Thursday, May 27, 2021

23 आधुनिक बलुतेदार

 *23*  *आधुनिक बलुतेदार*


आपले माळीबुवा आजकाल चलती असलेले आणखी एक काम पण छान करतात बरं... *बोनसाय* ! या जपानी कलेने भारतातही आता छान बाळसं धरलं आहे. बोगनवेल, वड, पिंपळ, लिंबू, संत्री इत्यादींची ही  फळाफुलांनी लगडलेली, देखणी, कमी उंचीची झाडं पाहिली कीं ती पाहून प्रसन्न व्हावं कीं मुद्दाम वाढवून त्यांच्यात कृत्रिम रीत्या परिपूर्णता आणलेली पाहून खंत करावी…? कालाय तस्मै नमः!


पण आतां माळ्याअभावी बाग सुकत चालली असेल आणि आपल्यालाच मातीत हात घालावे लागले असतील तर, चिखल तर लागणारच ना! कपडे बदलण्यासाठी कपाट ऊघडावे तर कपाटातील नवे कपडे आपल्या सहवासा अभावी मलुल झाल्यासारखे वाटतात. आणि घालुन जाणार तरी कुठं? पण घ्यावेसे तर वाटतात, फार दिवस झाले ना नवीन कपड्यांची खरेदी करून... म्हणूनच आपल्याकडे कपडे घेऊन आलाय आजचा बलुतेदार...


            *कापड दुकानदार*


पूर्वी बऱ्याश्या गांवातच एखादं कपड्याचं दुकान असायचं. छोट्या खेड्यात तर नाहीच. लोकांचा पोशाखही धोतर आणि बंडी किंवा शर्ट, नऊवारी लुगडं, चोळी किंवा झंपर, मुलांना हाफ चड्डी आणि शर्ट, मुलींना झगा किंवा परकर पोलकं, बास्स...


एखादा शेतकरी आठवडी बाजाराला गेला की गरजेनुसार, आपल्या पसंतीनं कपडे घेऊन यायचा, तेही एखाद्या मोठ्या सणालाच...


शहरांत दुकानं जास्त असायची, 'अनुभव हीच खात्री' झाल्यावर एखादं स्वस्त आणि त्यांतल्या त्यांत मस्त दुकान नेहमीसाठी ठरवल्या जायचं. पुष्कळदा हा व्यवहार उधारीवर ह्वायचा. मग शाळा सुरू झाली की गणवेश आणि सण आला कीं नवीन कपडे वडीलधाऱ्यांसोबत खरेदी करायला दुकानांत जायचं. मुलींसाठी फुलाफुलांचं डिझाईन असलेलं कापड, आणि मुलांसाठी चौकडा, प्लेन, लाइनिंग हे पॅटर्न ठरलेलं असायचं. त्याच्या विरुद्ध म्हणजे मुलांसाठी फुलांफुलांचे किंवा मुलींसाठी चौकड्याचे कपडे... तोबा, तोबा! एकदा कपड्यांची पसंती झाली कीं... (पोत, रंग आणि भाव पाहून मोठ्यांनी ठरवलेली,) मापानुसार सरसकट सर्व मुलांसाठी आणि मुलींसाठी ठरल्याप्रमाणे एकाच ताग्यातून कपडे घेतल्या जात. आणि ते शिवुन आल्यावर अंगात घातले की ही एकाच घरची मुलं आहेत हे आपणांस समजून येई. (त्यावेळी त्यांना बँड पार्टी वगैरे कोणी म्हणत नसत. )खरं म्हणजे आतां पती-पत्नी आणि मुलं फॅशन म्हणून, मुद्दाम ठरवून, एकाच रंगाचे कपडे घालतात...मग! ड्रेसकोड म्हणतात म्हणे त्याला...


आता तर दुकानांचे स्वरूपच बदलले. मोठ-मोठी किमान दोन-तीन मजली दुकानं...छे, शोरूम्स उभ्या राहिल्या. डिस्प्ले साठी दर्शनी भागांत फॅशननुसार कपडे टांगल्या जाऊ लागले. प्रत्यक्ष कल्पना यावी म्हणून माणसांएवढ्या पुतळ्यांच्या अंगावर ते परिधान केले जाऊ लागले. स्त्रियांचे, पुरुषांचे आणि मुलांचे प्रत्येक कपड्यांच्या प्रकारानुसार, आजकालच्या फँशननुसार ( ती तर काय, दर बारा कोसावर बदलणाऱ्या भाषेपेक्षाही वेगाने बदलते) वेगवेगळे विभाग तयार झाले. 


आणि अशा भव्य दुकानांत प्रवेश करताक्षणी, मालक ज्या अगत्याने, तोंड भरून आपले स्वागत करतो त्याला तोड नाही. “ या, या ताई, फार दिवसांनी आलात, अरे, ताईंना काय पाहिजे बघ बरं” असं जेव्हां तो फर्मावतो, तेव्हां मागच्याच महिन्यांत जाता जाता सहजच डिस्प्ले मध्ये ठेवलेली साडी आवडली म्हणून आपण खरेदी केली होती हे आपण विसरूनच जातो. आणि यानंतर जेव्हां 'या डिझाईन मध्ये दुसरा रंग आहे कां किंवा हा रंग  चांगला आहे पण काठ जरा नाजुक पाहिजे होता, किंवा नव्या फॅशनची, वेगळी दाखवा नं' अशा संवयीच्या चिकित्सक प्रश्नांना ( तुम्ही फॅक्टरीतुनच पाहिजे तशी साडी करून घ्या मॅडम हे ओठावर आलेले उत्तर) बाजूला सारून जेव्हा सेल्समन हसऱ्या मुद्रेनं, न कंटाळता आपल्यासमोर साड्यांचा ढीग लावतो तेव्हां तर आपण कोणी 'व्ही.आय.पी' असल्याचा भास होतो. पण तरीही आपण प्रसन्न न होतांच 'नको आज' असं म्हणत ऊठलो,  तर...'अरे, तो कालच माल आला आहे, त्यांतल्या साड्या दाखवा बरं ताईंना,' या मालकाच्या आज्ञेनुसार  तो जेव्हां त्यांतल्या साड्या काढून आणतो, तेव्हां तर आपण 'व्ही. व्ही.आय.पी, आणि तो  सेल्समन संयम, चिकाटीची कठीण परीक्षा 1 ल्या नंबरने ऊत्तीर्ण झालेला, 'कर्मण्येवाधिकारस्ते, मा फलेषु कदाचन' या उक्तीचं तंतोतंत पालन करणारा कोणी स्थितप्रज्ञ, संत-महंत  असावा असंच वाटतं. 


रेडिमेड कपड्यांच्या दुकानाची हीच गत. आज काल ड्रेसचे तरी किती विविध प्रकार, इंडियन, वेस्टर्न...पूर्वी पंजाबी ड्रेस  ही फॅशनची परमावधी होती.  आता साडी वरच्या ब्लाऊजचेच इतके प्रकार असतात, ड्रेस मध्ये तर सलवार कमीज, चनिया चोली, जीन्स-टाँप यापलीकडे माझ्या कल्पनेची धाव नाही जात.


 एखादा ड्रेस आवडला तर रंग दुसरा हवा, आणि रंग आवडला तर तो ओल्ड फँशनचा असतो. कधी दोन्हींचं सूत्र जमलं तर तो आपल्या मापाला येत नाही. (आणि मग आपण आपलं वजन कमी करण्याची भीष्मप्रतिज्ञा करतो, मनांतल्या मनांत )


'एक नंबर आदमी, दस...अहं...सौ नूर कपडा' हे वचन अक्षरश: सार्थ ठरवण्याच्या जमान्यांत कपाट आपल्या कपड्यांनी कितीही ओसंडून वाहत असलं तरी नवा 'नूर' असलेला कपडा आपल्या वॉर्डरोबमध्ये हवाच... कीं.........


सौ. भारती महाजन- रायबागकर चेन्नई

bharati.raibagkar@gmail.com

9763204334

No comments:

Post a Comment