Monday, May 31, 2021

28 आधुनिक बलुतेदार

 *(28)*.  *आधुनिक बलुतेदार*


पूर्वी गावांत नळ नव्हतेच. सगळं पाणी नदी वरून किंवा विहिरीवरून भरलं जायचं त्यामुळे नळ बिघडण्याचा आणि दुरुस्त करण्याचा प्रश्नच नसायचा.

शिवाय गावातलं बाथरूम 

 म्हणजे अंगणातलं अर्धवट साडेतीन भिंतींचं उघडं न्हाणीघर... त्याचं पाणी केळी सारख्या एखाद्या झाडाला जाणार... तुंबण्याचा प्रश्नच कुठे येतोय! आणि प्लंबरची गरज तरी कशाला लागते!


हे सगळे प्रश्न शहरांतल्या बंदिस्त घरांत निर्माण झाले. पुढच्या किंवा वरच्या घरातलं पाणी तुंबलं तरी तो पुढचा किंवा वरचा घरवाला 

 प्लंबरला बोलवायला तयार नसतो. कारण त्याला कांहींच त्रास नसतो. नाइलाजाने आपण त्याला बोलावून आणतो. तो निरीक्षण करतो, आउटलेट वरच्या जाळ्या उघडतो, गाळ साचला असेल तर तो काढतो, आपल्याला 2-4 बादल्या पाणी ओतायला लावतो. घसघशीत मजुरी घेऊन,' झालं साहेब, आतां कांही प्रॉब्लेम नाही बघा, असं म्हणून तो निघून जातो. सगळं सुरळीत झाल्यासारखं वाटुन आपण हुश्श म्हणतो. पण कसचं काय! 4-5 दिवसांनी पुन्हां 'येरे माझ्या मागल्या'


आपण पुन्हां त्याला बोलावल्यावर तो त्याच्या सवडीनं येतो. आपण त्याला जरा धारेवर धरण्याच्या प्रयत्न करून पाहिला तर, साहेब, आधी वरवरच काम करून पाहावं लागतं, एकदम मोठं कसं करणार! बघतो मी आतां...पुन्हां थोडा फार प्रयत्न करून पाहिल्यावर  म्हणतो, 'आतल्या पाईपचा ऊतार नीट नाही, फरशी खोलावी लागंल , खर्च करावा लागंल थोडा, 4-8 दिवस बाथरूम बंद ठेवावं लागंल.' आता काय करावं! आत्तांच तर एवढा खर्च झाला, पुन्हां एवढा खर्च, आणि दुसरं बाथरूम असलं तर ठीक , नाहीतर शेजाऱ्यांची मनधरणी !               

कधी गॅलरीचं आउटलेट उलट्या बाजूला असतं, पावसांत गॅलरीचा मिनी स्विमिंग पूल होतो. मुलं पोहायची हौस भागवुन घेतात. दुसरं आउटलेट करण्याशिवाय पर्याय नसतो. आणि त्यासाठी प्लंबरलाच शरण जावं लागतं. 

किचन ओट्यासाठी तर दुसरा/ तिसरा/ चौथा कुठलाच पर्याय नसतो.(नामजप करत ?) ओटा धुतल्यावर पाणी सिंक कडे लोटायचं किंवा न धुतां कपड्याने फक्त पुसून घ्यायचं एवढंच आपल्या हातांत असतं...बस्स्.


कधी एखादा नळ अचानक टप्  टप् करत गळायला लागतो. आपल्या डोळ्यांपुढे 'पाणी वाचवा' ही जाहिरात सारखी नाचत असते. आजकालचे नळ एक तर  वेगळ्या प्रकारचे, फॅशनेबल असतात. त्यांना लागणारे मोठे पान्हे आणि इतर साहित्य आपल्याकडे कुठून असणार! आपण बोलवल्यावर प्लंबर येईपर्यंत दोन -तीन बादल्या पाणी जमा झालेलं असतं. प्लंबर येतो, आपल्याला दोन बादल्या पाणी भरून ठेवायला सांगतो. वरचा कॉक बंद करतो. त्याच्या जवळच्या त्या विशिष्ट पान्ह्याने नळ उघडतो. आंत मधलं वाँशर किंवा अशीच काहीतरी क्षुल्लक गोष्ट, लागत असलेली त्याच्याकडे नसते. आणि आपल्याकडे असायचा तर प्रश्नच नसतो. मग तो सांगतो, ' हे बघा, मी आतां जेवायला जातो, येतांना ते घेऊन येतो.' आतां त्याला जेवायला नको कसं म्हणणार! आपण मुकाट मान डोलावतो. दुपारचं जेवण संपवून रात्रीच्या जेवणाची वेळ होते. 'हा काय शेतांत धान्य पिकवून, ते दळून, स्वयंपाक करून मग जेवणार होता की काय ! आपण आपला राग मनांतच ठेवून, आवाजांत शक्य तितकां नम्रपणा आणून त्याला फोन करतो. ' साहेब, काय झालं, मी येणारच होतो जेवण करून,   

पण इकडे दुसरं अर्जंट काम आलं आलं होतं दुपारच्याला. आतां उद्या सक्काळच्याला पैलेछुट येतो बघा, तंवर भागवुन घ्या जरा.' न भागवून कोणाला सांगता . आपण मनांतच चरफडत मुलांवर डाफरतो, "ए पाणी कमी सांडा रे, दोन बादल्या पाणी सकाळपर्यंत पुरवायचं आहे". 


फ्लॅटसिस्टीम मध्ये तर कधी भिंतीला लिकेज, कधी  वरच्या छताला ! 

कधी वरच्या तर कधी शेजारच्या फ्लॅटमधून आपल्या घरांत, कधी आपल्या घरातलं  खालच्या किंवा शेजारच्या घरांत! अगदी त्याच्यावर खाली बाथरूम किंवा किचनचं सिंक नसलं तरी... प्लंबरला विचारावं तर एखाद्या आशा सोडलेल्या पेशंटला पाहून डाँक्टर नकारार्थी मान डोलावतात तशी मान हलवून तो म्हणतो, 'कांही उपाय नाही साहेब. एकात एक गुंतलेलं आहे सारं.

तरी वॉटरप्रूफिंग करून टाकु. नवीन टेक्निक हाय, बघूया काय उपेग होतो का ते! आपल्याला मम म्हणण्याशिवाय पर्याय नसतो.


अगदी स्वतःच्या घरांत राहिलो तरी 'ठेविले कारागीरे,तैसेची रहावे' हेच खरं.

भेटुया…


सौ. भारती महाजन रायबागकर, चेन्नई

bharati.raibagkar@gmail.com

9763204334

Sunday, May 30, 2021

27 आधुनिक बलुतेदार

 *27*  *आधुनिक बलुतेदार*


काल धार लावुन घेतली तरी आधुनिक लोहाराला भेटुन आल्यावर राँट आयर्नचं, पावडर कोटिंग केलेलं फर्निचर खूपच आवडलं, मग ते खरेदी करावं असं वाटणारच ना! पण घरांतील सध्याचं फर्निचर जुनाट वाटायला लागलं तरी कधीकधी ते काढुन टाकावंही वाटत नाही. एकतर त्यात आपल्या आठवणी गुंतलेल्या असतात किंवा 'राहू दे,कधीतरी कामी येतंच बसायला पाहुणे आल्यावर, असाही विचार करतो.  पण सध्यांच्या घरांत तर नवीन फर्निचर साठी जागा होऊ शकत नाही.  मग आपण शक्य असल्यास खोल्या वाढवायचे ठरवतो आणि शोध घेतो घर बांधून देणाऱ्या मिस्त्रीचा, त्यालाच तर घेऊन आलेय आजचा बलुतेदार म्हणून....


              *मिस्त्री*


पूर्वी गांवातली घरं दगडा मातीची असत. आणि ती घरांतील बायका माणसं मिळून बांधत असत. सगळ्या घरांचा ढाचा साधारण सारखाच असे. जागेनुसार गरजा कमी जास्त होत असत, एवढेच. प्राथमिक ज्ञान प्रत्येकालाच असे.शिवाय गांवात सर्व जण एकमेकांची मदत करत असतात. 


तालेवार लोकांच्या वाड्याच्या बाहेरील भिंती चिरेबंदी दगडाच्या असत. चिरा म्हणजे टाके घालून ओबडधोबड दगडाचा घडवलेला चौकोनी दगड. ते काम पाथरवट करत.


आता सिमेंटच्या घरांची चलती आहे.  मातीच्या घरांची उपयुक्तता कितीही पटली तरी ते शक्य नाही. त्यासाठी सिमेंट काम करणारे कारागीर निर्माण झाले. मिस्त्रीला बढई किंवा कारागीर असे म्हणतात.


 एकदा घराचा नकाशा मोजमापासह तयार होऊन आला कीं कारागिराचे काम सुरू होते. कंत्राटदार, सुपरवायझर, कारागीर, आणि त्याच्या हाताखाली सिमेंट, वाळू, पाणी इत्यादी साहित्य आणून देणे, कॉंक्रीट तयार करणं इत्यादी काम करण्यासाठी रोजंदारीवर स्त्री पुरुष कामगार असतात. 


नकाशानुसार पाया खणल्या जातो. पिलर उभे राहतात, स्लँब पडतो आणि भिंती उभ्या करण्यासाठी विटांचे थर एकावर एक चढु लागतात. आपण देखरेख करण्याच्या निमित्ताने बांधकामाच्या ठिकाणी चक्कर मारतो. एकमेकांशी गप्पा करत त्यांच्या 'पद्धतीने ' काम व्यवस्थित चालू असतं. गप्पांच्या नादांत किंवा मुद्दाम संवय म्हणून अर्धी वीट पाहिजे असली तरी जवळच असलेली पूर्ण वीट घेऊन  तिचे खट्कन आपल्यासमोर दोन तुकडे करतो. तेव्हा आपण चट्कन तिथली एखादी अर्धवट वीट उचलून त्याला देत म्हणतो, “अहो दादा, ही घ्या नं, ती पूर्ण वीट कशाला फोडता?” कारण आपल्या डोळ्यांसमोर वाढता वाढता वाढलेल्या आणि म्हणूनच कोलमडलेल्या बजेटचे आंकडे नाचत असतात. पर अब *ओखलीमें सर दिया तो मुसलीसे क्या डरना*


 या कामांत मुरलेल्या मिस्त्रीला मात्र अशा प्रश्नांची संवय झालेली असते. तो आधीचीच फोडलेली वीट भिंतीत शांतपणे, व्यवस्थित लावून मग आपल्याला म्हणतो, “अहो साहेब/ मॅडम, असं नाही चालत, घर बांधायचं म्हणजे अशी बारकाई करून कसं चालंल! 'दात कोरून पोट भरतंय व्हंय.' आपण निमुटपणे दुसऱ्या किंचित तिरप्या दिसत असलेल्या भिंतीकडे जातां जातां गप्प बसून मागं वळतो, हो, नाहीतर तसं म्हटलं तर लगेच ओळंबा लावून दाखवायला तयार! 'हा सूर्य, हा जयद्रथ'! तो दिसला नाही तरी मान डोल्यावल्याशिवाय पर्याय नसतो.


खरी कथा सुरू होते फ्लोअरिंग करतांना. इतरांच्या अनुभवावरून शहाणं व्हावं म्हणून आपण तिथे जातीनं उभं राहतो. "दादा, उतार नीट काढा हं' अशी वारंवार सूचना देतो. 'तुम्ही अजिबात काळजी करू नका ताई, तुम्हांला तक्रारीला जागाच ठेवणार नाही बघा,” एकीकडे आपल्याला असं भरघोस आश्वासन देत दुसरीकडे, “ए पोरा, नीट स्लोप काढ तिथं, हां ,आस्सं, टाक तिथे शिमीट जरासं” असं काम करणाऱ्याला बजावत राहतो. 


बरं घरांतूनही, " ते उताराचं तुझं तूं बघून घे बरं कां ! नाहीतर, तक्रार करत बसशील मग!' असं म्हणून सगळी जबाबदारी आपल्यावरच अलगद लोटून दिली जाते. 


काम झाल्यावर संध्याकाळी नीट आवरून घे

 म्हणावं तर, “ बाई, आवो, उद्याच्याला पुन्हा असाच

 खकाना व्हायचांय न्हंव, रोज रोज झाडून पुसून घ्यायला ते काय रहातं घर हाय व्हंय' अशा शहाणपणाच्या दोन गोष्टी आपल्यालाच शिकवतात. कारण त्यांच्यासाठी ही रोजचीच गोष्ट असते.


आतां एवढे सगळे अनुभव आल्यावर कुठून आपल्याला हे बांधकाम करण्याची दुर्बुद्धी झाली असं म्हणत, ( मनांतल्या मनांतच हं... नाहीतर... 'तुलाच हौस होती फार' हा घरचा आहेर स्विकारावा लागतो.) आपण दुसर्‍या दिवशी पुन्हां आलिया भोगासी असावे सादर' होतो, '............, घर पहावे बांधून' या म्हणीची सत्यता पडताळून  पाहण्यासाठी.....


भेटूया......... उद्या.......


सौ. भारती महाजन- रायबागकर

चेन्नई

bharati.raibagkar@gmail.com

9763204334

Saturday, May 29, 2021

25. आधुनिक बलुतेदार

 *(25)* *आधुनिक बलुतेदार* 


काल लोहाराला भेटलो आणि माझी नजर कैची कडे गेली. कपडे कापतांना ती शार्प नसल्याने अडचण होते हे ही आठवलं. धार लावायला हवीत... पण कशी... कुठे... बाकीच्या वस्तुंचं ठीक आहे. पण कैची ही तर उपयोगी वस्तु, कोणाला रोज तर कोणाला कधीमधी...मग धार लावणारा शोधायला तर हवाच...


   *धार लावणारा*


 हत्यारांना धार लावण्यासाठी पूर्वी एका विशिष्ट प्रकारच्या दगडाचा वापर करत होते. हत्याराचा पातं त्या दगडावर घासलं कीं ते कामासाठी तय्यार. नंतर *गरज ही शोधाची जननी आहे* या उक्तीनुसार इतर यंत्रांप्रमाणेच धार लावण्याच्या यंत्राचाही शोध लागला.


 तोच दगड वेगळ्या आकारांत वापरलेलं एक चाक, पट्टा, चाकाची बैठक आणि इतर आवश्यक बाबी इत्यादी लावुन ते सायकलवर बसवलं कीं झालं धार लावण्याचे यंत्र. सायकलवर बसुन पायडल मारलं कीं चाक फिरायचं आणि हव्या त्या वस्तूला धार लावुन मिळायची. सायकलच्या पूर्वी एक मोठसं लाकडी स्टॅन्ड वापरत असत. पण हे लाकडी स्टँड त्यावरील यंत्रासह घेऊन फिरणं मोठं जिकिरीचं असायचं. त्याबद्दल त्यांना मेहनताना तरी किती मिळत असणार कोणास ठाऊक! त्यांतही घासाघीस करणारे महाभाग असतातच. वेगवेगळ्या प्रकारच्या हत्यारांना वेगवेगळ्या प्रकारच्या कोनांतुन कमी जास्त वेळ घर्षण करून धार लावली जायची.


अजूनही छोट्या गावांत किंवा मोठ्या शहरांत हे धार लावणारे *धार लावायची...य् का धार* असा पुकारा करत फिरत असतात. पण नाईलाज असला तरच त्यांच्याकडून कोणी धार लावुन घेत असावं. नाहीतर 'तो नीट लावत नाही, लगेच बोथट होते वस्तू' असं अनुभवांती ठरवून आपण त्याला टाळतोच. आणि जर एखाद्या वेळेस लावुन घेतलीच तर 'अच्छी लगाओ, और घुमाओ ना  मशीन' असं सारखं म्हणत असतो. आणि त्याने 'बस, अब ठिक है?' असं विचारल्यावर तोंड जरासं वाकडं करून 'हां... ठि..क है, पण पुढच्या वेळी अच्छी कर देना' असं बजावुन पुन्हां पैसे देतांना खळखळ करतो ते करतोच. तोही बिचारा 'ठीक है, बाईजी/मॅडम' असं म्हणत पुढचं गिऱ्हाईक शोधण्यासाठी गांवभर हिंडत फिरतो.


हं... आतां *चक्कु छुरीयां तेज कराले* असं गाणं म्हणत, नाचत कुणी सुंदरी आपल्या कामाची जाहिरात करत फिरत असली तर गोष्टच वेगळी. अशावेळी कामाचा दर्जा-बिर्जा...! त्याचं काय एवढं! पण आतां तेही कांही शक्य होईल असं वाटत नाही.गंमतीचा भाग सोडा. पण आतां तसाही घरांत स्टीलच्या वस्तूंचा वापर जास्त आणि लोखंडाच्या वस्तूंचा वापर कमी झाला आहे.


त्यामुळे आतां मध्यम शहरांतही या धार  लावणाऱ्यांचं एखादं दुसरंच दुकान असतं. त्याची हक्काची गिऱ्हाईकं म्हणजे न्हावी, शिंपी, माळी आणि असाच इतर व्यवसाय असणारे व्यावसायिक. ह्यांना

 तर गिऱ्हाईकांची कमीच नाही. त्यामुळे धार लावणाऱ्याकडे कामंही भरपूर असतं.


त्यातही त्याच्या कामाचा दर्जा चांगला असला तर आपलं अगदी अडत नसलं तर, जरा उशीर झाला तरी चालेल पण आपल्याला त्याच्याकडूनच धार लावुन घ्यायची असते. आणि तोही आपला दर्जा टिकवण्याचा प्रयत्न करतोच.


या चाकुसुऱ्यांचे आकारा-प्रकाराप्रमाणे धार लावण्याचे दरही ठरलेले असतात. तसा दर-फलकच त्यांनी दुकानाच्या बाहेर लावुन टाकलेला असतो. म्हणजे दारावर येऊन धार लावणाऱ्याशी करतो तशी घासाघीस करण्याचा प्रश्नच मिटला शिवाय कांही कैच्यांना तर दोन्ही पाती वेगळी करून धार लावावी लागते.


'कारागीर कमी आणि गिऱ्हाईक जास्त' असं व्यस्त प्रमाण असल्यामुळे इथेही रांग लावावी लागते आणि मग आपला नंबर यायला वेळ असला तर बाजारांतुन फेरफटका मारून नंतर आपली वस्तु घेऊन जावी लागते. शिवाय इथे फसवाफसवी चा प्रश्नच येत नाही.


आता लहान-मोठ्या कंपन्यांमध्ये पॉवरफुल ग्राइंडर असतात. त्यावर दिवस पाळी/ रात्र पाळी मध्ये काम करणारे कुशल-अकुशल कामगार असतात. काम मेहनतीचं आणि जोखमीचंही असतं. त्यांना पुरेशी सुरक्षितता, मेहनताना मिळत असेल ना!


सहज जातां जातां... ह्या धार लावणाऱ्यांना कांही विशिष्ट नांव आहे काय?


उद्या एक नवीन बलुतेदार...


सौ.भारती महाजन- रायबागकर, चेन्नई

bharati.raibagkar@gmail.com

Friday, May 28, 2021

24 आधुनिक बलुतेदार

 *24*  *आधुनिक बलुतेदार*


काल कापड दुकानदारांकडील एकही कपडा पसंत पडला नाही, खरेदी बारगळली आणि मन खट्टू झालं. पण तो तरी काय करणार! त्याचा जुना मालच खपला नाही तर तो नवीन कसा आणणार! त्यामुळे आतां इतक्या दिवसानंतर तेच कपडे घातल्यावर आपल्याला नव्याने नवीन वाटायला लागतील. लहान मुलांचं नाही कां... त्यांचे जुने, लहान झालेले कपडे, आवरायला म्हणून, कोणाला देऊन टाकायला म्हणून बाहेर काढले रे काढले कीं,' कित्ती छान, मला पाहिजे' असं म्हणत, त्यातला एखादा कपडा घालून दिवसभर बागडत असतात. 


बाहेर जाण्यावर आधीच निर्बंध, त्यांत कधीकधी सगळीकडे अवकाळी, पावसाळी वातावरण असतं. अंधारुन मळभ दाटून येतं आणि मन आणखी उदास होतं. मग दिवसाही अंधारलेल्या घरांत आपण दिवे लावतो, घर प्रकाशमान होतं, आणि आपलं मन प्रसन्न होतं. आपल्याला प्रकाश देऊन उजळणाऱ्या दिव्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच 'आषाढी अमावस्येच्या दिवशी आपण दिव्यांची पुजा करत असतो.म्हणुनच तिला 'दिव्यांची अमावस्या' म्हणतात. 


या दिवशी घरांतील सर्व दिव्यांची घासून पुसून स्वच्छता केली जाते. त्यांना एका पाटावर ठेवून गंध पुष्प वाहून त्यांची पूजा केली जाते. आपल्या वंशाच्या दिव्याचं आणि पणतीचंही औक्षण केल्या जातं. पण कितीतरी निर्जीव वस्तू स्वतः कांही करू शकत नसल्या तरी त्यांच्या सहाय्याने त्यांना साधन म्हणून वापरून आपण आपली सोय करू शकतो, म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्याची ही पद्धत असावी. 


आतां आपल्याला वाटेल तेला तूपाच्या दिव्यांचं ठीक आहे,  पण विजेच्या दिव्यांचं काय! ते तर बटन दाबलं की लागतात /विझतात. त्यांची पुजा कशी करायची? पण पण कुठल्याही कृती मागचा उद्देश लक्षांत घेतला तर पद्धत बदलली तरी तो साध्य होऊ शकतो. मग पारंपारिक पद्धतीने पूजा करता नाही आली तरीही त्यांना ओल्या कपड्याने पुसून स्वच्छ केलं तर ते अधिक प्रकाश देऊ शकतात. त्यांची बटनं तपासणं, एखादं वायर कुठे लुज झालं आहे का हे बघणं, एखाद्या वायरचं वरचं आवरण निघून गेलं आहे कां हे तपासणं, सगळ्या विजेच्या उपकरणांची तपासणी करणं, हेसुद्धा त्यांची पूजा करण्यासारखेच आहे. आणि ते फक्त ह्या दिवशीच करावी असं नाहीतर ती वारंवार केलेली बरी. 


आता ह्या दिव्यांचं जर कांही बिनसलं तर ते कांही आपण घरी दुरुस्त करू शकत नाही.त्यासाठीच आलाय आजचा बलुतेदार....


        *इलेक्ट्रिशिअन*


पूर्वी गावात वीजच नसायची. दिवली, चिमणी, कंदील यांच्या ऊजेडांत, रात्रीच्या गडद अंधारात गांव टिमटिमत असायचं, मग त्यांना या बलुतेदाराची गरजच काय!


याची गरज शहरांत वीज आल्यावरच भासू लागली, आणि उदयाला आला आणखी एक आधुनिक बलुतेदार! कुठल्याही वस्तूचा शोध लागल्यावर ती वापरतांना कधीतरी नादुरुस्त होतेच आणि ती दुरुस्त करणाऱ्याची गरज पडते. 


कधीतरी अचानक आपली ट्यूब पेटायची थांबते. आपण थोडेफार तिला हलवून पाहतो, पण ती ढिम्म! आपण इलेक्ट्रिशयनला फोन करतो. हो, येतो... येतो म्हणत दिवस मावळतांना येतो. ( तोपर्यंत दिवसभर ट्यूब कडे वर बघता बघता आपला मानेचा व्यायामही अनायासे होऊन जातो) तो आल्यावर ती जराशी हलवल्यासारखी करतो, आणि 'लागली बघा, जरासाच प्रॉब्लेम होता' असं सांगून त्या 'जराशा' प्रॉब्लेमचे पैसे मात्र 'बरेचसे' घेऊन जातो. 


  कधी ऐन ऊकाड्यांत डोक्यावरचा पंखा एकाएकी गरगरायला थांबतो आणि आपण घामाघूम होतो. आपण पुन्हां त्याचा धावा करतो, पुन्हा तो तसाच त्याच्या चालीने येतो, फॅन खाली घेऊन पाते  काढुन ठेवतो, मोटर किंवा सगळीकडे बारकाईनं  तपासतो, आणि अमुक पार्ट आणावा लागेल असं सांगतो. आपल्याला त्यातलं ओ कि ठो कळत नाही आणि आणायला वेळ नसतो. मग त्यालाच पैसे देऊन आणायला पाठवतो, आणि 'आत्ता घेऊन येतो' असं म्हणून गेलेल्या इलेक्ट्रिशियनचा 'आत्ता' कधीकधी दुसऱ्या दिवशी पर्यंत लांबतो. मग त्या अस्ताव्यस्त पसरलेल्या पंख्याला उचलून नीट ठेवण्याशिवाय पर्याय नसतो, आणि त्यानंतर त्याला उचकी लागेल इतकं त्याचं नांव घेत, रात्री झोप न आल्यामुळे पदर नाहीतर पेपर घेऊन न लागणारा वारा घेत जागत राहतो. कधी बटनं, कधी फ्युज, कधी आणखी कांही दुरुस्त करावं लागत असतं. किरकोळ दुरूस्ती कदाचित आपण शिकुन घेऊ, विजेचं काम करतांना रिस्क असते, त्यासाठी हा नेहमीच लागणारा अत्यावश्यक बलुतेदार...


 पण सगळेच असे नसतात. 'उडदामाजी काळे गोरे' तसे कांही प्रामाणिकपणे, वेळेवर, चोख काम करणारेही इलेक्ट्रिशयन असतात. मग भलेही ते पैसे थोडे जास्त घेवोत, पण त्यांनाच बोलवायचं असं आपण ठाम ठरवून ठेवतो. कारण काम खात्रीपूर्वक आणि 'वेळेवरच' होणं महत्त्वाचं...हो नं?


ता.क. इलेक्ट्रिशियनला मराठी प्रतिशब्द काय आहे, मला माहिती नाही. जाणकारांनी मार्गदर्शन करावं.


भेटुया.......


सौ. भारती महाजन-रायबागकर, चेन्नई

bharati.,raibagkar@gmail.com

9763204334

Thursday, May 27, 2021

23 आधुनिक बलुतेदार

 *23*  *आधुनिक बलुतेदार*


आपले माळीबुवा आजकाल चलती असलेले आणखी एक काम पण छान करतात बरं... *बोनसाय* ! या जपानी कलेने भारतातही आता छान बाळसं धरलं आहे. बोगनवेल, वड, पिंपळ, लिंबू, संत्री इत्यादींची ही  फळाफुलांनी लगडलेली, देखणी, कमी उंचीची झाडं पाहिली कीं ती पाहून प्रसन्न व्हावं कीं मुद्दाम वाढवून त्यांच्यात कृत्रिम रीत्या परिपूर्णता आणलेली पाहून खंत करावी…? कालाय तस्मै नमः!


पण आतां माळ्याअभावी बाग सुकत चालली असेल आणि आपल्यालाच मातीत हात घालावे लागले असतील तर, चिखल तर लागणारच ना! कपडे बदलण्यासाठी कपाट ऊघडावे तर कपाटातील नवे कपडे आपल्या सहवासा अभावी मलुल झाल्यासारखे वाटतात. आणि घालुन जाणार तरी कुठं? पण घ्यावेसे तर वाटतात, फार दिवस झाले ना नवीन कपड्यांची खरेदी करून... म्हणूनच आपल्याकडे कपडे घेऊन आलाय आजचा बलुतेदार...


            *कापड दुकानदार*


पूर्वी बऱ्याश्या गांवातच एखादं कपड्याचं दुकान असायचं. छोट्या खेड्यात तर नाहीच. लोकांचा पोशाखही धोतर आणि बंडी किंवा शर्ट, नऊवारी लुगडं, चोळी किंवा झंपर, मुलांना हाफ चड्डी आणि शर्ट, मुलींना झगा किंवा परकर पोलकं, बास्स...


एखादा शेतकरी आठवडी बाजाराला गेला की गरजेनुसार, आपल्या पसंतीनं कपडे घेऊन यायचा, तेही एखाद्या मोठ्या सणालाच...


शहरांत दुकानं जास्त असायची, 'अनुभव हीच खात्री' झाल्यावर एखादं स्वस्त आणि त्यांतल्या त्यांत मस्त दुकान नेहमीसाठी ठरवल्या जायचं. पुष्कळदा हा व्यवहार उधारीवर ह्वायचा. मग शाळा सुरू झाली की गणवेश आणि सण आला कीं नवीन कपडे वडीलधाऱ्यांसोबत खरेदी करायला दुकानांत जायचं. मुलींसाठी फुलाफुलांचं डिझाईन असलेलं कापड, आणि मुलांसाठी चौकडा, प्लेन, लाइनिंग हे पॅटर्न ठरलेलं असायचं. त्याच्या विरुद्ध म्हणजे मुलांसाठी फुलांफुलांचे किंवा मुलींसाठी चौकड्याचे कपडे... तोबा, तोबा! एकदा कपड्यांची पसंती झाली कीं... (पोत, रंग आणि भाव पाहून मोठ्यांनी ठरवलेली,) मापानुसार सरसकट सर्व मुलांसाठी आणि मुलींसाठी ठरल्याप्रमाणे एकाच ताग्यातून कपडे घेतल्या जात. आणि ते शिवुन आल्यावर अंगात घातले की ही एकाच घरची मुलं आहेत हे आपणांस समजून येई. (त्यावेळी त्यांना बँड पार्टी वगैरे कोणी म्हणत नसत. )खरं म्हणजे आतां पती-पत्नी आणि मुलं फॅशन म्हणून, मुद्दाम ठरवून, एकाच रंगाचे कपडे घालतात...मग! ड्रेसकोड म्हणतात म्हणे त्याला...


आता तर दुकानांचे स्वरूपच बदलले. मोठ-मोठी किमान दोन-तीन मजली दुकानं...छे, शोरूम्स उभ्या राहिल्या. डिस्प्ले साठी दर्शनी भागांत फॅशननुसार कपडे टांगल्या जाऊ लागले. प्रत्यक्ष कल्पना यावी म्हणून माणसांएवढ्या पुतळ्यांच्या अंगावर ते परिधान केले जाऊ लागले. स्त्रियांचे, पुरुषांचे आणि मुलांचे प्रत्येक कपड्यांच्या प्रकारानुसार, आजकालच्या फँशननुसार ( ती तर काय, दर बारा कोसावर बदलणाऱ्या भाषेपेक्षाही वेगाने बदलते) वेगवेगळे विभाग तयार झाले. 


आणि अशा भव्य दुकानांत प्रवेश करताक्षणी, मालक ज्या अगत्याने, तोंड भरून आपले स्वागत करतो त्याला तोड नाही. “ या, या ताई, फार दिवसांनी आलात, अरे, ताईंना काय पाहिजे बघ बरं” असं जेव्हां तो फर्मावतो, तेव्हां मागच्याच महिन्यांत जाता जाता सहजच डिस्प्ले मध्ये ठेवलेली साडी आवडली म्हणून आपण खरेदी केली होती हे आपण विसरूनच जातो. आणि यानंतर जेव्हां 'या डिझाईन मध्ये दुसरा रंग आहे कां किंवा हा रंग  चांगला आहे पण काठ जरा नाजुक पाहिजे होता, किंवा नव्या फॅशनची, वेगळी दाखवा नं' अशा संवयीच्या चिकित्सक प्रश्नांना ( तुम्ही फॅक्टरीतुनच पाहिजे तशी साडी करून घ्या मॅडम हे ओठावर आलेले उत्तर) बाजूला सारून जेव्हा सेल्समन हसऱ्या मुद्रेनं, न कंटाळता आपल्यासमोर साड्यांचा ढीग लावतो तेव्हां तर आपण कोणी 'व्ही.आय.पी' असल्याचा भास होतो. पण तरीही आपण प्रसन्न न होतांच 'नको आज' असं म्हणत ऊठलो,  तर...'अरे, तो कालच माल आला आहे, त्यांतल्या साड्या दाखवा बरं ताईंना,' या मालकाच्या आज्ञेनुसार  तो जेव्हां त्यांतल्या साड्या काढून आणतो, तेव्हां तर आपण 'व्ही. व्ही.आय.पी, आणि तो  सेल्समन संयम, चिकाटीची कठीण परीक्षा 1 ल्या नंबरने ऊत्तीर्ण झालेला, 'कर्मण्येवाधिकारस्ते, मा फलेषु कदाचन' या उक्तीचं तंतोतंत पालन करणारा कोणी स्थितप्रज्ञ, संत-महंत  असावा असंच वाटतं. 


रेडिमेड कपड्यांच्या दुकानाची हीच गत. आज काल ड्रेसचे तरी किती विविध प्रकार, इंडियन, वेस्टर्न...पूर्वी पंजाबी ड्रेस  ही फॅशनची परमावधी होती.  आता साडी वरच्या ब्लाऊजचेच इतके प्रकार असतात, ड्रेस मध्ये तर सलवार कमीज, चनिया चोली, जीन्स-टाँप यापलीकडे माझ्या कल्पनेची धाव नाही जात.


 एखादा ड्रेस आवडला तर रंग दुसरा हवा, आणि रंग आवडला तर तो ओल्ड फँशनचा असतो. कधी दोन्हींचं सूत्र जमलं तर तो आपल्या मापाला येत नाही. (आणि मग आपण आपलं वजन कमी करण्याची भीष्मप्रतिज्ञा करतो, मनांतल्या मनांत )


'एक नंबर आदमी, दस...अहं...सौ नूर कपडा' हे वचन अक्षरश: सार्थ ठरवण्याच्या जमान्यांत कपाट आपल्या कपड्यांनी कितीही ओसंडून वाहत असलं तरी नवा 'नूर' असलेला कपडा आपल्या वॉर्डरोबमध्ये हवाच... कीं.........


सौ. भारती महाजन- रायबागकर चेन्नई

bharati.raibagkar@gmail.com

9763204334

Wednesday, May 26, 2021

22 आधुनिक बलुतेदार

 *22*   *आधुनिक बलुतेदार*


        

ज्यांच्याकडे पर्सनल वाँचमन आहेत ते सगळे कामावर आहेत कीं रजेवर आहेत? त्यांचं काम वाढले कीं कमी झाले? लाँकडाउनच्या काळांत त्यांची परिस्थिती कशी आहे? इत्यादी, इत्यादी, इत्यादी मला पडलेले प्रश्न...


मोठ्या सोसायटीतील वाँचमनला गेट सोडून जायचं नाही अशी सक्त ताकीद असते. पण आपल्या पर्सनल किंवा पंधरा-वीस फ्लॅटच्या सोसायटीच्या वॉचमनला मात्र कुणाचं अडीअडचणीला सामान आणून देणे, गाड्या धूणे, झाडझुड करणे इ. कामं करावी लागतातच शिवाय सोसायटीच्या आवारांतील झाडांना पाणी देणे, निगा राखणे अशीही कामं करावी लागतात. पण कांही ठिकाणी हे काम करत असतो आजचा बलुतेदार...


               *माळी*


पूर्वी खेड्यांतील शेतकरी म्हणजेच माळी असायचा. 'माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी देतांना पिकाची, भाजीपाल्यांची, फुलाफळांची नीट निगा राखणे त्याचेच काम असायचे. दारांतली दोन-चार फुलझाडं, खेड्यांतील मुलं आपोआपच निगराणी न करतांच वाढतात तशी वाढायची... त्यामुळे माळ्याचं स्वतंत्र अस्तित्व असं नव्हतंच. 


ही जमात उदयाला आली शहरांत. फ्लॅट सिस्टिम सुरू होण्याच्या आधी मोठ्या प्लॉटवर, मध्ये टुमदार बंगला आणि सभोवती फुलाफळांची झाडं दिमाखात डोलत असत. पूर्वीच्या एकत्रित कुटुंबातील सर्वजण त्या झाडांना पाणी देणं, औषध फवारणी, आळं करणं, छाटणी करणं, फुलं तोडणं, इत्यादी कामं करत होते. 

 झाडं फळा-फुलांनी डोलू लागली कीं एकमेकांना पुन्हां पुन्हां दाखवत  'आनंदाचे डोही आनंद तरंग' असे तेही डोलत असत.


हळूहळू वयं वाढत गेली, वेळेचं आणि कामाचं प्रमाण व्यस्त झालं, पण हौस तर होतीच, आणि बागेशिवाय बंगला म्हणजे...कोंदणाशिवाय हिरा ( उपमा जरा जास्तच महागडी झाली कां !)


आणि मग पुन्हां ते 'दुसऱ्यांची गरज ही स्वतःची संधी', तशीही दुष्काळ, नापिकीमुळे शेती उजाड झाल्याने घरांतल्या सर्वांचं पोट भरणं मुश्कील झालं होतं. बिल्डर्स हळूहळू शहराशेजारच्या गावांकडे हातपाय पसरू लागले होते. म्हणून ग्रामीण युवक साहजिकच शहराकडे येता झाला, आणि  एकरांच्या शेतांत राबणारे हात बंगल्यांच्या बागेत लुटुपुटीच्या खेळासारखे रमु लागले. 


त्यांनी आपल्याबरोबर आणलेल्या मोठ्या  कैचीनं कंपाउंडची बाढ एकसारखी कापली कीं ती शिस्तीत बसलेल्या मुलांसारखी दिसते. झाडांच्या मुळाशी आळं केलं, पाणी दिलं की बाग नव्यानंच देखणी दिसू लागते. लाँन एक सारखी कापली कीं हिरव्या पोपटी गालिच्याचा भास होतो. 


पण झाडांच्या कळ्या फुलांसह असलेल्या फांद्यांची कटिंग केली कीं मात्र त्या ओक्याबोक्या झाडांना पाहून वाईट वाटतं. माळ्याचा रागही येतो. पण व्रात्य मुलांना शिक्षा केली तरी ती सुधारतातच ह्याची खात्री नसते, झाडं मात्र कांही दिवसांतच नव्या पोपटी तांबूस पालवीचा लेवुन प्रसन्न दिसतात, आणि आपण म्हणतो, 'बरं झालं, छाटणी केली ते, जरा आडवातिडवंच वाढलं होतं.


लोकांची झाडांची आवड पाहून काहींनी झाडांची नर्सरी चालू केली. पण तिथेही अनुभवी माळ्याकडूनच झाडं पारखून घ्यावी लागतात. नाहीतर तिथं टवटवीत दिसणारी, फुलांनी बहरलेली झाडं आपल्या घरी आल्यावर सात आठ दिवसांतच कोमेजून जातात, आणि 'काय भुललाशी वरलिया रंगा' असं वाटुन आपलं मन खट्टू होतं.


हळूहळू मोठ्या कंपन्या, सोसायट्या निर्माण झाल्या. आणि त्यांच्या आवारातील गार्डन स्टेटस् सिम्बॉल झाले. हे काही एकट्या दुकट्या

 माळ्याच्या आवाक्यातलं काम नव्हतं. मग पुन्हा तेच... माऊथ पब्लिसिटी आणि पुन्हा सुरक्षिततेसाठी तशीच 'गार्डन वर्कर्स एजन्सी'... प्रशिक्षण घेतलेले लँडस्केप डिझाईनर्स तयार झाले. त्यांनी आपल्या मदतीसाठी कुशल-अकुशल माळ्यांची टीम निर्माण केली. देशी कमी, परदेशी जास्त अशा झाडांनी आवाराची फक्त 'शोभा' वाढवली. शोभा एवढ्यासाठी कीं पक्ष्यांच्या अधिवासासाठी ही झाडं निरुपयोगी होती. मग त्यांच्यासाठी ' बैल गेला आणि झोपा केला' तशी कृत्रिम लाकडी घरं, धान्य ठेवण्यासाठी फिडर्स,  पाणी पिण्यासाठी पसरट मातीची भांडी अशा सोयी करण्यात आल्या. फुलझाडांचंही तेंच, हायब्रीड प्रजातींची, बिना सुगंधी, सुंदर रंगांची, लावलेली सीझनल फुलं सर्वांना आकर्षित करतात. पण ऑक्सिजन हबसाठी तुळशीची बेटं किंवा बहुगुणी,सर्वोपयोगी कोरफडीची कतार मात्र क्वचितच दिसतात.


कारण आतां काळ्या मातीत खपुन घट्टे पडलेल्या माळ्यांच्या हातापेक्षां डिग्री मिळवणारे, स्वदेशांत अव्यवहार्य परदेशी संकल्पना राबवणारे, सुटाबुटातले लँडस्केप डिझायनर वरचढ ठरतात. 


तरीही आपण...

'सावता म्हणे केला मळा,

झाडांचरणी लाविला लळा'

असंच रहावं...खरं नं!


आतां ऊद्या भेटुच आणखी एका बलुतेदारासह...


 सौ. भारती महाजन- रायबागकर

bharati.raibagkar@gmail.com

9763204334.     





Tuesday, May 25, 2021

21 आधुनिक. बलुतेदार

 *21*      *आधुनिक बलुतेदार*


काय मंडळी! कालच्या हरवलेल्या पत्रांच्या दुनियेतून बाहेर आलांत कीं नाही! आतांच्या टेक्नोसँव्ही पिढीच्या आधीची पिढी नक्कीच त्या आठवणींत रमली असेल. क्वचित कुणी त्या जपून ठेवलेल्या आठवणींच्या कुपीतल्या सुगंधाची अनुभूती भरभरून पुन्हां घेतली असेल. 


आतां पोस्टमनशी आपला तसा प्रत्यक्ष संबंध येत नाही, कारण प्रत्येकाच्या गेटबाहेर एक पत्र पेटी असते, आणि आपण आपल्या सवडीने ते पत्र काढून घेतो, किंवा पेटी ऐवजी आणखी कोणी तरी तिथे असतो... वॉचमन!


तर मंडळी आजचा बलुतेदार आहे...


*राखणदार, रखवालदार, वॉचमन*


पूर्वी खेड्यांतील घरांची दारंही  मजबूत नसायची. त्यामुळे चोरण्यासारखं  कांहीच नसलेल्या त्या घरांना रखवालदाराची काय गरज! तालेवारांच्या घरांच्या दाराला लागून आंतल्या दोन्ही बाजूने दोन ओसऱ्या असत. त्याला 'ढाळज' म्हणत. एखादा हरकाम्या सालदार गडी रात्री तिथेच मुक्कामाला राहून रखवालदारी करीत असे. 


पण घरांत चोरी करण्यासारखं कांही नसलं तरी शेतांत मात्र उभं पीक कापून घेण्याच्या घटना घडत असतात  किंवा एखाद्या रानटी  जनावरांचा कळप पिकांचा सत्यानाश करीत असतो. एखाद्या शेतकऱ्याकडे बटाईदार किंवा एखादं कुटुंबच राखणदार म्हणून वस्तीला असते. ते नसले तर शेतकरी स्वतः आपल्या पिकाची राखण करीत असतात. बांधाला बांध लागून असलेले शेतकरी रात्री एकमेकांना हाकारे घालून रात्र जागत ठेवतात. 


दिवसां मात्र पक्ष्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी एका क्रूसासारख्या बांधलेल्या  दोन काठ्यांपैकी आडव्या काठीला शर्ट आणि डोक्याच्या जागी एक मडकं ठेवून, त्यावर नाक डोळे रंगवून माणसासारखा दिसणारा बागुलबुवा उभा करतात आणि पक्षी त्याला घाबरत असतील अशी स्वतःची समजूत करून घेतात.


आतां हिरव्या पिकांनी डोलणारी शेती भुईसपाट झाली आणि त्याच काळ्या मातीत, सिमेंटच्या जंगलातली कर्र कर्र आवाज करणारी, मोठ्ठे लोखंडी गेट असलेली, आभाळाकडे झेपावणारी, आधुनिक खेडी निर्माण झाली. तिथं राहणारी सगळीच प्रजा कमी-जास्त प्रमाणात संपन्न, साहजिकच सोसायटीच्या रहिवाशांवर लक्ष ठेवण्यासाठी, त्यांच्या जाणाऱ्या, येणाऱ्या गाड्यांना गेट उघडण्यासाठी, चोरां पासून रक्षण करण्यासाठी इत्यादी इत्यादी कारणांसाठी वाँचमनची गरज पडू लागली, आणि अशिक्षित/ सुशिक्षित बेकार, मुख्यत्वे परप्रांतीय युवकांना ते हट्टेकट्टे नसले तरी एक नवीन रोजगार उत्पन्न झाला.,


कांही ठिकाणी आपले प्रोजेक्ट ऊभारण्यासाठी ज्यांच्या जमिनी बेभाव खरेदी केल्या आणि त्यांना दिलेले रोख पैसे त्यांनी उडवल्यावर त्यांच्याच मुलांना आपल्या प्रोजेक्टमध्ये वाँचमन किंवा तत्सम नोकऱ्या देऊन त्यांच्यावर जणू उपकार केल्या सारखे दाखवले जाते. 


फक्त सोसायटीतच नव्हे तर कंपन्या, ऑफिस, सराफांची किंवा इतरांची मोठी दुकानं, शॉपिंग माँल्स, बंगले, शाळा-कॉलेज, बँक, इत्यादी इत्यादी ठिकाणी वाँचमनची गरज पडू लागली. 


पण त्यांनी स्वतः दिलेल्या आपल्या परिचयावर विश्वास कसा ठेवायचा? 'कुंपणानेच शेत खाल्लं तर?'... मग वेगवेगळ्या सिक्युरिटी एजन्सी निर्माण झाल्या. त्यांनी या सगळ्या रखवालदारांची हमी घेतली आणि *रक्ष रक्ष रखवालदार:* असं म्हणत सगळेजण निर्धास्त झाले. अर्थात तरीही *तळं राखील तो पाणी चाखील* असंही होतच असतं.


बऱ्याच जणांचे स्वतःचे बंगले असतात. मुलांच्या हौसेखातर जॉईंट फॅमिली च्या सोईप्रमाणे त्यांचे बांधकाम होते, त्यामुळे भविष्यात दोन वेगवेगळ्या कुटुंबांची मालक आणि भाडेकरू या नात्याने सोय होऊ शकत नाही. त्यामुळे आजच्या काळांतील 'न्यूक्लिअर फॅमिली' मुळे त्या एवढ्या मोठ्या बंगल्यात बहुतेकदा वयस्कर जोडपी राहत असतात. मग त्यांची सोय आणि सुरक्षितता ह्याचा विचार करुन आवारांत कमीत कमी मूलभूत गरजा भागतील अशी एक खोली बांधली जाते. आणि 'एकमेकां साह्य करू' असं म्हणत एखादं गरीब,गरजु कुटुंब तिथला रखवालदार म्हणून राहण्यास तयार होतं. 


बाकी इतर ठिकाणी वॉचमनकरीता पावसासाठी आडोसा म्हणून गेट जवळ  कांचा असलेली, छोटीशी  केबिन असते, कांही ठिकाणी तर ती उघडीच असते. केबिनच्या बाहेर बसण्यासाठी एखादा स्टुल...खुर्ची नाही, कारण नाहीतर तो तिच्यावर 'आरामांत' झोपून जाईल म्हणून...


म्हणून कुठेही, कांहीही विपरीत घडलं तर सर्वप्रथम वाँचमनला जबाबदार धरून त्याची चौकशी केली जाते.


तर आजच्या काळांतील अति आवश्यक असा हा आधुनिक बलुतेदार... स्वतःच्या खाजगी वाँचमनशी आपल्याला जुळवून घ्यावेच लागते, नाहीतर तो केव्हां  सोडून जाईल ही भीती, पण आपल्या सोसायटीच्या, कंपनीच्या वाँचमनला येता जाता त्याने केलेल्या अभिवादनाला तितक्याच आदराने प्रतिसाद दिला, एखाद-दोन शब्दाने त्याची फक्त चौकशी जरी केली तर... त्याला नक्कीच आपल्याबद्दल आत्मीयता वाटेल, (या संवयीमुळे एका कंपनीत चुकुन कोंडल्या गेलेल्या अधिकाऱ्याच्या सुटकेची कहाणी वाचलेली आठवते.)


ऊद्या भेटुया एका वेगळ्या बलुतेदाराला...


सौ. भारती महाजन-रायबागकर

bharati.raibagkar@gmail.com

9763204334

Monday, May 24, 2021

20 आधुनिक बलुतेदार

 *20*  *आधुनिक बलुतेदार*

        

काल कितीवेळा डोक्यावरून हात 'सहजच' फिरवल्या गेला... आपल्याच हो... कोणी कोणी 'त्याचं'... म्हणजे सध्यातरी आपलंच...कौशल्य पुन्हां आजमावून पाहिलं!


सध्या ज्यांचे विवाह ठरले आहे त्या भावी वर -वधूंना आपले विवाह पुढे ढकलावे लागत आहेत किंवा सर्व नियम पाळून जमेल तसे उरकून घ्यावे लागत आहेत? ठिक आहे... पण तोपर्यंतच्या *ह्या मंतरलेल्या दिवसांत* तासन् तास फोनवर बोललो, अगदी व्हिडिओ कॉल वर... तरी त्याला आधीच्या, जरा अलीकडच्याच जमान्यांतील, जराशी वाट पाहायला लावणाऱ्या पत्रांची सर कशी येणार! आणि ते आणून देणाऱ्या  व्यक्तीचीही...तो म्हणजे...


               *पोस्टमन*


पूर्वीची खेड्यांतील जनता निरक्षर, अंगठेबहाद्दर असायची. (आतांचा अंगठेबहाद्दर म्हणजे कॉम्प्युटर साक्षर... नव्हे मास्टर.) एखादं पोरगं शाळेत शिकत असलं तरी अक्षरं वाचता येतील याची खात्री नसायची. गांवात पोस्ट नसलं तरी शेजारच्या मोठ्या गांवातून, किंवा तालुक्यांतून आठ-पंधरा दिवसांनी 'डाकिया डाक लाया' म्हणत पोस्टमन यायचा. पत्र पोहोचवणं हे त्याचं अधिकृत काम असलं, तरी एखाद्या म्हातारीच्या सैनिक असलेल्या लेकाचं खुशालीचं किंवा वाईट बातमीचं पत्र, एखाद्या शेतकऱ्याच्या पोरानं शहरांतून धाडलेली मनीऑर्डर, एखाद्याच्या सातवी- आठवी पास असलेल्या लेकीनं सासरच्यांना चोरून लिहलेलं, पैशाच्या मागणीचं किंवा माहेरी घेऊन जाण्याचं पत्रं अशी सगळ्यांची सुख-दुःखांची पत्रं त्याला वाचूनही दाखवावी लागायची आणि कधीकधी लिहूनही... एखादी दुःखाची खबर ऐकवल्यावर त्यांचं सांत्वन करावं लागायचं, लेकीची खुशाली ऐकल्यावर किंवा लेकाची मनीऑर्डर मिळाल्यावर, ती माऊली त्याचीच अलाबला घेऊन त्याला घोटभर चहा द्यायची. आपल्या सैनिक लेकासाठी त्याच्याकडून पत्रही लिहून घ्यायची, पण 'खत लिख दे, साँवरिया के नाम बाबु' अशी आर्जव करणारी  ग्रामीण प्रेमिका कदाचित सिनेमातच असावी.


शहरांत मात्र या पत्रांतील मजकुराचं स्वरूप बदललं. लोकंही बर्‍यापैकी साक्षर झाले. पोस्टमन कडून वाचून घ्यायची गरज उरली नसली तरी 'चिट्ठी आई है' हेच एक संपर्काचे साधन असल्याने त्याची वाट मात्र आवर्जुन पहावी लागत असे. खाकी युनिफॉर्म घातलेला, खांद्यावर पत्रांची खाकी बँग अडकवलेला, हातांत 10-15 पत्रांचा गठ्ठा घेतलेला पोस्टमन यायची वेळ झाली, कीं पाय आपोआप नेहमी ऊघड्या असलेल्या दारांतच रेंगाळत असत. त्यामुळे तो दुरूनच दिसल्यावर आनंदानं फुललेला चेहरा, हातांनच कांही नाही आज अशी खूण करत पुढे निघून गेला, कीं औदासिन्याचे काळे ढग चेहऱ्यावर दाटून येत. छोटी मुलं तर 'पोश्मन काका, आमचं पत्...लं द्या नं 'असं ओरडत त्याच्या मागं लागत असत. कधी पोस्टमननं आणलेल्या पत्रांत ओठांवर हसूं आणणारी आनंदाची बातमी असे, कधी अक्षरं धुसर होणारी दुःखाची खबर... कधी आई बापाची माया ठासून भरलेली ऊबदार पत्रं असत, तर कधी एखादं गुलाबी पत्र भावी जोडीदाराची किंवा झालेल्या साथीदाराची गालांवर गुलाब फुलवणारी असत. त्या त्या पत्रांनुसार त्यांची कमी-जास्त पारायणही होत.  पण एक मात्र झालं...शहरांतल्या पोस्टमनला त्या पत्रांत काय आहे हे कधीच कळत नसे.


संपर्काच्या साधनांत उत्तरोत्तर बदल होत गेला, आणि सासरी निघालेल्या लेकीला, कॉलेज/ नोकरीसाठी परगांवी जाणाऱ्या लेकाला, किंवा अन्य कोणालाही निरोप देतांना, 'पत्र टाक बरं पोहोचल्याचं' याऐवजी 'फोन कर, हं, पण फक्त पोचल्याबरोबर नव्हे, तर पोहचेपर्यंतच्या प्रवासांतही...वारंवार असा बदल झाला.


आणि मग पोस्टमनचं अस्तित्व विम्याच्या हप्त्याचं रिमाइंडर, एखाद्या कंपनीचे लेटर, जे ई-मेलवर पाठवू शकत नाही असं, किंवा अशाच एखाद्या औपचारीक कामापुरतं ऊरलं.


कारण आता ही कामं कुरियर सर्विस ची माणसं करतात. गाडीवर येऊन आपलं पाकीट किंवा सामान दिलं, सही केली, आपण थँक्यू म्हटलं, की त्याचं काम संपलं. ना आपुलकी, ना जिव्हाळा, ना एकमेकांच्या सुखदुःखांची खबरबात... ते तरी काय करणार... शहरांत रोज एकाच कंपनीचा एकच कुरीअरवाला येईल असं नाही, वेळही नसतो, त्यामुळे 'आपण भलं, आपलं काम भलं' असा विचार असणं साहजिक आहे.


पोस्टमन प्रमाणे आतां स्त्रियांही पोस्टवुमन म्हणून नोकरी करतात. उन्हांताह्नांत, पाण्या- पावसात हिंडून, कधीतरीच जरी असले, तरी ते आपल्याला पत्र द्यायला जेव्हां येतात, तेव्हा त्यांना क्षणभर बसवून, त्यांचीच विचारपुस करून पाणी विचारलं,  कधीतरी चहाही, आणि हो... दिवाळीला सढळहस्ते पोस्त ही.......तर...


ऊद्या भेटुच, बलुतेदारासह...


सौ. भारती महाजन-रायबागकर, चेन्नई

Bharati.raibagkar@gmail.com

9763204334

Sunday, May 23, 2021

19 आधुनिक बलुतेदार

 *19*   *आधुनिक बलुतेदार*


काल कितीजणींनी आपला बेंगल बॉक्स उघडून पाहिला? आणि  त्यावरून हळुवारपणे हात फिरवत 'कधी घालायला मिळतील आतां या बांगड्या' असं मनाशी म्हटलं... पण त्याबरोबरच केसही सेट करायला हवेत ना... पण सध्यां तर आपणच काळजीपोटी *त्याची* भूमिका निभावत आहोत... 


कळलं नं आजचा  बलुतेदार कोण ते... 


              *न्हावी*


पूर्वी खेड्यांत न्हावी असायचा आणि त्याला न्हावीच म्हणायचे असे नाही, तर प्रदेशानुसार वारीक, म्हाली अशी त्याची नांवं असायची...आणखीही कांही असतील...


बहुधा रविवारी, शाळेच्या सुट्टीच्या दिवशी तो गांवातून चक्कर मारायचा...हातांत एक लोखंडी पत्र्याची, वरून मधोमध दोन्ही बाजूला उघडणारी पेटी असायची. ज्या घरी बोलावलं जाई तिथलं एक जुनं पोतं घेऊन तो आपली बैठक मांडुन पेटीतली, कैची, वस्तरा,साबणाची गोल डबी, ब्रश इत्यादी वस्तू काढून ठेवी.सगळ्या गांवासाठी त्याच वस्तू… इन्फेक्शन? नांवच नको...सगळ्यांची इम्युनिटी का काय म्हणतात ती एकदम ब्येष्ट…


तर आधी लहान मुलांचा नंबर लागायचा. त्यातला एखादं भित्र पोरगं 'मला नाही चकोट करायचं' म्हणून रडत लपून बसायचं. मग कुणीतरी त्याला शोधून न्हाव्यापुढे आणुन बसवे आणि 'चांगली बारीक कर रे' असं न्हाव्याला बजावायचा.  एक एक करत सगळ्या पोरांची तो हजामत करत असे.

तेव्हां 'अमुक कट, तमुक कट' हा प्रकार कुठे होता! सगळे सरसकट नर्मदेतले गोटे... शेंडी असलेले... मोठ्यांची ही तीच गत... गांव गप्पा करत करत ( भिंतीला तुंबड्या लावत) हा कार्यक्रम ऊरकायचा.


 नंतर या लोकांनी अगदी कातच टाकली. छोटी पेटी घेऊन दारोदार हिंडणारे न्हावी इतिहासजमा झाले. लहानशा खेड्यांत सुद्धां एखाद्या छोट्याशा टपरीत आरसा आणि एखादी खुर्ची एवढ्यांवर कोणताही न्हावी आपले बस्तान बसवू लागला.


शहरांतल्या न्हाव्याची बातच और... त्यांना आतां कुणी न्हावी म्हणत नाही. त्यांच्या लहानशा दुकानावर सुद्धा आतां 'हेअर कटिंग सलून' किंवा 'केशकर्तनालय' अशी पाटी दिमाखात झळकत असते, आणि काचेच्या दर्शनी दरवाज्यांतून समोरासमोरच्या दोन्हीं पूर्ण भिंतीवर मोठे आरसे, खुर्च्या, वेटिंगसाठी वेगळ्या खुर्च्या, वाचायला पेपर, मासिकं असं दृश्य दिसत असतं. 


मोठ्या पार्लरचा तर वेगळाच थाट, जो बाहेरून कधीच दिसत नाही, आणि आंत मध्ये दाढी, कटिंग, याशिवाय हेड मसाज, बॉडी मसाज, 

स्टीम, शाँवर इत्यादींची सोय असते. केसांची स्टाईल सिनेमांतील एखाद्या प्रसिद्ध हिरो प्रमाणे बदलत असते, हे झालं पुरूषांचं...


आतां स्त्रियांच्या केशरचनेतही कपड्यां प्रमाणेच आमूलाग्र बदल झालाय, बालपणीच्या 'झिट्टु' पासून रिबिनी बांधलेल्या दोन घट्ट वेण्या, नागिणीसारखा पाठीवर रूळणारा चित्ताकर्षक लांब शेपटा, बट वेणी, पाच पेडी वेणी, सागर चोटी, घट्ट, सैलसर अंबाडा इथपासून सुरू होऊन सरळ भांग, डाव्या- उजव्या बाजूचे भांग, नागमोडी भांग... आणि वेणी घालायला वेळच नाही असं म्हणत कापून टाकलेले 'झुल्फे बिखराती चली आयी हो' असं गाणं सुचण्याला कारण ठरणारे, मोकळ्या केसांत माझ्या तूं जिवाला गुंतवावे म्हणणारे...त्यांत यु शेप, स्टेप कट्, स्ट्रेट कट ( बस इतकेच प्रकार आठवतायेत.)इथपर्यंत प्रवास झाला.


स्वतःला वेण्या घालता येईपर्यंत आईच्या, बहिणीच्या, घरांतील इतर मोठ्या बायकांच्या हातून वेणी घालून घेणे हाच पर्याय असायचा. पण आता वेण्यांची फॅशनही आउटडेटेड झाली. 


मग ह्या निरनिराळ्या कटसाठी, हेअरस्टाईलसाठी 'लेडी न्हावी' (न्हावीण पेक्षा हे बरं वाटतं नं  ऐकायला!)  पुढे सरसावल्या. घरांतील एखाद्या खोलीतील घरगुती पार्लर पासून 'अमुक ब्युटी पार्लर' नांवाच्या पाट्या गल्लीबोळात दिसू लागल्या. पण केसांबरोबर बाकीचे प्रश्नही महत्त्वाचे होते. मग त्याचे रीतसर प्रशिक्षण देणारे महागडे कोर्सेस सुरू झाले. माऊथ पब्लिसिटी ने एखाद्या पार्लरवालीची किर्ती दूर-दूर पसरू लागली. 


आता लग्नातही वधूवरांना, हो वरां नाही... पार्लरमध्ये जाणे मस्ट असते. वधूसाठी तर विवाहपूर्व विधीं पासून ते विदाई पर्यंत, तिच्या केश-वेशभूषे पासून मेंदी आणि वस्त्र परिधानाच्या स्टाईलने रंगरूप निखरण्यासाठी एक ब्युटी पार्लर वाली नियुक्त केलेली असते, पूर्वीच्या काळांतील राजकन्ये सोबतच्या दासीसारखी ती वधू बरोबर तिचा मेकप नीट करत वावरत असते. 


या पार्लरचं अत्याधुनिक स्वरूप म्हणजेच स्पा. त्याविषयी इतक्या थोड्या शब्दांत कसं लिहु!


कांही वर्षांपूर्वी कांही समाजात असलेल्या केशवपनासारख्या तिरस्कृत रूढी साठी ज्या न्हाव्याचा अमंगल स्पर्श नकोसा वाटत होता, त्याच समाजांत आतां स्री- पुरुष भेदभाव न मानता एक 'व्यक्ती' म्हणून कोणासाठीही ह्या सेवेसाठी मान्यता मिळाली आहे...

' कालाय तस्मै नमः '


आतां पुढचा बलुतेदार ऊद्या...


सौ. भारती महाजन- रायबागकर, चेन्नई

bharati.raibagkar@gmail.com

9763204334

Saturday, May 22, 2021

18 आधुनिक बलुतेदार

 *18* *आधुनिक बलुतेदार*


काल दिव्यांचा -पणत्यांचा उल्लेख झाल्याने जरासा दिवाळीचा माहोल तयार झाला! पण त्या आधीही बरेच सण येतात आणि तोपर्यंत जर लाँक डाऊन संपलं ( आणि ते संपेलच) तर सर्व नियम पाळून, स्वतःची काळजी घेऊन ते सण आपण नक्कीच साजरे करू शकतो. मग त्यासाठी नटणं, सजणं आलंच. आणि इतर साजशृंगारा बरोबरच बांगड्याही हव्यातच.


 त्याच बांगड्या घेऊन आलाय आजचा बलुतेदार...

       

              *कासार*


पूर्वी गा़वामध्ये, खेड्यांमध्ये एखादं कासाराचं घर असायचं. नागपंचमीला आणि दिवाळीला स्वतःबरोबर माहेरी आलेल्या लेकी, बहिणींना साडीचोळी बरोबरच कांचेच्या बांगड्या भराव्या लागत. सौभाग्याचं वाण असे ते. खानदेशांत अक्षय तृतीयेला हा मान असतो. 


मग अशा सणाला कासाराला बोलावणं जाई. आजूबाजूच्या सखी, शेजारणी, माहेरवाशिणी गोळा होत. आणि मग, ' ह्यो रंग चांगलाय यश्वदे, तुज्या हाताला लय सोबल बग,' 'नगं, नगं, लई नाजूक हायती, सासरी जायपत्तोर  बांगड्या टिकायला हव्यात' अशा चर्चेनंतर तिच्या हातांच्या गाळ्यानुसार (आतांपर्यंत सव्वा-दोन, अडीच, पावणे -तीन ह्या घड्याळांच्या वेळा असतात, एवढंच मला माहिती होतं.  (ते गाळ्याचे माप कसं असतं हे अजूनही कळलं नाही.) मग एकदाच्या त्या बांगड्या तिच्या हातांत  चढत आणि 'लई नादर दिसतोय हात अशी पावती मिळाली कीं दिवसभर ती आपला हात निरखत राही. लग्नकार्यांत तर कासाराला केवढा मान... लग्नासाठी पाव्हण्या बायका जमल्या कीं कासाराला आमंत्रण जाई आणि तोही आडव्या तारेत ओवलेल्या बांगड्या असलेली लाकडी चौकट ( हे त्याचं  फिरतं छोटेखानी दुकान )गळ्यांत अडकवून लगबगीनं हजर होई. यावेळी फक्त हिरव्या रंगाला प्राधान्य. त्यावरील जरीवर्ख कमी-जास्त एवढंच. नवरीबरोबरच प्रत्येकीच्या हातांत हिरव्या बांगड्या दिसत, आणि लग्न घरच्या पाव्हण्या ओळखु येत.


 आतां सर्वच गोष्टींत काळानुसार बदल झाला तर बांगड्या तरी मागे कशा राहणार! 'चूडी खनके' असं सांगणारी बांगडी कांचेचीच हवी ही संकल्पनाच बदलली. पितळीच्या, सोन्या-चांदीच्या, हिऱ्याच्या, प्लॅस्टिकच्या, लाखेच्या, एक ग्रॅमच्या, मोत्यांच्या, खड्यांच्या, अमेरिकन डायमंडच्या, पूर्वीच्या 20 पैशांच्या नाण्यांच्या, (आणखी कशाकशाच्या असतात?) सुद्धां बांगड्या तयार होऊ लागल्या. 


आता बांगड्यांचे एवढे प्रकार विकायला ठेवण्यासाठी 

  'अमुक बांगडी महल', 'तमुक बेंगल हाऊस' अशी *फक्त*  बांगड्यांची दुकानं थाटल्या गेली. आपण घातलेल्या प्रत्येक कपड्यांवर मॅचिंग बांगड्या घालण्याची फॅशन आली. 'मेरे हाथों में नौ नौ चुडियाँ हैं ' असं म्हणणार्‍यांची हौस पुरवण्यासाठी सगळी बाजारपेठ सज्ज झाली.


 मग एकदम यू-टर्न आल्यागत एका हातांत एखादी सोन्याची बांगडी किंवा कुठलंही रूंदसं कडं किंवा कांहीच न घालण्याकडे आणि दुसऱ्या हातांत घड्याळ घालण्याकडे कल वाढु लागला. आणि बांगड्यांची किणकिण अडचण वाटू लागली. 


बांगड्या घालण्याशी किंवा कुठल्याही दागिन्यांचा संबंध *फक्त* बायकांच्या आरोग्याशी निगडित आहे असं ठरवल्या जातं, ते खरंही असावं...किंवा ती तडा जाणारी आणि फुटणारी कांच प्रतीक म्हणून...'हँडल विथ केअर' असं लिहलेली... किती नुकसान...आणि कदाचित म्हणुनच पुरूष आवेशांत

बोलायचं किंवा……...असलं तर…

'मी कांही बांगड्या भरल्या नाही हातांत' असं ठणकावुन सांगत असावेत.


फिरोजाबाद बांगड्यांसाठी प्रसिद्ध आहे. बालमजुरीला कायद्याने बंदी असली तरी लहान आकाराच्या बांगड्या बनवायला लहानच हात लागतात,  म्हणून दिवस ऊजाडण्यापूर्वी लहान मुलांना झोपेतून उठवून,  भट्टीच्या उच्च तापमानांत  गरीब आईबाप त्यांना बांगड्या बनवायला घेऊन येतात, असं वाचण्यात आलं, म्हणून बांगड्या घालणं बंद करावं तर... फक्त एवढंच पिढीजात कौशल्य असणाऱ्या त्या अशिक्षित कुटुंबांनी आणि मोठ्या शहरांत आपली बांगड्यांची जड चौकट घेऊन फिरणं शक्य नसलं तरी पैशांअभावी दुकानही सुरू न करता येणाऱ्या कासारांनी काय करावं... हा तिढा कांही सुटत नाही.


उद्या बघू एक नवीन बलुतेदार...


सौ.भारती महाजन-रायबागकर

bharati.raibagjar@gmail.com

 9763204334

Friday, May 21, 2021

17 आधुनिक बलुतेदार

 17    *आधुनिक बलुतेदार*

         

अजुन दिवाळी खूप दूर आहे. त्यामुळे येत्या दिवाळीपर्यंत तरी हे सर्व जगावर आलेलं संकट दूर होऊ दे आणि आपली घरं रंगात रंगून जाऊदे ही शुभेच्छा...


मग अशी रंगवलेली घरं उजळायला दिवे, पणत्या हवेतच ना!

 तेच घेऊन येतोय आजचा बलुतेदार... 

       

              *कुंभार*


 पूर्वी गांवाच्या एका बाजूला कुंभारांची वस्ती असायची. त्याला कुंभारवाडा म्हणत. भरपूर पाणी घालून भिजत घातलेला, चाळून घेतलेल्या मातीचा चिखल, भिजलेला चिखल पायाने तुडवून मऊ करणारा कुंभार किंवा कुंभारीण, एका बाजूला लाकडाचं मोठं चाक आणि मधल्या बोथट आरीवर भांड्यांच्या आकारानुसार मातीचा गोळा घेऊन छोटी-मोठी मडकी, रांजण, दिवाळीच्या पणत्या, संक्रांतीला सुगडी करणारे कुंभार, एका बाजूला अर्धवट वाळलेली, भाजलेली भांडी, एका बाजूला चरणारं गाढव असं दृष्य दिसायचं कुंभार वाड्यात...


पाणी पिण्यासाठी माठ, पाय धुण्यासाठी दारांत रांजण, भाजी (कालवण) बनवण्यासाठी छोटं मडकं, दही घालण्यासाठी वेगळं मडकं, दूध तापवण्यासाठी वेगळं मडकं, आणि थोडंफार धान्य धुन्य साठवण्यासाठीही मडक्याचीच उतरंड...प्रत्येक प्रसंगात वापरल्या जाणाऱ्या मडक्यालाही वेगवेगळ्या नांवाने संबोधले जाते.हा भाग वेगळा. 


खेडेगांवातील घराघरांतील संसाराची या भांड्यांची गरज पुरवणाऱ्या, फिरत्या चाकावर मातीला सुबक आकार देणाऱ्या कुंभाराची ही कथा...


गांवाकडे, मध्यम शहरांमध्ये अजूनही लग्नकार्यात मातीच्या कळसांचं पर्यायाने ते घडवणाऱ्या कुंभारांचं महत्त्व आहे. मारवाडी आणि इतर कांही समाजातील लोक वाजत-गाजत कुंभारवाड्यात जाऊन डोक्यावर कलश घेऊन कार्यस्थळी घेऊन येतात. आजकालच्या आधुनिक युवक-युवतींच्या लग्नांतही आतां ही पारंपारीक रीत फँशन म्हणून सांभाळली जाते. 


पण स्वयंपाकासाठी आणि पिण्याचं पाणी साठवण्यासाठी तांबे, पितळ, स्टील, अँल्युमिनीयम, हिंडालियम, नाँनस्टिक इ.चा शोध लागला, आणि मातीच्या माठाची गरज फक्त ऊन्हाळ्यांत पाणी पिण्या पुरती उरली. ( तरीही कोणाकोणाला फ्रिजचंच पाणी हवं असतं, हा भाग वेगळा.) कोणी कोणी माठ वर्षभरही वापरतात. पाणी साठवण्यासाठी आतां प्लास्टिकची पिंपच

सोयीची होऊ लागली. आतां खेड्यांत माणसंच उरली नाहीत मग मातीची भांडी तरी कितीशी  लागणार!...


त्यामुळे शहरांत मोक्याच्या जागी या कुंभारांनी दुतर्फा आपली दुकानं थाटली. पण फक्त माठ बनवून थोडंच भागणार... मग सिझन प्रमाणे उन्हाळ्यांत माठ, पावसाळ्यांत कुंड्या, दिवाळीत पणत्या, अक्षय तृतीयेसाठी छोटीशी मडकी, संक्रांतीसाठी लहानशी सुगडी आणि हो........मुखी अंगार घेऊन अपरिहार्य अशा 'त्या' प्रवासासाठीही ...अशी व्हरायटी दिसू लागली. माठांतही मग *घटाघटांचे रूप आगळे* तसे काळे, लाल, नळ लावलेले, साधे, गोल, उभट, आणि आतां तर रंगवलेले, त्यावर डिझाईन काढलेले आकर्षक माठ विकायला असतात. तहान भागते आणि स्वयंपाक घराची शोभाही वाढते. कुंड्याही लहान-मोठ्या वेगवेगळ्या आकारां प्रमाणेच प्लेन किंवा थोडीफार डिझाईन असलेली असतात. त्यांच्या जोडीला असतात रंगीबेरंगी फुलापानांची अनेक रोपं...त्या रोपांच्या आणि फुलांच्या मोहानं माणसं तिथे थांबतातच, आणि कुंभारांचा व्यवसाय थोड्याफार प्रमाणात चालू राहतो. 


मध्यंतरी दिवाळीच्या पणत्यांवर इतर वस्तूंप्रमाणे चिनी मातीचं टिकाऊ म्हणून अतिक्रमण झालं होतं. पण ती खरेदी करतांना...कच्च्या मातीची भांडी...जी फुटली तरी (आणि ती तर आतां परगांवाहुन, परप्रांतातुनही मागवावी लागतात, त्यामुळे नुकसान जास्त) नाशवंत म्हणून अखेर मातीतच मिळणार... आणि व्यवहाराच्या दृष्टीने आपल्यासाठी थोडीशी नुकसानकारक असली, तरी त्यामुळे कुंभारांची घरं चालणार, हेही लक्षांत घ्यायला हवं. 


नंतर या मातीचं रूपांतर टेराकोटा मध्ये झाले. ज्यामध्ये तुटफूट होण्याचं प्रमाण अतिशय कमी असतं.  कांही दिवसांपूर्वी तांब्याच्या भांड्यांचं महत्व आपल्या मनांवर बिंबवलं होतं, मातीच्या भांड्यां बाबतही हेच घडतंय. ते खरंही असेल /आहे... मग पाणी भरून ठेवण्यासाठी आकर्षक जार, *कुणा मुखी पडते लोणी* तसं विरजण लावण्यासाठी सुबक आकाराचं छोटंसं भांडं, पोळ्या करण्यासाठी टेराकोटाचा आकर्षक, दांडीचा तवा, अशी विविध कारणांसाठी विविध भांडी, पुन्हा माती पासून माती पर्यंत प्रवास...! ज्या वेड्या कुंभाराने  आपलं हे मातीचं शरीर बनवलं ते आपण, ही माती, पर्यायाने निसर्ग वाचवण्यास हातभार लावतो अशी मनाची समजूत करून घेऊन धन्य होतो...पण खरंच तसं होतं...?


 मध्यंतरी कुंभारांची एक खंत वाचण्यात आली, टेराकोटाची भांडी आकर्षक आणि पक्की भाजलेली असल्याने टिकाऊ असली तरी फुटल्यावर मातीत मिसळत नाहीत. पण *या मातीच्या* भांड्यांच्या जोरदार मार्केटिंग मुळे आणि माणसांच्या गैरसमजुतीमुळे मुळ, नैसर्गिक माती मात्र वेगाने नष्ट होत आहे, जी निर्माण होण्यासाठी बरीच वर्षं लागतात. 


आणि पुन्हां गरीब, दरिद्री, अडाणी कुंभार मात्र मातीला आकार देण्यापुरतेच ऊरतात, त्यांचं काय... त्यामुळे दिवाळीत जेव्हां आपण 'टिकाऊ म्हणून, दिखाऊ म्हणून, रंगवलेल्या, मोहक पणत्या' खरेदी करण्याचे ठरवू तेव्हां...संध्याकाळी सगळं जग उजळलेलं असतांना त्याच्याही झोपडीत एखादा दिवा लागेल, असं पाहु या?


ऊद्या हजर होते एका नव्या बलुतेदाराला घेऊन…


सौ.भारती महाजन-रायबागकर

bharati.raibagkar@gmail.com

9763204334

Thursday, May 20, 2021

16 आधुनिक बलुतेदार

 *(16)* *आधुनिक बलुतेदार*

       

 काल कोणी कोणी घरांतल्या फर्निचर वरून आपली नजर फिरवली आणि कोणाकोणाच्या त्याबद्दलच्या आठवणी... सुताराच्या नांवासकट जाग्या झाल्या... एखाद्या वेळेस आपल्याला असा अपवादात्मक इतका चांगला सुतार सापडतोही कीं आपण दुसऱ्या गांवी शिफ्ट झालो तरी, शक्य असेल तर त्याला तिथंही काम करायला घेऊन जातो. पण असे भाग्यवान विरळाच...


आजचा बलुतेदार घेऊन आलाय... *रंग*


         *रंगारी - पेंटर*



पूर्वी म्हटल्याप्रमाणे गांवातल्या मातीच्या घरांना साधारण दिवाळी आणि अक्षय तृतीया, नागपंचमी यासारख्या सणांच्या वेळी वर्षांतून किमान दोनदा रंगकाम केलं जायचं. दिवाळीला तर नक्कीच... रंग काम म्हणजे काय तर पिवळी माती आणून पोतेरं घेऊन रंगवायची. कधीकधी दुसरेही तत्सम रंग वापरले जात. ज्यांना तो रंग आणणं शक्य नसे, ते चुलीच्या धुरानं धुरकटलेलं घर चुना लावून जरासं उजळत, बाहेरील दर्शनी भागांत गेरूनं

 एखादा पट्टा किंवा पानं, फुलं,  सूर्य-चंद्र इत्यादी काढत, ज्यांना हेही शक्य नसायचं ते साध्या मातीनं घरं लिंपायचे. या सगळ्यांसाठी कोणी रंगारी यायचे नाहीत. त्यासाठी कांही प्रशिक्षण घ्यावं लागतं हे कोणाच्या गांवीही नव्हतं. सगळे रंगकाम पुरुष आणि स्त्रिया, बहुतांशी स्त्रिया स्वतःच करत.

हं...नेहमीसारखे तालेवार... त्यांच्या घरी मात्र बारमाही राबत असलेल्या गडीमाणसांना या कामाचाही भार ऊचलावा लागायचा.


आतांपर्यंत छोट्या, मध्यम गांवातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नव्हती. दिवाळी आली आणि शाळांना सुट्ट्या लागल्या कीं घर सफाई बरोबरच मुलांच्या *मदतीने* हे रंग काम हसत-खेळत पार पडायचं.नव्या रंगाने खुलणारं घर पाहिलं कीं सर्वांना आपल्या मेहनतीचं सार्थक झाल्यासारखं वाटायचं.


 आता आधी बैठे बंगले, मग रो हाऊसेस, फ्लॅटस् चा जमाना आला. त्यांत राहणाऱ्यांनी स्वतः रंग काम करायचं? कांहीतरीच काय!... हुशार लोकांनी समाजाची ही गरज नेमकी हेरली आणि एक नवा आधुनिक बलुतेदार उदयाला आला. चुकत, शिकत त्यांत हळूहळू सुधारणा होऊ लागली. एशियन पेंट, नेरोलँक सारख्या नामांकित कंपन्यांनी रंग मार्केट काबीज केलं. पिवळ्या आणि तत्सम इतर रंगांची माती केव्हांच हद्दपार झाली. आणि ती जागा साधा पेन्ट, प्लास्टिक पेन्ट, अँक्रलिक पेन्ट अशा चढत्या क्रमाच्या रंगांनी घेतली. 


घराचा आंतील रंग आणि बाहेरचा रंग वेगळा... एकाच घरांतील प्रत्येक खोलीतील रंगही वेगळा... खोलीत एकाच रंगाच्या दोन शेड्स, विरुद्ध रंगांच्या दोन शेड्स, एकच भिंत  हायलाईट, टेक्श्चर असे नाना प्रकार आवडीनुसार ठरू लागले. त्या रंगांच्या शेड्सही आता कॉम्प्युटरवर प्रत्यक्ष दिसू लागल्या आणि पूर्वीची पांढरा रंगाचा स्टेनर टाकून आधीची शेड पुन्हा करतांना डोळ्यांनी अंदाज करण्याची रीत कालबाह्य झाली. आता शेडचा नंबर पाहिला कीं तोच रंग लगेच तयार.

ब्रशची जागाही विविध प्रकारांनी घेतली आणि आतां तर रोलर, स्पंज अशी सोप्पी साधनं वापरली जातात.  रंगांबरोबर रंग देणाऱ्यांचेही स्वरूप बदलले. पूर्वी पेंटर स्वतः च एखादा मदतनीस घेऊन घराला रंग द्यायचा. आतां पेन्टरची टीम तयार असते. त्यामुळे तो अनेक साईट्सवर कामं करू शकतो. कधी कधी मात्र तो एकाच ठिकाणचे पेंटर दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातो आणि त्यांची येण्याची  वेळ उलटून गेल्यावर आपण फोन केला तर 'दो दिन छुट्टी है' असे बिनदिक्कत सांगून टाकतो. अशावेळी सगळ्या खोल्यांतील सामान मध्यभागी आणून, झाकून ठेवलेल्या, घरांतील स्वयंपाकघरासह सगळ्या खोल्यांच्या जागा तात्पुरत्या बदललेल्या, त्या अर्धवट रंगलेल्या, धुळभरल्या घराकडे आपले न रंगलेले हात चोळत बसण्याशिवाय आपल्याजवळ पर्याय नसतो. यावेळी मात्र हे सुताराचे सख्खे भाऊबंद वाटू लागतात. 


घराच्या दर चौरस फुटावर रंग द्यायचे  भरमसाठ दर ठरवणारे कॉन्ट्रॅक्टर, उप-कॉन्ट्रॅक्टर प्रत्यक्ष रंग देणाऱ्या, फाटके जुने कपडे घालून, उंच झुल्यावर चढून कधीकधी जीवाची जोखीम उचलणाऱ्या कारागिरांना पोटापुरती मजुरी तरी देतात की नाही कुणांस ठाऊक!


कधी मिळणार प्रतिष्ठा आपल्या देशांत श्रमाला असा विचार करून तेव्हां मात्र मन विषण्ण होतं. 


ऊद्या पुढच्या बलुतेदाराला भेटु...


सौ. भारती महाजन-रायबागकर 


bharati.raibagkar@gmail.com

9763204334

Wednesday, May 19, 2021

15 आधुनिक बलुतेदार

 *(15)* *आधुनिक बलुतेदार*

         

किती जणांना काल आपलं कॅन्टीन आठवलं? गृहिणी असणाऱ्यांनाही आपलं कॉलेज कॅन्टीन आणि ओघानं सोबतच्या मैत्रिणीही नक्कीच आठवत असतील... मोठ्ठा अवांछित ब्रेक मिळाल्यामुळे आत्ताचे कॉलेजगोइंग्ज, नोकरदार वर्ग तर ते 'मिस्'  करतच असतील... मला खात्री आहे, सीनियर सिटीझन्स सुद्धां भूतकाळाच्या त्या दिवसांचा मनोमनी फेरफटका मारून आले असतील...खरं ना...


आता़ बघू या आजचा बलुतेदार...


             *सुतार*


गांवातील सुताराला प्रामुख्याने बैलगाडी, नांगर आणि इतर शेतीची अवजारे बनवणे, त्यांची दुरुस्ती करणे अशी कामं असायची.

इतर सामान्य लोकांच्या मातीच्या घराला एखादं लाकडाचं दार असायचं. पण गरीबांच्या कुडाच्या झोपडीला तसंच एखादं पत्र्याचं किंवा तुराट्याचं दार असायचं.  त्यामुळे कडी कुलुपाचा प्रश्नच नसायचा. तसंही त्यांच्यासारख्याकडे चोरण्यासारखं असणार तरी काय म्हणा...

 पण सरपंच, पाटील इत्यादी तालेवार यांच्या वाड्याला मात्र भरपूर दारं-खिडक्या असायची. छप्परही लाकडाचंच असायचं. त्याला माळवद असं म्हणत. फर्निचर म्हणजे बाकं, पलंग, खुर्च्या इत्यादी एकाच छापाची असली तरी लाकडाची असायची. 


आतां सिमेंट चा शोध लागला आणि लाकडाची मक्तेदारी संपली. आधी फक्त बैठे बंगलेच असायचे. पण त्यांची दारं, खिडक्या लाकडाचीच असायची. आतां उंच टाँवरच्या जमान्यांत आणि सिमेंटच्या जंगलात दाराच्या चौकटी सुद्धा सिमेंटच्या बनु लागल्या, खिडक्यांची तावदानं कांचेची झाली खरी... पण फर्निचरचं प्रस्थ मात्र खूप वाढलं. घर घेतांनाच प्रत्येक वस्तूंची जागा नियुक्त करण्यात येते. कधी कधी त्यासाठी इंटेरियर डेकोरेटरचे मत विचारांत  घेण्यात येतं. मग सुरु होते सुताराची शोधाशोध... आप्त-मित्र परिवारांत  कोणाकडे सुतार काम चालू असलं तर त्याची कुंडली विचारण्यात येते आणि त्याचे-आपले छत्तीस गुण जुळतात काय ते तपासण्यात येतात. त्या गुणांपुढे मोठ्ठा 'पण' असला तरी त्यांतल्या त्यांत कोणाचा 'पण' सुसह्य करणं सोप्पं ठरेल याचं निदान करून त्याला पाचारण करण्यात येतं. मग त्याची मजुरी, प्लायवूड आणि इतर सामानाचा खर्च याचा ताळमेळ जमला कीं शेवटचा कळीचा प्रश्न...' कितने दिन लगेंगे?' ज्याचं खरं उत्तर कधीही मिळत नाही.


 नंतर घरी करून घ्यायचं कीं त्याच्या कारखान्यांत तयार करून आणायचं याचा उहापोह होतो, ज्या चोखंदळ लोकांचा घरी करून घ्यायचा आग्रह असतो त्यांना मग आधी त्यांच्या वेळेनुसार घरातली कामं आटोपणं, सर्व सामान यादी बर हुकूम आणलं तरी आयत्या वेळी आणखी सामान आणून देणं, त्यांचं चहापाणी करणं,  त्यांच्याकडून दिवसाच्या शेवटी सर्व पसारा आवरून घेतल्या नंतरही स्वतः स्वच्छ करावं लागणं इत्यादी इत्यादी कामं करण्याची तयारी ठेवावी लागते.मुख्य म्हणजे त्यांच्या करवती, हातोड्यासारख्या अवजारांच्या आवाजांत आपली दुपारची झोप हरवते आणि आपण हे 'आ बैल मुझे मार' असं का केलं असा प्रश्न स्वतःलाच विचारतो. सांगितलेल्या मुदतीपेक्षा दोन-तीन दिवस जास्त होऊनही बरंच काम शिल्लक राहतं आणि मग आपल्या संयमाची परीक्षा सुरू होते. आणि आपण जर गृहिणी असु, नव्हे असतोच, म्हणून तर आपल्याला हौस असते नं आपल्या समोर मनासारखं काम करून  घ्यायची...जे कधीच होत नाही... आणि घरांतील सर्व जण आपापल्या  कामांवरून घरी परत आल्यावर आपण वैतागून सुतारांविरूद्ध तक्रारी चा पाढा वाचण्यास सुरुवात जर केली तर... 'तुलाच हौस फार, आधी सावध केलं होतं नं...मग भोगा आपल्या कर्माची फळं' असंही ऐकावं लागतं...


जे सुज्ञ असतात ते कारखान्यांत फर्निचर करायला सांगतात. आणि जे 'महासुज्ञ' असतात ते 'फर्निचर शॉप' मध्ये जाऊन, दोन पैसे जास्त देऊन मनपसंत फर्निचर घरांत आणुन मोकळे होतांत. हे टिकाऊ नाही असं जर कोणी म्हटलं तर 'जाऊ द्या हो, नाहीतरी काय शाश्वत आहे या जगांत' असा तत्त्वज्ञानाचा मुलामाही देतात. असं असलं तरी कांही वेळा सुताराची गांठ घ्यावी लागतेच, हा भाग वेगळा...


आतां लाकडी फर्निचर मॉलचा मालक सुतारच पाहिजे असा कांही नियम नाही. कोणीही आपल्या स्वत:च्या कारखान्यांत कुशल/अकुशल कामगार कामांला ठेवून ग्राहकांच्या पसंतीनुसार फर्निचर बनवून घेतो आणि भरपूर फायदा मिळवतो. पण त्या सुतारांच्या मजुरी बद्दल तेच जाणोत...कारण श्रमाला प्रतिष्ठा नसणाऱ्या आपल्या देशांत त्याबद्दल न बोललेलंच बरं...शेवटी काय, काळाची पावले ओळखावी हेच खरं... ज्यांनी ओळखली तोच ह्या जगांत तरू शकतो...


आता उद्यां पुढचा बलुतेदार...


सौ.भारती महाजन-रायबागकर

bharati.raibagkar@gmail.com

9763204334

Tuesday, May 18, 2021

14 आधुनिक बलुतेदार

 *(14)*  *आधुनिक बलुतेदार*


      

कालचं पादत्राणांचं वर्णन वाचून आपल्या दाराकडे लक्ष गेले की नाही? त्यातील कितीतरी जागच्या जागीच चुळबूळ करत असतील बिचारी... अगदी आखडली असतील आपल्या पायांसारखीच...कधी मोकळ्या हवेत आपल्याला घेऊन जातो असं झालं असेल त्यांना... 

विशेषतः आपल्या कॉलेजमध्ये किंवा ऑफिसमध्ये... कारण आपल्या सारखीच आपली आणि या ठिकाणांची वाट पाहणारा कुणीतरी असेल तिथं...


          *कँटीनवाला*


पूर्वी नोकरदार लोकं विरळाच सांपडायचे, उत्तम शेतीच असा समज, तरीही गांवातील बसस्टँडजवळ एखादे हाँटेल असायचेच. एखादी पत्र्याची शेड आणि डुगडुगतं बाकडं असं त्याचं साधारण स्वरूपअसायचं. लाऊडस्पीकरवर मोठ्ठ्या आवाजांत एखादं गाणं वाजत राहायचं. आणि हाँटेलमालक सगळ्या गांवाला नांवानिशी ओळखायचा. त्यामुळे गावकर्‍यांपेक्षा त्या गांवाला येणारा एखादा प्रवासी एखाद्या गावकर्‍याची चौकशी करतांना चहाही प्यायचा, आणि गप्पा करतांना त्या गावकऱ्याबद्दल नवीन माहितीही मिळवायचा...


आतां आपलं ऑफिस किंवा कॉलेज मधील कॅन्टीन...गांवातल्या हाँटेलचं आधुनिक स्वरूप...आपलं विरंगुळ्याचं ठिकाण... मित्र-मैत्रिणींबरोबर कांही पर्सनल गोष्टी शेअर करणे किंवा इतर कांही सार्वजनिक, त्यासाठी ते अगदी हक्काचे ठिकाण असते.कोणाकोणाचं खाजगीत काय चालु आहे याचं रसभरीत चर्वितचर्वण…"तुला म्हणुन सांगते/सांगतो,कोणाला सांगु नकोस हं" असं कानापाशी तोंड नेऊन आजुबाजुच्या सर्वांना ऐकु जाईल अशा आवाजांत इथेच सांगितल्या जातं.आँफिसातील बाँसवरचा राग इथेच काढल्या जातो. त्याभरांत समोरचे पदार्थ जरा वेगानेच घशांत ढकलल्या जातात.अर्थात लंचटाईम संपायच्या आंत त्याच बाँसच्या धाकाने आँफिसांत पोहचायचं असतं नं! विवाहिता असतील तर घरांतील सगळ्या सगळ्या प्राँब्लेमचा उहापोह इथेच होत असतो. कधी त्यावर उपाय मिळतो तर कधी बदसल्ला देऊन तो आणखी वाढवल्या जातो. सांगणाऱ्याचं मन हलकं होतं एवढं मात्र खरं.


तिथले आपले ठराविक टेबल गाठले कीं कॅन्टीनवाला बहुतेकदा ऑर्डर न देतांच आपल्याला हवे ते आणून देत असतो. आपली आवड त्याच्या व्यवस्थित लक्षांत राहते. आपला फुललेला  किंवा पडलेला चेहरा... त्याच्या नजरेतून सुटत नाही. आपण प्रसन्न दिसलो आणि कॅन्टीन कॉलेजचं असलं तर डोळे मिचकावून "काय काम झालं वाटतं" असं विचारणार आणि चेहरा पडलेला दिसला तर हातांनेच फुलीची खूण करून नापास काय असं विचारणार. तेच ऑफिसचं असलं तर," काय साहेब, प्रमोशन मिळणार वाटतं", किंवा "घरचा प्राँब्लेम आहे कां? काळजी करू नका, सगळं ठिक होईल" असं आकाशाकडे हात दाखवून म्हणणार. दोन्ही वेळेस अगदी अगत्याने विचारपूस करण्याने ऑफिसच्या कलीग इतकाच तो जवळचा होऊन गेलेला असतो.


ऊद्या बघुया पुढचा बलुतेदार...


सौ. भारती महाजन- रायबागकर

bharati.raibagkar@gmail.com

9763204334

Monday, May 17, 2021

13 आधुनिक बलुतेदार

*(13)*  *आधुनिक बलुतेदार*


- 'सुवर्णकार' वाचून कोणाकोणाला वेगवेगळे दागिने आठवलेत? कोणाकोणाची ( एखाद्या गोड कारणासाठी) खरेदी राहून गेली या लाँकडाउनमुळे? 


 आतां आजच्या बलुतेदाराची ओळख करून घेऊ या...


       *चर्मकार ( चांभार)*


पूर्वी गांवातल्या एकाच चांभाराकडे सगळ्या गावकऱ्यांची कामं असायची.

कामं म्हणजे काय, तर शेतकऱ्यांच्या नव्या मोटा शिवायच्या, आणि जुन्या दुरुस्त करायच्या. पुरुषांची कर् कर् वाजणारी पायताणं बांधून द्यायची, आणि ती झीजेस्तोवर त्यांची दुरुस्ती करत राहायची. गांवातल्या तालेवार घरांतले पुरुष कधीकधी जोडा घालायचे. बायकांच्या चपला ही गरजेची नव्हे तर ऑप्शन ची वस्तु होती. तशाही खेड्यातील बायका गावांबाहेर पडेपर्यंत चपला घालीत नसत, ही बाब वेगळी. मुलांच्या पायांना तर कितीतरी मोठं होईपर्यंत चपला माहीत नसायच्या. त्यामुळेच चांभारा जवळ वर्षभर काम नसलं तरी तो गांवात असणं गरजेचंच होतं. 


आत्तां कांही वर्षांपूर्वीपर्यंत जरा मोठ्या गावात किंवा शहरांत चपला बुटांची सामान्य दुकानं होती. बहुतेक दुकान मालकच स्वतः ऊठून आपल्याला आपल्या मापाचे चपला-बूट दाखवायचे. पसंती साठी दोनच रंग...काळा किंवा लाल... डिझाईन पेक्षांही मजबूतीला गिऱ्हाईकांचं प्राधान्य...  'बाटा' हे एकच कंपनीचं नांव सर्वसामान्यांना माहिती होतं. त्या कंपनीची महागडी (तेव्हांची) पादत्राणं घालायला मिळाली तर स्वतःला धन्य समजण्याचा तो काळ...


 आता कुत्र्यांच्या छत्रीसारखे जागोजागी सर्वसाधारण दुकानं तर उगवलीच आहेत, पण पॅरागॉन, नाइके, स्केचर्स, आदिदास,(इथेही पुन्हा माझं अज्ञान आडवं येतंय )इत्यादी बाटा कंपनीची  सख्खी, सावत्र, चुलत इ. भाऊबंद उदयाला आलेली आहेत. आणि लेदरच्या पादत्राणां पासून ते कापडी, प्लॅस्टिक, रबर इत्यादी प्रकारांपासून उन्हाळी, पावसाळी, हिवाळी... वाँकींगचे, ट्रेकिंगचे, रनिंगचे, सिटिंगचे, फिटिंगचे इत्यादी उपप्रकार इथपर्यंत त्यांची रेंज निर्माण झाली आहे.


पुन्हां बायकांसाठी स्टोन लावलेले, डेकोरेट केलेले, रंगीबेरंगी, कपड्यांना मॅचिंग बरहुकूम...हाय हिल्स, फ्लँट, डॉक्टर्स...चप्पल, सॅंडल्स, स्लीपर्स, ( घरांत घालण्यासाठी, घरांतल्या त्या 'विशिष्ट' जागेसाठी...अबब... एवढंच आठवतांना दमछाक झाली माझी )इतके उपप्रकार,उप-उपप्रकार असतात आणि घरांतील प्रत्येक सदस्यासाठी या सगळ्या प्रकारांतील 'किमान' एक तरी जोड असतोच. त्यामुळे आपल्या घराच्या दर्शनी भागांत चपला बुटांचे एक छोटेखानी? दुकानच असतं.

 

आतां ब्रँडेड वस्तूंचाच बोलबाला आहे. त्यामुळे छोट्या दुकानांत जाऊन खरेदी करणं आपल्या स्टेटस् ला शोभत नसतं. त्या मोठ्या कांचेतुन आरपार दिसत असलेल्या आकर्षक शोरूम मध्ये प्रवेश केल्यानंतर मालक अदबीनं आपले स्वागत करतो. नोकर सौजन्याने बसायला सांगतो. कोणासाठी खरेदी करायची आहे हे कळलं आणि जर ती स्त्री असली तर सिंड्रेलाच्या पायांत राजपुत्राने ज्या नजाकतींनं कांचेचा बूट चढवला असेल तसा तो आपल्या पायांसमोर ते पादत्राण धरतो. तेव्हा त्यांच्या किंमतीकडे...(यांच्या किंमती तीन आकड्यांपासून ते चार आकड्यांपर्यंत... माझी धाव इथपर्यंतच ) दुर्लक्ष करून त्या वाजवीच आहेत हे समजून घ्यावं लागतं. 


ही झाली आपल्याला प्रत्यक्ष भेटणारी माणसं. पूर्वी फक्त साध्या चपला, बूटं, मोट शिवत असलेल्या ह्या पिढीजात चर्मकारांच्या जमातीनं आता कौशल्यानं ही विविधरंगी, विविधढंगी पादत्राणं बनविण्याचं प्रशिक्षण घेतलं आहे आणि पडद्याआड राहून ते एखाद्या कारखान्यात त्यांचे उत्पादन करत आहेत, ही चांगली बाब आहे. कारण जो काळाबरोबर चालला तोच तरला.


 नाहीतर अजूनही रस्त्यांवर, झाडांखाली आपली पारंपारिक  चांभारकीची हत्यारं सांभाळत, जाणार्‍या येणाऱ्यांच्या पायांकडे आशाळभूत नजरेने बघणाऱ्या चांभाराचा प्रपंच कसा चालत असेल कोणास ठाऊक... 


 कारण आतांच्या 'युज अँड थ्रो' च्या जमान्यांत आपल्या फॅशनेबल पादत्राणांना त्याचं गावठी ठिगळ कोण लावून घेणार...


आतां उद्या बघू या कोणत्या बलुतेदाराची गाठ पडते ते...


सौ.भारती महाजन-रायबागकर

bharati.raibagkar@gmail.com

 9763204334

Sunday, May 16, 2021

12 आधुनिक बलुतेदार

 *(12)* *आधुनिक बलुतेदार*


      काल आपण आपल्या कपड्यांइतकेच शिंप्याच्या स्वभावाचे कांही नमुने पाहिले. त्याला कंटाळून आपण आपले कपडे घरीच शिवावेत निदान ब्लाउज किंवा ड्रेस तरी असा निश्चयही कोणी कोणी केला असेल...


आतां आपण आजच्या बलुतेदाराची ओळख करून घेऊ…


                *सोनार*


एखाद्या जरा बऱ्याशा गांवातच सोनार असायचा. अगदी लहान खेड्यांपाड्यांतील लोकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असायची तिथं सोन्याचे दागिने दुरापास्तच. तरीही एखादी माऊली आपल्या मजुरीचे पैसे वाचवून आणि आपल्या पोटाला चिमटा घेऊन एखाद्या नागपंचमी किंवा दिवाळीसारख्या सणाला हौसेखातर सोन्याचे चार मणी घडवून गळ्यातल्या काळ्या मण्यांच्या पोतीत अडकवायची तेव्हां तिच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय असायचा. तेही घडवायला तिला आपल्या घरधन्याला शेजारच्या गांवातच पाठवावं लागायचं. त्या सोनाराचं वेगळं असं कांही दुकान क्वचितच असायचं. आपल्या घराच्या पुढच्या पडवीतच आपलं पेटी वजा बैठं टेबल टाकून तो काम करायचा. जवळ एक पेटलेली चिमणी असायची आणि दागिने घडवायची जुजबी नाजूक अवजारं... सोनार एक तर वजनांत, भेसळ करण्यात, भावांत कुठेतरी सोनं खाणार म्हणजे खाणार अशी ठाम समजूत आणि बहुतांशी ती खरीही असायची. त्यामुळेच 'सोनार, शिंपी, कुलकर्णी, अप्पा, यांची संगत नको रे बाप्पा'अशी म्हण पडली तरी त्यांच्या शिवाय तरणोपाय नसायचा. आतां  सोनाराचं असं स्वरूप लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. खेडोपाडी जे थोडेफार उरले असतील तेवढेच...


तरीही आतां आतांपर्यंत शहरांमध्ये सोनारांची अशी छोटी -मोठी दुकानं असायची. अजुनही कांही असतील.पण ती नगण्यच. त्यांचा कारागीर तिथे एका बाजूला काम करत बसलेला असायचा. नाजूक, दिखावटी, भेसळयुक्त दागिन्यांपेक्षा गुंतवणूक आणि परतावा म्हणून शुद्ध दागिन्यांचाच आग्रह असायचा. पेशवाईनंतरच्या जमान्यांत दागिन्यांचे ही मोजकेच प्रकार असायचे/असावेत. पाटल्या, बांगड्या, अंगठ्या, मोहनमाळ, एकदाणी, पोहे हार, चपलाहार, मंगळसूत्र (तरी बरेच झाले कीं... जाणकारांना आणखीनही कांही माहिती असतील) खानदानी,श्रीमंत स्त्रिया यातील बहुतेक रोज घालत असाव्यात? 


पण कपड्यांमध्ये जशी नित्य नवीन फॅशन बदलते तशी दागिन्यांत ही बदलत गेली, नव्हे, भारतीय स्त्रियांचा सोस आणि हौस पाहून काही कल्पक सोनारांनी ती बदलायला लावली असावी. अमूक एका ड्रेसवर हे नाजूक दागिने, पैठणीवर, शालूवर भारदस्त दागिने, संक्रांतीच्या काळ्या साडीवर मोत्याचे दागिने... शिवाय लग्नांतले दागिने रिसेप्शनला कसे चालणार! त्या त्या प्रसंगाच्या कपड्यांना साजेशे हवेतच ना! शिवाय आतां ऐतिहासिक मालिकांमधील स्त्रियांसारख्याच पण जुन्या-नव्या कलाकुसरीच्या 'फ्युजन' करून घडवलेल्या दागिन्यांची आपल्याला भुरळ न पडली तरच नवल.


आतां हा एवढा व्याप वाढल्यावर आणि बाहेर दुष्काळ,अवर्षण,अतिवर्षा अशा संकट व्याप्त जगाचा काहीही संबंध नसणार्‍यांच्या दुकानांत भरभरुन वाहणाऱ्या गर्दीला तेवढंच दुकान थोडं पुरणार होतं! मग शहराच्या एखाद्या मॉडर्न, उच्चभ्रू लोकांच्या विभागांत त्यांनी दोन, तीन,पांच मजली, ए.सी. असलेली, बस्त्यासाठी स्वतंत्र खोल्या असलेली प्रशस्त दुकानं उभारली, त्याच्या दोन-तीन शाखा काढल्या. सोन्या-चांदीं प्रमाणेच प्रत्येक दागिन्यांचे... 'पुरुषांसाठी सुद्धां' वेगळे विभाग/ उपविभाग निर्माण केले. बायकांची खरेदी निवांत व्हावी म्हणून मुलं सांभाळणार्‍या नवऱ्यांसाठी गुबगुबीत सोफ्यांची व्यवस्था केली. इतकंच नाही तर पाणी आणि कॉफी देणार्‍या फिरत्या नोकरांची फौज ठेवली, आणि 'बोला काय सेवा करू' असं नम्रपणे विचारणाऱ्या या सोनारांनी सगळ्या गोष्टींची, परंपरेची हमी देत आपल्याला आकर्षुन घेतलं.

(छे, बुवा... कसं तरी वाटतं ऐकायला, काय बरं म्हणावं यांना, सराफ? सुवर्णकार?, पण ते तर 'बिजनेसमन' आहेत, कारागीर तर एखाद्या छोट्याशा खोलीत बारीक नजरेनं, मान मोडून, पोटासाठी काम करीत असतात, जे आपल्याला कधीच दिसत नाहीत.) 


हॉलमार्क,मजुरीचे पर्सेंटेज, 22- 23 - 24 कॅरेटचा स्पष्ट उल्लेख असलेल्या या पारदर्शक व्यवहारांत  इन्व्हेस्टमेंटपेक्षांही हौस म्हणूनच घेतल्या जाणाऱ्या दागिन्यांच्या कारागिरीत त्यांना सोनं  नक्कीच खाता येत नसेल, मग यांचं पोट तरी कसं भरत असेल असा भाबडा प्रश्न मला त्या प्रशस्त  दुकानांकडे, तिथे काम करणाऱ्यांकडे आणि  हिऱ्याच्या, नवरत्नाच्या अंगठ्या, ब्रेसलेट आणि गळ्यांत सोनं, प्लॅटिनमच्या साखळ्या घातलेल्या दुकानमालकाकडे पाहून पडतो.


 आणि जातां जातां... ज्या आपल्यासारख्यांच्या जीवावर (पक्षी- दागिन्यांवर) ते एवढे मोठे होतात, त्या/ ते आपण मात्र ते दागिने लॉकर मध्ये ठेवून  (तो एक वेगळाच मुद्दा आहे.) संन्यासिनी सारख्या राहतो.)वैराग्य आलं म्हणून नव्हे…त्या मोठमोठ्या फ्लेक्सवर पिवळे चमचमणाऱ्या, झळकणाऱ्यांकडे नका बघु बाई...हे आपलं उगीचच... हं!


आतां उद्या आणखी एक वेगळा बलुतेदार...


सौ. भारती महाजन- रायबागकर 

bharati.raibagkar@gmail.com

9763204334      

Saturday, May 15, 2021

11आधुनिक बलुतेदार

 *(11)* *आधुनिक बलुतेदार*


       -सध्यां या लाँक डाऊन च्या काळांत आपण सगळे घरात बसलो असलो तरी डॉक्टर्स मात्र जिवाचं रान करून पेशंटला वाचवण्याचा प्रयत्न करताहेत. अशावेळी त्यांच्या घरच्या माणसांची मन:स्थिती काय होत असेल याची कल्पना केलेली बरी. देवाहून काय कमी आहेत ही मंडळी आतां ! आणि 'ओल्याबरोबर सुकंही जळतंय' त्याप्रमाणे *सगळेच* डॉक्टर्स गैरसमजाच्या वावटळीत सांपडले जात आहेत. अशावेळी सगळ्यांनीच तारतम्याने आणि विवेकाने वागायला हवे, हो नं…!


 आतां ओळख करून घेऊ आजच्या बलुतेदाराची…


                 *शिंपी*


- पूर्वी गांवात एखादाच शिंपी असायचा. क्वचित एखादी महिला घरगुती शिवणकाम करून  द्यायची.

फॅशनचा तर प्रश्नच नसायचा. मुलांचा एखादा कपडा सैल झाला तर वाढत्या अंगाचा शिवला असं म्हणता येई, लहान झाला तर बहुतेक लहान भावंडं असायचंच घालायला. जुन्या बायकांच्या चोळ्या एकाच प्रकारच्या असायच्या. आणि ब्लाऊज ही अंगासरशी झालं कीं 'ब्येस' असायचं. त्यामुळे शिंप्याचं काम सोप्पं असायचं…


आतां मात्र समस्त महिलावर्गाचा जिव्हाळ्याचा आणि काळजीचा विषय असणारा हा अवलिया... पुरूषांनाही याची गरज असतेच पण बरेच जणांचा कल आता रेडीमेड कपडे वापरण्याकडे आहे. पुष्कळदां त्यांचा ब्रँड ठरलेला असतो. त्यामुळे त्यांना फारशी फिकीर नसते. शिवून घ्यायचे असले तरी एकच शिंपी ठरलेला असतो. आणि फॅशनला फारसा वाव नसल्याने तक्रारीचंही कांही कारण नसते. आजकालच्या आधुनिक तरूणांची बात मात्र निराळीच.


महिलांचं मात्र सध्या कोणती नवीन फॅशन 'इन' आहे, आणि (जी लगेच बदलत असते) त्याचं बारीक निरीक्षण असतं. पूर्वी फक्त साडी वरील मॅचिंग ब्लाऊजचा समावेश असायचा.फारतर गळ्यांच्या लांबी-रूंदीत, क्वचित व्ही.कट,बदामी,चौकोनी असा भूमितीच्या आकारानुसारही फरक पडे. आतां पंजाबी सलवार- कमीज, चनिया चोळी,मिडी,मँक्सी इ.इ.कपड्यांचा ही प्रश्न उभा राहतो.(आणखी काय काय असतं? मला एवढीच नावं माहिती आहेत, जाणकारांनी माझ्या ज्ञानांत भर घातली तरी चालेल.) 


रेडिमेड घेतले तरी फिटिंगचा प्रश्न असतो आणि शिंप्याचेच पाय धरावे लागतात.(शिंपी त्याच दुकानचा असला तरी) ब्लाउजचे विविध प्रकार असतात, आणि शिंप्यांना (छे..छे, त्यांना आता फॅशन डिझायनर असं संबोधतात.) ते सर्व आत्मसात करावे लागतात. आता त्यासाठी ते रग्गड शिलाई (चार्ज) सांगतात, जी खूपदा  *घडाईपेक्षा मढाई जास्त* असली, तरी ती देण्याची आपली एका पायावर तयारी असते. आखिर लेटेस्ट फॅशन का सवाल है भाई…(बाई)


- एखाद्या लग्नासारख्या जंगी कार्यक्रमांच्या निमित्ताने शिवायला टाकलेले कपडे वेळेवर मिळेपर्यंत आपला जीव खालीवर होतो.एकतर ते इतके विविध प्रकारच्या फँशनचे असतात कीं बस्स.अखेर संपूर्ण कार्यक्रमांत सर्वांच्या नजरा आपल्याकडे वळल्या आहिजेत नं!


 " तुम टैम पर जल्दी देने वाले थे ना "

 या आपल्या प्रश्नावर " किस किस को दु मॅडम, सभी को जल्दी होती है, जरा पहिले कपडा लाते जावो ना" असं बजावून सांगतो, आणि "अरे, फॅशन बदल जाती है न तबतक "या आपल्या उत्तरावर' 'क्या करे इन औरतोंका' असा मिश्किल भाव त्याच्या चेहऱ्यावर असतो.


'कितना कपडा लगेगा' या आपल्या प्रश्नावर तो आपल्याकडे 'आपादमस्तक' बघत कपडा सांगतो.(कारण आपल्याला कळलंच असेल☺️) आणि “इतना कपडा क्यूं लगता है, वो फलाणा तो इतनाच लेता है” या आपल्या तक्रारीवर 'पुन्हां एकदां आपल्याकडे बघत' “मैंने तो बहुत कम बोल दिया है, नहीं तो इससे भी जादा लगता है, आपको किसके पास सिलाना है,सोच लो." असं ठणकावून सांगतो. तरीही तो 'कपडा खातोच ' हे आपलं मत कांही बदलत नाही, पण सांगायचं कोणाला, आपण घरी तर शिवु शकत नाही, आणि दुसरा शिंपी शोधला तरीही तो ह्याचाच भाऊ असणार नाही कशावरून... नव्हे असणारच!

'तेव्हां पुढच्या वेळेस याच्याकडेच यावं लागलं तर....


आतां उद्या पुढच्या बलुतेदाराची ओळख करून घेऊ...


सौ. भारती महाजन- रायबागकर, bharati.raibagkar@gmail.com

9763204335

Friday, May 14, 2021

10 आधुनिक बलुतेदार

 *(१०)* *आधुनिक बलुतेदार*


         सध्यां आपल्या गाड्या क्वचितच घरांतुन बाहेर निघत असतील. त्यामुळे त्यांच्या डॉक्टरांशी भेट होण्याचा प्रश्नच उद्भवत नसेल. त्यामुळे त्याला आणि आपल्याला दोघांनाही चुकचुकल्यासारखे वाटत असेल, खरं नं!

पण लवकरच हे संकट जाईल आणि आपण आपल्या गाडीसह तिच्या डॉक्टरला भेटू....


पण तूर्तास आजच्या बलुतेदाराकडे…

आपल्या डाँक्टरकडे वळु…

         

                 *डॉक्टर*    


 पूर्वी गांवात एखादा वैदु/वैद्य असायचा.गांवकऱ्यांचे आजार तो काढे,चाटण,इ.देऊन बरे करायचा. गांवकऱ्यांचाही त्याच्यावर विश्वास असे. आजीबाईचे बटवे तर घरोघरीं सांपडायचे.छोट्या मोठ्या गोष्टींसाठी त्यातल्या औषधी ऊपयोगी पडत.बहुतेकदा त्या स्वयंपाक घरांतच सांपडत.अजुनही सांपडतात,पण...खूपजणांना रानांतील औषधी झाडपाल्याची माहिती असायचीच. आणि कित्येकदा शेवटचा ऊपाय म्हणजे मांत्रिक...गळ्यापर्यंत आल्यावर मात्र… पुन्हां *डाग्दरच*


आतां शहरांतले डॉक्टर महाशय म्हणजे आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक...आधी फक्त M.B.B.S.झालेल्या एकाच डॉक्टरकडे जवळपास सर्व रोगांचे इलाज होत असत.त्याच्या उपचाराबद्दल कांही शंका नसे.डॉक्टरलाही आणि पेशंट लाही.अर्ध दुखणं तर डॉक्टरच्या गोड बोलण्यानेच बरं होऊन जायचं.


डॉक्टर-पेशंट हे नातं फार जवळिकीचं होतं. डॉक्टर म्हणजे देव आणि डॉक्टरही आपल्या मानवतेच्या मर्यादा सांभाळून ते देवपण निभावून नेत असत. फीसाठी पेशंटला अडवणे हे डॉक्टरांच्या तत्वांमध्ये बसत नसे. पैशांअभावी किंवा हलगर्जीपणामुळे दुखणं अंगावर काढलं तर ते हक्काने रागावत असत. फॅमिली डॉक्टर हे नांव तेव्हां अगदी सार्थ होते. कारण ते रूग्णांच्या इतर घरगुती अडचणींही दूर करण्याचा प्रयत्न करीत असत.


पण आतां जमाना आहे स्पेशालिस्टचा,त्यातही सुपर स्पेशालिटी चा. तेव्हां एकाच डॉक्टरकडे जाऊन चालत नाही. त्यामुळे डॉक्टर लोक व्यवहार जास्त बघतात आणि पैसे कमावतात असा सर्वसामान्यांचा समज आहे. (डॉक्टर होण्यासाठी लागणारा अफाट खर्च पेशंट कडुनच वसुल करणार असं त्याचं समर्थन केल्या जातं,शेवटी हे एक दुष्टचक्र आहे हेच खरं.) कांही अंशी तो खरा असेलही, पण प्रत्येक ठिकाणी अपवाद असतो. 


 आतां काळ बदलला, आणि दुसर्‍या डॉक्टरकडे जावे लागले तरी 'आपल्या' डॉक्टरांचे सेकंड ओपिनियन घ्यावे असाच मनाचा कौल असतो. पेशंटचे म्हणणे शांतपणे ऐकून त्याला धीर दिला म्हणजे पेशंट अर्धा बरा होतो, तोंडभरून दुवा देतो, आणि जन्म भर त्यांच्याशी नातं जोडून ठेवतो.


ता.क. सध्यांच्या ह्या भयानक संकटाच्या काळांत तर प्रेताच्या टाळुवरचे लोणी खाणारे जसे दिसताहेत तसेच माणुसकीचे दिव्य दर्शन घडवणारेही भेटताहेत.

उडदामाजी काळेगोरे असणारच. खरं ना!


आतां पुढच्या बलुतेदाराची ओळख करून घेऊ...पुढील भागांत


सौ.भारती महाजन-रायबागकर

bharati.raibagkar@gmail.com

9763204334

Thursday, May 13, 2021

9 आधुनिक बलुतेदार

 *(9)*  *आधुनिक बलुतेदार*


किराणा दुकानदाराकडून कुणीकुणी सामान आणलं बरं!

मला तर माझ्या लहानपणीच्या किराणा दुकानदाराचं अजून नांव सुद्धा आठवतंय..।

आता लाँक डाऊन च्या काळांत मोठमोठे मॉल्स बंद झाले आणि हे लहान दुकानदारच आपल्या कामी येत आहेत, तेव्हां लाँकडाउन संपल्यानंतरही मॉलच्या चकचकीतपणाला 

 आणि तिथल्या 'निर्विकार' चेहऱ्यांच्या सेल्समनला न भुलता आतां प्रमाणेच ह्या छोट्या दुकानदारांकडून सामान घेणे इष्ट असं मला वाटतं... बरोबर ना!


आता आजचा बलुतेदार बघूया.

     

      * गाडी मेकँनिक*


- पूर्वी खेड्यांमध्ये पाटील, सरपंच किंवा अशाच एखाद्या प्रतिष्ठित कुटुंबात गाडी असायची. ती ही बहुतेक बुलेटच. त्यामुळे त्याचा फार रुबाब असायचा. तो फट्फट् असा आवाज करत रस्त्याने जाऊ लागला कीं लहान पोरं त्याच्या मागे पळायची. बाकीच्या सर्व साधारण जनतेसाठी मात्र आपले पाय (११ नंबरची बस) किंवा बैलगाडी हेच वाहन असायचं.


पण आतां गाडी हे प्रकरण तर 'पाहिजेच' या सदरात मोडत असते. तीही पूर्ण कुटुंबात मिळून एकच गाडी चालत नाही. कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यासाठी आपापल्या पसंतीनुसार एक तरी गाडी असतेच. अतिश्रीमंतांची गोष्टच निराळी, त्यांच्या प्रतिष्ठेनुसार गाड्यांचे प्रकार आणि संख्या यांचे प्रमाण ठरलेले असते. ताफाच म्हणता येईल त्याला. इथे सामान्य जनता गृहित धरूनच विचार केला आहे. त्यांतही अतिसामान्य,सामान्य, मध्यमवर्गीय, उच्चमध्यमवर्गीय हे प्रकार आहेतच. पुन्हां दुचाकी वेगळ्या आणि चार चाकी वेगळ्या... 


आतां एवढ्या गाड्या आहेत,तर त्यांना माणसांइतकंच किंबहुना माणसां पेक्षाही जास्त जपावं लागतं. म्हणजे बघा ना, वेळोवेळी नियमित तपासणी, कांही पार्ट बिघडले तर ते बदलणे किंवा नुसते दुरुस्त करणे...झालं नं एखाद्या पेशंट सारखं…


 आणि पेशंट म्हटले म्हणजे त्यांचे डॉक्टर हवेतच आणि तेही दरवेळी बदलून चालत नाहीत. कारण गाडीचा पूर्जा न् पूर्जा त्याच्या ओळखीचा झालेला असतो. एखाद्या कुशल डॉक्टराप्रमाणे तो गाडीला फक्त हात लावूनच जजसांगतो, "कांही नाही साहेब, मामुली फॉल्ट आहे, होऊन जाईल." आपणही निर्धास्तपणे गाडी त्याच्या ताब्यात देतो. अशावेळी फक्त ती वेळेवर देण्याचा प्रश्न असतो. 

तो तरी काय करेल बापडा! एवढ्या गाड्या असतात त्याच्याकडे. तो रोज उद्याचा वायदा करतो, आणि आपण  निमूटपणे ऐकून घेतो, काय करावं,  अडला हरी...

कधी तो म्हणतो " साहेब, आतां ही गाडी विकून टाका, सारखी सारखी दुरुस्ती परवडत नाही. बाजारांत नवीन मॉडेल आलंय, मी ग्राहक बघून देतो खात्रीचं, फायद्यात पडेल बघा. हा...माझं तेवढं कमिशन..." आपणही " बघू, विचार करून सांगतो "असे आश्वासन देतो. सगळा विश्वासाचा मामला. पण वर्षानुवर्षांचे संबंध असल्याने फसवणूक होण्याची शक्यता नसते.

-कधी आपल्याला म्हणतो, “साहेब मुलाला जरा सांगा, गाडी फार जोरात पळवतो... लहान आहे अजून तो, जरा हळू म्हणावं आणि गाडीची सर्व्हिसिंग करत जा म्हणावं वेळेवर, असा आपुलकीचा, काळजीने सल्ला देणारा... 

जणूं आपल्या कुटुंबातीलच एक...

आता पुढचा बलुतेदार… पुढील भागांत


सौ. भारती महाजन - रायबागकर

bharati.raibagkar@gmail.com

9763204334

Wednesday, May 12, 2021

8 आधुनिक बलुतेदार

 


       *(8)* आधुनिक बलुतेदार


आधी पाहिलेले धोबी महाराज अपवाद वगळता सर्वांच्याच परिचयाचे असतील नं? आणि त्यांच्याशी संवादही थोड्याफार फरकाने सारखाच… हो ना!


आज बघुया...कोणता बलुतेदार आलाय भेटीला,आपलं गाठोडं घेऊन...


         *किराणा दुकानदार*


-पूर्वी गांवात असलेल्या एखाद्याच किराणा दुकानदाराकडे, (त्याला वाणी असंही म्हणत.)फक्त शेतांत न पिकणाऱ्या वस्तूच (तेल, मीठ, साखर, चहा इ.) घ्याव्या लागायच्या. 


आतां माँल संस्कृती येण्याआधीची परिस्थिती कशी होती…

छोटे छोटे दुकानदार सकाळी साडेपाच- सहालाच आपलं दुकान उघडायचे.घराच्या समोरच्या भागात दुकान आणि पाठीमागे घर असायचे.'सामने दुकान, पीछे मकान अशी गत'. त्यामुळे घरांत बसुन एखादं काम करत असतांना किंवा चहा/जेवण घेत असतांना, एकाच वेळी घरांतील माणसांना दुकानाकडे लक्ष देता येत असे.सकाळचे गिऱ्हाईक म्हणजे बहुतांशी चहाची *पत्ती* (पावडर)आणि साखर...एखादा बिस्कीटचा पुडा इ.बस्स.


 एखाद्या कुटुंबाला दर महिन्याला काय काय आणि किती वस्तू लागतात हे वाण्याला तोंडपाठ असायचं. एखाद्या महिन्यांत आपण यादीत कांही वस्तू कमी सांगितल्या तर लगेच म्हणणार," काय ताई/साहेब, गांवाला जायचंय वाटतं? आणि जास्त प्रमाणांत सांगितल्या तर लगेच म्हणणार..."पाहुणे यायचेत वाटतं घरी? हे अमुक-तमुक फार छान आलंय, घेऊन बघा." या घरगुती संवादातून सामाना बरोबरच आपलेपणाची ही देवघेव नक्कीच होत होती. गर्दी नसली तर गल्ल्यावर बसल्याबसल्या इकडच्या तिकडच्या, दुसऱ्या ग्राहकांच्या घरच्या बातम्याही कळायच्या. आपण एखाद्या वेळेस संकोचत ,"शेठ, या महिन्यांत जरा तंगी आहे, मांडुन ठेवा..."असं म्हणेपर्यंत..."अरे, सायेब, कशाला लाजवते, आपलंच दुकान है ना, अरे, एक चाय सांग सायेबांसाठी" अशी आपलीच खातिरदारी करणार. (बहुतांशी हे दुकानदार सिंधी, मारवाडी असे परप्रांतीयच असायचे आणि 

 हिशोबाला पक्के असले तरी त्यांच्या तोंडात बोलतांना नेहमी खडीसाखर असायची.


आतां ओळख करून घेऊ पुढच्या 

 बलुतेदाराची... 


सौ भारती महाजन-रायबागकर

bharati.raibagkar@gmail.com


Tuesday, May 11, 2021

6 आधुनिक बलुतेदार

 *(6)*     *आधुनिक बलुतेदार*


तर कितीजण भाजी विक्रेत्यांकडुन घासाघीस न करता काय काय भाजी घेतात! जरा गंमत केली...

आपण त्यांच्या मेहनतीचे मोल जाणण्याएवढे संवेदनशील नक्कीच आहोत.


आतां या बलुतेदाराला भेटु…


            *फुलपुडीवाला*


-पूर्वी घराच्या अंगणात किंवा शेतांत कन्हेर, जास्वंद, तगर, झेंडू अशी फुल झाडं असायची. सुवासिक नसली किंवा साधी गांवठी जरी असली तरी लोकांची देवपुजेची गरज भागायची. आणि पोरी-बाळीही तीच फुलं घालुन झोकांत मिरवायच्या.


- आतां शहरांत अंगण नाहीच, क्वचित कोणाकडे टेरेस किंवा बाल्कनी असते.पण त्यातुनही आवड असली तर अनुकुलता नसते आणि अनुकूलता असली तर आवड नसते,अशी दांत आणि चण्याच्या गोष्टीसारखी गत. आणि पुष्कळ दा दोन्ही असले तर सवड नसते. मग यावर ऊपाय काय तर फिरायला गेल्यावर दुसऱ्यांची बाग आपलीच समजावी लागते.आणि आपल्या आधी दुसऱ्या कोणी ती फुलं (अगदी कळ्यासुध्दा) तोडुन नेल्या तर त्यांच्या देवभक्तीचा ऊध्दार करत दुसऱ्या दिवशी लवकर येण्याचा निर्धार करावा लागतो.अशावेळी ते फुलझाडांचे मालक/ मालकिन 'फुलवली फुलझाडें दारी, फुलें कां नेती शेजारी' असं म्हणुन नक्कीच कपाळाला हात लावत असतील.


याला पर्याय म्हणून भाजीवाल्यां प्रमाणेच फुल पुडी आणून देणारे आपली देवपूजा साग्रसंगीत पार पाडण्यास हातभार लावतात. देवपूजेला फुलवाल्यांचा आधार असतो आणि चातुर्मासात लागणाऱ्या बेल, दुर्वा, आघाड्यासाठी ही त्यांचीच मनधरणी करावी लागते. एखाद्या फुल विक्रेत्याकडून आपण नेहमीच फुलं घेत गेलो तर तो आपल्याला चांगली ताजी फुलें देतो. आपल्या सोबत कधी आपले 'हे' असले तर, "साहेब, मोगर्‍याचे गजरे घ्या ताईंसाठी, ताज्या कळ्या आहेत बघा" असा सुगंधी आग्रहही करतो.


आतां ओळख करून घेऊ आणखी एका बलुतेदाराची… पुढच्या भागांत


सौ. भारती महाजन- रायबागकर. चेन्नई

9763204334

7 आधुनिक बलुतेदार

 *(7)*        *आधुनिक बलुतेदार*


    घरोघरी फुल पुडी देणाऱ्या फुलवाल्याचा अनुभव सर्वांना असेलच असे नाही.पण बाजारांतील एखादा तरी फुलवाला मात्र आपल्या नक्कीच ओळखीचा असतो.


आतां आजच्या बलुतेदाराची ओळख करून घेऊ...

                    *धोबी*


-पूर्वी बहुतेक लोकांचा पोषाख धोतर आणि बंडी किंवा शर्ट असा असायचा. त्यांना इस्तरीची गरज नसायची, आणि बहुतेकांना अशी चैन परवडायचीही नाही. शाळेत शिकणारी पोरं झेंडावंदनाच्या आदल्या दिवशी लोट्यामध्ये पेटते निखारे टाकून तो गरम लोटा कपड्यांवरून फिरवून, गणवेशाची घडी करून अंथरुणाखाली ठेवून देत, कीं झालं, रात्रभरात इस्त्रीचे कपडे तयार ...


आतां मात्र आपलं अजिबात पान हलत नाही असं आणखी एक व्यक्तिमत्व म्हणजे धोबी. पूर्वीच्या काळी कोळशाची जड भारी इस्त्री असायची. तीही सर्वांकडे असण्याचे दिवस नव्हते आणि विकत इस्त्री करायची चैन सर्वांनाच परवडणारी नसायची. आतां घरातील नर्सरीच्या विद्यार्थ्यांपासून घरांतील ग्रुहिणीच्या ब्लाऊज, ड्रेस पर्यंत सर्वांच्याच कपड्यांना इस्त्रीची गरज असली आणि वजनाने हलकी, ईलेक्ट्रीकची इस्त्री आली तरी त्या साठी कोणाला वेळ नाही. 


धोबी जेंव्हा  सर्वांच्या घरांतील कपड्यांचे गाठोडे सांभाळत, आपले कपडे घ्यायला येतो तेव्हा प्रत्येकाचे कपडे ओळखून बरोब्बर कसे पोचवतो हे कोडे काही आपल्याला उकलत नाही. मराठीच्या कट्टर अभिमानी असलेल्या गृहिणी आणि धोबी, दोघांचा 'आमचे कपडे लवकर कायको नही लाता तुम? साबको वोच कपडे मंगते असतात ना, किंवा ये हमारी साडी कैसे जला दी, आतां मी किट्टीत काय पहनके जाऊ?' या तिच्या प्रश्नावर अजिबात खजील न होता, दुसरी पहनके जाना मॅडम, वैसे भी बहुत पुरानी हो गई थी,किंवा इस्त्री करून आणलेल्या गठ्ठ्यातील एक साडी ऊचलुन,"ये पेहेन लेना,बहो...त अच्छी दिखेगी आपपर…'असं मस्का लावला कीं आपला राग उडन छु...आपला असा मजेशीर संवाद इतरांचं  छान मनोरंजन करतो. 


आपल्यालाही एखाद्या धोब्याची संवय झाली आणि कांही कारणाने दूसऱ्या धोब्याकडे जायची वेळ आली तर कधी त्याच्या हातची कपड्यांची घडी पटत नाही तर कधी तो क्रीज बदलतो म्हणुन आपण कुरकुर करतो. एकंदरीत कुठल्याही माणसांची आपल्याला संवय होते हेच खरं.

कालपरत्वे नदीच्या घाटावर जाऊन कपडे धूणं आणि इस्त्री करून आणुन देणं केव्हांच मागे पडलं आहे. आपलेही फक्त सुती,स्वस्त कपडे जाऊन त्यांत विविध पोतांचे,महागडे प्रकार आले आहेत आणि त्यातील बरेचसे घरी धुता न येणारे आहेत. त्यामुळे आतां रामायणातील परीटाच्या या वंशजांनी किंमती कपडे स्वच्छ करून देतांना 'ड्राय क्लीनर्स' असे भारदस्त नांव घेऊन दुकानंही थाटली आहेत, आणि त्यांचा थाटही और असतो हा भाग वेगळा.


आतां ओळख करून घेऊ आणखी एका बलुतेदाराची… पुढील भागांत...


सौ. भारती महाजन- रायबागकर, 

bharati.raibagkar@gmail.com

9763204334

5 आधुनिक बलुतेदार

 *(५) *  *(आधुनिक बलुतेदार)*


          

असा पेपरवाला कितीजणांना भेटलाय... आजकालची तरुण पिढी इ-पेपरच वाचत असते. फक्त जेष्ठांना मात्र समोर पेपर हवा असतो, असं मला वाटतं, तेव्हां हा पेपर वाला त्यांना जास्त जवळचा वाटला असावा.


आतां आजच्या बलुतेदाराला भेटू. 


           *भाजीवाला*



पूर्वी प्रत्येकाच्या शेतांत थोडंफार माळवं असायचं. माळवं म्हणजे भाजीपाला, घराच्या परसांतही झाडं, वेली असायच्याच. त्यामुळे भाजी शक्यतोवर घरचीच असायची. इतरांच्या शेतांतील  वानवळा,वानोळा (नमुनाही) असायचा.

 त्यामुळे भाजीवाले हा प्रकार जवळपास नव्हताच. 


पण आतां...


दारावर भाजी घेऊन येणारे भाजीवाले किंवा भाजीवाल्या आपला मोठा प्रश्न सोडवणारे मदतनीस असतात. बाहेर जाऊन पायपीट न करावी लागता ते स्वतः मात्र पायपीट करून आपल्याला घरपोच भाजी आणुन देत असतात. वर्षानुवर्षे त्यांच्याकडून भाजी घेत गेलं कीं कोणत्या वेळेस कोणाला काय पाहिजे असते हे त्यांना बरोबर कळते. "घ्या ना ताई, तुमच्यासाठी मुद्दाम आणल्या बघा शेवग्याच्या शेंगा, ताज्या आहेत एकदम' असं म्हटलं कीं किती बरं वाटतं, पण त्याच वेळी ""एवढ्या महाग काय,जरा कमी कर, बाजारात तर स्वस्त मिळतात." अशी आपण जेव्हां घासाघीस करत असतो तेव्हां त्यांच्या डोक्यावर किंवा हातगाड्यावर भलं मोठं ओझं घेऊन ते उन्हांतान्हांत किती किलोमीटर पायपीट करतात हे आपण सोयीस्कर पणे नजरेआड करतो. आणि अशा किती तरी गोष्टी फिक्स रेट असलेल्या माँलसारख्या ठिकाणी निमुटपणे घेऊन टाकतो हे ही विसरून जातो.

   याऊलट एखाद्या वेळेस त्यांना चहा निदान थंड पाणी जरी देऊ केले,त्यांच्या घरच्यांची चौकशी केली तर त्यांच्या मनांत अगदी कृतकृत्य झाल्याची भावना निर्माण होते.आणि नेहमीसाठीच एक ऋणानुबंध तयार होतो.

       आतां आँनलाईनच्या काळांत तर याचा चांगलाच अनुभव येतोय.


- आतां पुढच्या बलुतेदाराची ओळख करून घेऊ… पुढच्या भागांत


सौ.भारती महाजन - रायबागकर

bharati.raibagkar@gmail.com

9763204334

Sunday, May 9, 2021

4 *आधुनिक बलुतेदार*

 *(4)*  *आधुनिक बलुतेदार*


याआधी आपण दूधवाल्याची नव्याने ओळख करून घेतली. आतां दुधाच्या पिशव्या मिळत असल्यामुळे ते किती फँटचं आहे हे वरूनच कळतं, त्यामुळे पाणी घालण्यापेक्षा फक्त उशिरा येणारा किंवा आधी सुचना न देता दूध देणारा एवढाच मुद्दा राहतो…


              *पेपरवाला*


      पूर्वी खेड्यांत घरोघरी कुणी पेपर वाचत नसत. जवळपास सर्वच जण निरक्षर असत. क्वचित दोन चार शिकलेल्या डोक्यांसाठी ग्रामपंचायतीतील हक्काचे पेपर असतंच.


आतां मात्र....

    असाच आपल्या कुटुंबाशी निगडित असलेला एक अपरिहार्य सदस्य म्हणजे पेपर टाकणारा... याच्यांत आणि दूधवाल्यांत खूप साम्य आहे. आपल्याला जसा सकाळचा चहा ताज्या दुधाचाच लागतो, तसाच त्या चहाची लज्जत वाढवण्यासाठी सोबत ताजा पेपर ही लागतो. मग भलेही आदल्या दिवशी त्या बातम्या टीव्हीवर बघितलेल्या असतील आणि त्याच त्याच,निरर्थक म्हणुन वैतागलेही असु.पण पेपर यायला जरासा उशीर झाला कीं आपल्या आत बाहेर फेर्‍या सुरू होतात आणि अशावेळी जर तो पेपर टाकणारा आपल्या तावडीत सांपडला कीं आपला भडिमार सुरु होतो तो अगदी, "बंद करून टाक पेपर उद्यापासून" येथपर्यंत येऊन थांबतो. बहुतेकदां ही मुलं अगदी पोरवयातील असतात. दूधवाल्या प्रमाणे त्यांनाही थंडीची, पावसाची पर्वा न करता पेपर भिजु नये याची काळजी घेत पहाटेच उठून पेपरचे गठ्ठे घेऊन फिरावं लागतं.नाहीतर मालकाची बोलणी ठरलेलीच,शिवाय कामावरून काढुन टाकण्याची टांगती तलवार. पण प्रत्येकालाच तो लवकर पेपर कसा देऊ शकेल हे आपल्या ध्यानांतच येत नाही.

     कांहीजण सकाळी पेपर टाकुन दुपारी शिक्षण घेत असतात. कारण बहुतेक जण गरीब परिस्थितीतीलच असतात. घराला हातभार लावण्यासाठी त्यांना अशी कांही कामं करावी लागतात. आणि कधीकधी मालक आणि गिऱ्हाईक म्हणजे आपण अशा दोघांची बोलणीही खावी लागतात.

मालकाला तर आपण कांही सांगु शकत नाही,तेव्हां आपणच थोडंसं संवेदनशीलतेने वागलो तर....


आतां ओळख करून घेऊ पुढच्या बलुतेदाराची… पुढच्या भागांत


सौ. भारती महाजन- रायबागकर

चेन्नई

9763204334

bharati.raibagkar@gmail.com