वर्षानुवर्षे विश्वासानं ऐकतोय. आणि त्याच श्रद्धेनं दरवर्षी वटवृक्षाला फेरेही न चुकता नेमानं मारतोय.


त्या वटपर्णांच्या प्राणवायूतून तिच्या पतीला नवसंजीवन मिळाले

आणि फक्त त्या *एकाच* यमाचे आवळलेले करपाश सुटले.


 पण यमही आतां निरनिराळ्या भयंकर रूपांत सामोरा येतोय.

अपघात, घातपात, हार्टअटॅक, कॅन्सर 

ही अशी तर नित्याचीच रूपं...

पण किडनी फेल होण्यासारखे असाध्य जीवघेणे रोग, आणि आत्ताचं साध्या स्पर्शालाही महाग झाल्याने हतबल करणारं, भयंकर जीवघेणं संकट...

ही सुद्धां त्या यमाचीच आणखी कांही अक्राळविक्राळ रूपं!


शिवाय आज जिवंत वटवृक्ष सांपडतात कुठे सहजासहजी?

आणि सांपडलाच एखादा

तर...त्याच्यामुळे

आत्तांच्या या यमाचं कां...ही वाकडं होत नाही बरं!


मग स्वतःचा देह हाच एक वटवृक्ष असतो तिच्यापाशी.

आणि त्यातील तिची किडनी म्हणजे जणूं त्याचा बहि:श्चर प्राण...


पूर्वी नाही कां जादूच्या गोष्टींत राक्षसाचे प्राण दुसऱ्याच एखाद्या गोष्टीत सुरक्षित असायचे.

फरक एवढाच की तेव्हां राक्षसाचे प्राण हरण करायचे असत, आतां पती परमेश्वराचे प्राण वाचवायची पराकाष्ठा करायचीअसते. त्यासाठी वडाच्या नव्हे, दवाखान्याच्या फेऱ्या माराव्या लागतात

आणि स्वतःची किडनी कर्तव्यभावनेनं दान करावी लागते. 


कधी घरावर आर्थिक संकट येतं, पण ही सावित्री डगमगत नाही. वेळ प्रसंगी आपलं स्त्री-धन सहजतेने पुढे करते. शारीरिक कष्ट करायला तर मागे पुढे पाहतच नाही पण मानसिक आधारही देऊन घराचा भक्कम आधारस्तंभ  बनते.


पण आजची सावित्रीबाई फुल्यांची लेक आचार विचारांनी आधुनिक झालेली असली तरीही तिच्या अंतरंगात रुढी, परंपरा यांची मूळं खोल रुजली आहेत. त्यामुळे दोन्ही डगरींवर हात ठेवतांना ती संभ्रमावस्थेत असतांना दिसते. नाहीतर पर्यावरणाचं महत्त्व मनांवर बिंबवत असतांनाच कधी घरच्यांच्या दबावामुळे, कधी 'लोक काय म्हणतील' ह्या सनातन बागुलबुवामुळे तर कधी स्वतःच्याच दोलायमान अवस्थेमुळे ती 'तळ्यांत-मळ्यांत' करून निसर्गाचं नुकसान करतांना दिसली नसती. कळतंय पण वळत नाही...


कित्येकदा पती दुर्गुणांचा पुतळा असतो. पण स्त्रीने मात्र सद्गगुणांची पुतळी असण्याची अपेक्षा असते. आणि पुष्कळदा ती तशी असतेही. कारण *न स्त्रीं स्वातंत्र्यमर्हती* हे मनुवचन मनोभावे पाळणारी आपली आदर्श पुरूषप्रधान संस्कृती. यांत अशिक्षितांबरोबरच सुशिक्षित पुरुषही मागे नसतात आणि हा त्रास सहन करूनही *सात जन्म हाच पती मिळो* अशी प्रार्थना करणाऱ्या स्त्रियांतही हा भेद दिसत नाही हे विशेष.( तो मिळतो कीं नाही हा भाग अलाहिदा)


भारतीय संस्कृती  खरोखरच महान आहे. आपल्या पूर्वजांनी विचारपूर्वक सणं, व्रतवैकल्यं यांचा काळ ठरवला आहे. त्यांचं तंतोतंत पालन केलं नाही तरीही त्यातलं मर्म जाणुन घ्यावं.  आपण भारतीय देवभोळे, नाही केलं तर तो *दयाघन*  कोपेल ही आपली (अंध)श्रद्धा,  म्हणुन त्याला धार्मिकतेची जोड दिली एवढेच.


आणि हे सर्व वटपौर्णिमे पुरतंच मर्यादित न ठेवता नेहमी पर्यावरण पुरकच दृष्टिकोन ठेवुन,प्रदुषण टाळुन निसर्गाचं संवर्धन केलं पाहिजे. 


म्हणजे आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य मागतांना ते निरामयच असेल आणि पुढच्या पिढीसाठीही हा निसर्गाचा ठेवा राखुन ठेवला तरच आपली व्रतवैकल्यं सार्थकी लागतील.


एकंदरीत अशा कितीतरी सावित्री जगत आहेत आज

मुक्या ओठांनी,अबोलपणे, आपल्या भरलेल्या कपाळासाठी...


सांगा, कुठल्या पुराणात नोंद होईल त्यांच्या नांवाची...

कुठला इतिहास दखल घेईल त्यांच्या त्यागाची...


आणि आणखी एक मनाला छळणारा अनुत्तरीत प्रश्न

तसाच प्रसंग आला...तर...


किती सत्यवान उभे राहतील पाठी...

आपल्या जन्म सावित्री साठी!


सौ. भारती महाजन -

रायबागकर, चेन्नई


२५-६-२१


No comments:

Post a Comment