Saturday, July 17, 2021

मन हीच पंढरी

 मन हीच पंढरी


 *विठ्ठल नामांत | झाले मी दंग*

*हरी पांडुरंग मुखे | हरी पांडुरंग*


"ए...शुक्...शुक्..."


"कोण आहे ती शुक् शुक् करणारी..." कमळा असेल शेजारची...आली असेल सुनेचं गाऱ्हाणं करायला रोजच्या सारखी...दिसत नाही कां मी विठ्ठलाचं भजन करते आहे ते..."


*सुंदर ते ध्यान | उभे विटेवरी*

*कर कटेवरी | ठेवोनिया*


"अगं...इकडे...इकडे..."


"अगं! काय उद्योग धंदा आहे कीं नाही कमळे तुला...

मी एवढी विठ्ठलाच्या नामात गुंग झालेली आहे आणि...तू..."


*देव माझा विठू सावळा*

*माळ त्याची माझिया गळा*


"हे बघ, मी कमळा नाही*


"मग...?"


"मी म्हणजे... *तू...तूच*


"हे बघ, तुझं असलं कोड्यातलं बोलणं मला काही कळत नाही. मी आतां वारीला निघालेय..." 


*मी तर निघाले पंढरीला* 

*तुम्ही येता कां बोला?*


"हा काय प्रश्न झाला? मी म्हटलं ना मी म्हणजे तू... मग...*तू तिथं मी...*


"अस्सं होय? चल मग माझ्यासोबत पंढरीला"


"कुठे आहे पंढरी ? काय असतं तिथं?"


"कुठं म्हणजे? पंढरपुरात...आषाढी एकादशीला मोठ्ठी यात्रा भरते तिथं...


*विठु माझा लेकुरवाळा*

*संगे गोपाळांचा मेळा*


असं दृश्य असतं बरं"


"असं होय...?"


"तर...महाराष्ट्रातील कितीतरी संतांच्या पालख्या घेऊन वारकरी पांढरे कपडे घालुन भजन- किर्तन करत, नाचत-गात  पायी पायी पंढरपुरला जातात. काय तो थाट! किती तो उत्सव! डोळ्यांचं पारणं फिटतं अगदी...


“पुरे...पुरे...पुरे...ते सर्व वर्णन मला अगदी तोंडपाठ आहे.अनेकजणांकडुन ऐकलं आहे मी कितीदा तरी... पण मला एक सांग...कोण कोण येतं गं वारीला..."


“कोण कोण म्हणजे...? ज्यांना ज्यांना इच्छा आहे पायी चालणं होतं ते सग्गळे...लहान-थोर, गरीब-श्रीमंत, स्त्रिया- पुरुष...”


“अगं बाई...मग प्रत्येकाची जेवणा खाण्याची, राहण्याची व्यवस्था त्यांच्या त्यांच्या दर्जाप्रमाणे वेगळी असेल, नाही? कोणाला फाईव्ह स्टार, कोणाला...”


“छे, छे...भलतंच...वारी म्हणजे समानता...”


*उच्च-नीच सारे | नाही भेद भाव*


"अगं! माझा विठोबा सर्वसामान्यांचा देव आहे बरं...त्याच्या शिष्यांमध्ये सर्व जाती-जमातीचे लोक होते, हो कीं नाही...एका नामावाचुन त्याला दुसरं कां...ही लागत नाही... सच्च्या भक्तांसाठी तो नेहमीच धावुन गेलाय..."


"किती छान! पण काय गं? ही वारीची शिकवण तुम्ही जन्मभर पाळतच असाल?"


"म्हणजे? म्हणायचंय तरी काय तुला?"


"हेच... वारीची शिकवण तुम्ही नेहमीसाठी मनापासुन आचरणात आणता कां? तुमच्या कृतीतून भेदभाव नष्ट झाला कां?

विठ्ठलाचे नांव फक्त वारीपुरतं कीं सदासर्वदा तुमच्या मुखांत असतं? नाहीतर...


*वारीपुरती ओवी आणि जन्मभर शिवी*


"ते कसं शक्य आहे? अगं, प्रपंच म्हटला म्हणजे थोडं भलंबुरं व्हायचंच..."


" पण प्रयत्न तर करता येतो नं! आपलं आचरण जर नेहमीसाठी अंतर्बाह्य एकसारखं असलं तर आपलं मनच पंढरी समजून

 आपल्या मनाची वारी करता येते. आपल्या मुलामाणसांत, दीनदुबळ्यांत, पशुपक्ष्यांत आपल्याला विठ्ठल भेटत असतो.

सावता माळी यांनी म्हटलं आहे ना...


 *कांदा मुळा भाजी | अवघी विठाई माझी*


"वारी हे आपल्या आयुष्याचं प्रतीक आहे.

आषाढी-कार्तिकीला पंढरीला जरूर जावं. पण ती पंढरी नेहमीसाठीच आपल्या मनाच्या ठायी वसु द्यावी.


*मन माझे असे | पंढरी, विठाई*

*जरी तुझ्या ठायी | पांडुरंगा*


बोला... 


*विठ्ठल...विठ्ठल...जय हरी...विठ्ठल*

*विठ्ठल...विठ्ठल...जय हरी...विठ्ठल*


सौ. भारती महाजन-रायबागकर 

चेन्नई

9763204334.

No comments:

Post a Comment