Monday, July 12, 2021

प्रश्न रेशमी, उत्तर मखमली

 विषय-  *प्रश्न रेशमी... उत्तर मखमली*


 सात-आठ महिने झाले होते तो तिचा निरोप घेऊन जाण्याला...अगदी तृप्त मनाने...समाधानाने...तिने त्याला निरोप दिला होता...द्यायलाच हवा होता...नाही तर... *अति तेथे माती...* ही म्हण तिच्या चांगलीच परिचयाची होती...खूपदा तिने त्याचा अनुभवही घेतला होता... तिच्याइतका दारुण अनुभव आणखी कोणाच्या वाट्याला येणार म्हणा...


आणि आतां मात्र ती त्याची उत्कटतेने वाट पाहत होती...अगदी वेध लागले होते तिला त्याचे...त्याच्यासाठी तिने सगळी... अगदी सगळी तयारी करून ठेवली होती...थोडा त्रास झाला होता तिला...बरंच सहन करावं लागलं होतं... पण तिला त्याची तमा नव्हती... अखेर ती...*ती* होती...आणि ती तर असतेच सहनशील...खंबीर... आणि...


*आखिर कुछ पाने के लिए...*


पण कधीकधी तो नुसताच संकेत देत होता... आपल्या आगमनाचा...ती गडबडीनं आपलं विस्कटलेलं...जरासं विकल झालेलं रूप सावरत होती...


*वाट पाहुन नयन सख्या शिणले रे*


कधी कधी तो निरोप पाठवायचा...मी येतोय...आलोच बरं मी...आणि...पुन्हां हुलकावणी...ती पुन्हां कोमेजायची...नाराज व्हायची...


'कां रे असा छळतोस मला...ये ना लवकर... किती वाट पाहायला लावतोस...तुझ्याशिवाय मला दुसरं आहे तरी कोण...?' 


आणि मग तो तिच्या कानांत कुजबुजायचा...


' येऊ...? खरंच येऊ...? त्याचा मऊ मुलायम रेशमी  प्रश्न तिच्या मनांला स्पर्शुन गुदगुल्या करायचा...ती असोशीनं उत्तरायची...


'ये, लवकर ये...असा अंत नको पाहुस आतां...ह्या दीर्घ विरहानंतरची प्रतीक्षा  संपु दे एकदाची...'


अखेर तोही म्हणायचा...'चला, बस्स् झाला आता हा लपंडावाचा खेळ... नाहीतर बाईसाहेबांना गुस्सा यायचा...'


* गुस्सा इतना हसीन है तो...* 


'छे, छे...हा गुस्सा हसीन बिसीन कांही  नाही बरं...रागाने अगदी तप्त होऊन गेलेल्या असतात'


आणि...तो येतो...तिच्याकडे झेपावतो... झंझावाताप्रमाणे...तीही अनावर आवेगाने त्याला बिलगते...जिवाशिवाचं मंगल मिलनच जणूं...ती तृप्तीचे हुंकार देते...समाधानाचे निश्वास सोडते... पुन्हां...पुन्हां... 


आतां दोघांच्याही मिलनाचं सार्थक झालेलं असतं...तिचाही पहिलावहिला आवेग ओसरलेला असतो...त्यालाही जायचं असतं...कांही दिवसांसाठी...तो तिला हलकेच विचारतो...जाऊ मी...? ती म्हणते..


'अहं...येऊ म्हणावं...' तो एकवार तिला थोपटुन निघुन जातो...


आता तिच्या मनाला दुसरंच व्यवधान लागलेलं असतं...त्याची निशाणी तिच्या कुशीत वाढत असते...त्याला नीट जपायचं असतं...अर्थात् अधून मधून  त्याचीही सोबत हवीच असते...तोही ते कर्तव्य तत्परतेनं पार पाडतो...


आणि पुरेशा अवधीनंतर त्या दोघांचंही  इप्सित साध्य झालेलं असतं...आतां तिची भूमिकाही बदललेली असते...एक तृप्तीची साय तिच्या तनामनावर पसरलेली असते...


आणि पुन्हां एकदा तोच रेशमी प्रश्न...'मी येऊ...?' पण आतां मात्र...आतुर आगमनाचा...?अं..हं... हळव्या, कातर स्वरातील निरोपाचा...प्रदीर्घ कालावधीसाठी...


तिलाही त्याची अपरिहार्यता माहित आहे..‌.त्यामुळे आतां ती त्याला अडवत नाही... आपल्या कुशीतील लेकरांच्या *हिरव्या, पोपटी, मखमली जावळावरून* आपला ममतामयी हात फिरवत त्याला  उत्तर देते...स्निग्ध, शांत नजरेनंच...


सौ. भारती महाजन-रायबागकर

चेन्नई

No comments:

Post a Comment