Thursday, June 3, 2021

31 आधुनिक बलुतेदार

 *31*   *आधुनिक बलुतेदार*


पीठ दळुन आणलं, स्वयंपाक झाला, जेवणावर भरपेट तावही मारून झाला, आतां...? आतां काय... किती उशीर झालाय एवढी सगळी उठाठेव करतांना...बाहेर जेवायला नक्को म्हणे...मग आतां निद्रादेवीची आराधना करायची...पण हे काय...!ही गादी अशी काय टोचतेय पाठीला! च्च...कापूस गोळा झालाय वाटतं...नाहीतरी खूपच जुन्या झाला होत्या गाद्या...आणि आतां सगळंच नवीन आणलंय तर गाद्याही नवीनच कराव्यात...कसं...


                 *गादीघर वाला*


पूर्वीचं आठवतं? सगळ्यांनाच नाही आठवणार. लहान गावांत बायका दुपारच्या जराश्या निवांत वेळी अंगणात गोधड्या शिवत बसलेल्या दिसायच्या. अर्थात या निवांत बायका म्हणजे ज्यांना शेतात जाणं शक्य नसायचं अशा वयस्कर बायका. 

गोधडी म्हणजे जुनी, सुती,२-३ नऊवारी लुगडीं गोधडीच्या आकाराप्रमाणे एकाआत एक नीट घडी घालून ती जमिनीवर अंथरायची  आणि जाड दोऱ्याने त्यावर सुबक धावदोरा घालायचा. ह्याच गोधड्या मातीच्या जमिनीवर झोपतांना सर्वसामान्य माणसांच्या अंथरूण आणि पांघरून म्हणूनही कामी यायच्या. तालेवाराकडे क्वचित गाद्या असायच्या.

आता शहरांत मातीच्या जमिनीही नाहीत आणि सहसा जमिनीवर कोणी झोपतही नाही. लोखंडी पलंग, लाकडी दिवाणावर झोपण्यासाठी गाद्यांची आवश्यकता अपरिहार्य झाली. आणि साहजिकच गादीघरवाला हा नवा बलुतेदार उदयास आला.

पूर्वीही कापूस पिंजून घ्यायचे. आधी एक धनुकली घेऊन, नंतर हात गाडीवर यंत्र लावून घरोघरी जाऊन  *आपल्याच अंगणात* कापूस पिंजून देत असत. आता अंगणही नाही आणि म्हणुन ते दारावर येऊन पिंजून देणारेही नाहीत. म्हणून हळूहळू इतरांप्रमाणे  यांनीही आपली दुकानं थाटली आणि आतां त्यांच्याच  *अंगणात* आपल्याला गाद्या भरायला जावं लागतं. *अमुक गादी घर* अशी पाटी दुकानांवर झळकू लागली. झळकते कसली! कापसाचे तंतू उडुन झाकोळलेली असते खरं तर. 

एखादा दुकानाचा गाळा...बाहेर आठ-दहा गाद्यांची थप्पी, एका बाजूला थोडेफार गादीच्या कापडाचे तागे, वर टांगलेल्या ऊशा, आणि एका बाजूला गाद्या-ऊशांच्या खोळी शिवण्यासाठी मशीन असे साधारण त्या दुकानाचे दर्शनी स्वरूप असते.

मागच्या भिंतीशी कापूस पिंजायचे यंत्र आणि  *माळ्यावर कापसाने भरलेली पोती*  ठेवलेली असतात. आणि कापसाचे बारीक तंतू आणि कचऱ्याचे कण बाहेर उडुन येऊ नयेत म्हणून एखाद्या कापडाचा किंवा बारदानाचा पडदा लावलेला असतो. बारदान म्हणजे विरळ विणीचं पोतं किंवा फारी किंवा किंतान.

या दुकानाच्या बाहेर रस्त्यावरच एखादं बेडशीट किंवा बारदान टाकून  एक दोन कारागीर एखाद्या गादीला टाके घालत बसलेले असतात किंवा ती पूर्ण झाल्यावर तिच्यावर काठीने धोपटुन आंतील कापुस एकसारखा पसरवत असतात. अशावेळी या सर्वांच्या तोंडाला कपडा बांधलेला असतोच असंही नाही.

आपण आपली गादी त्याच्याकडे घेऊन जातो. एकदा तिच्याकडे पाहून तो गादीच्या आकाराप्रमाणे (सिंगल बेड-डबल बेड) प्रकाराप्रमाणे (साधी- बॉक्स टाईप)  साधारण दोन चार दिवसांची मुदत सांगतो. अशावेळी आपण एकाच वेळी सर्व काम एकदाच करून घेऊ या विचाराने जर घरांतील सर्वच गाद्या एकदम घेऊन गेलो तर मग तोपर्यंत झोपायचं कशावर हा प्रश्न पडतो. आणि कांही पर्याय नसला तर त्यांतल्या त्यात लवकर देण्याची विनंती करून सतरंजीवर झोपण्याचा पर्याय स्वीकारतो. अशावेळी पाठदुखी साठी सतरंजीच बरी असंही आपल्या मनाला घरातल्या सर्वांना पटवुन देतो.

कधी तो आपल्या गाद्यांचा कपडा पाहून म्हणतो,

“पुराना हो गया है साब, बनाते बनातेही फट जायेगा, खाली पिली नुसकान, देखो अपने पास बढीया कपडा है, एकदम फस्क्लास, बोलो कौनसा दू?”

आपण एकदा गाद्यांकडे आणि एकदा त्याच्याकडे,मग गाद्यांच्या कपड्याकडे बघतो. आणि निघतांना घरून दिलेल्या  "नीट लक्ष द्या, कापसाची अदलाबदल होऊ देऊ नका, कपडा चांगला आहे गाद्यांचा, उगीच नव्याचा खर्च नको आत्तांच, अन् हो...समोर बसूनच भरून घ्या गाद्या...कितीही वेळ लागला तरी... इत्यादी इत्यादी ह्या ढिगभर सूचना आठवताच क्षणभर 

'नको नको हाच राहू दे कपडा' असं म्हणावं वाटत असतांनाच...तो म्हणतो,

“ठीक है साब, भरता हू इसमेच” पण ह्या त्यांच्या प्रकट वाक्याबरोबर आपल्याला 'मेरा क्या, मेरा फायदाच है इसमे' हे स्वगत ऐकू येते. आणि आपण नवा कपडा घेऊन टाकतो.

कधीकधी कापसाबाबतीतही असंच होतं. त्याच्या जवळच्या रेडिमेड गाद्या चांगल्या कापसाच्या नसतील अशी खात्रीच असल्यामुळे आपण त्या पसंत करत नाही. शिवाय आपल्याला फसवून तो आपला चांगला कापूस बदलून कमी प्रतीचा भरेल अशी सार्थ भीती वाटत असते. मग आपण 'किती छान झोप लागेल यावर' अशी दिवास्वप्नं पहात त्याच्याकडचा अगदी उच्च प्रतीचा कापूस महाग असला तरीही घेतो. आणि आपल्या समोरच गाद्या उशा भरून दे असा आग्रह करतो. आपल्या कामाची आणि त्याच्या वेळाची सांगड जमली तर तो तयारही होतो. आपण बाजी मारल्याच्या समाधानानं बाहेरच्या खुर्चीवर, बाकड्यावर, कधी पायरीवर सुद्धा ठिय्या मारून बसतो.  आणि बाहेर जर गादीला टाके घालणं चालू असेल तर आपण मन लावून ते काम बघत बसतो. पण गादी धोपटणं चालू असेल तर मात्र शेजारच्या एखाद्या पायरीचा आसरा घ्यावा लागतो. पण... *परदे के पीछे क्या है*  हे आपल्याला कुठे माहीत असतं! काही दिवसांतच गादी-उशीला टेंगळं येऊन आपल्याला ॲक्युप्रेशरचा मस्त फिल येतो. मुफ्तमें इलाज! किंवा एखादा लोड, ऊशी जर काही कारणाने उस वावी लागली किंवा फाटली तर काय दिसतं...बरोब्बर! वरवर आपला चांगला कापूस आणि आंत मध्ये...?

*माळ्यावरील कापसाच्या पोत्यांचं रहस्य*  आत्तां उलगडतं...पण आतां काय करणार!

अशावेळी आपल्या भ्रमाचा भोपळा फटकन फुटतो. बरं तेवढ्यासाठी ते सगळं ओझं त्याच्याकडे घेऊन त्याच्या पदरांत त्याचं माप घालणं शक्यच नसतं. किंवा नुसतंच जाऊन त्याला जाब विचारणं...? काय उपयोग! त्यापेक्षा घरचा आहेर गपगुमान स्वीकारावा हे उत्तम.

डनलाॅपच्या गाद्या तर आपल्या आरोग्यासाठी चांगल्या नसतात असं आपलं ठाम मत असतं. मग...?

मग काय...?

 *भरे जैसी गादी। तैशी नीज घ्यावी*

     *कुस पालटावी । वारंवार*


सौ.भारती महाजन-रायबागकर 

bharati.raibagkar@gmail.com

9763204334

      

4 comments:

  1. छान, मस्तच रंगवला आहे गादीवाला

    ReplyDelete
  2. आपला अनुभव काय आहे?
    धन्यवाद.

    ReplyDelete
  3. खूपच छान भारतीताई

    ReplyDelete
  4. खूप खूप धन्यवाद

    ReplyDelete