Friday, May 21, 2021

17 आधुनिक बलुतेदार

 17    *आधुनिक बलुतेदार*

         

अजुन दिवाळी खूप दूर आहे. त्यामुळे येत्या दिवाळीपर्यंत तरी हे सर्व जगावर आलेलं संकट दूर होऊ दे आणि आपली घरं रंगात रंगून जाऊदे ही शुभेच्छा...


मग अशी रंगवलेली घरं उजळायला दिवे, पणत्या हवेतच ना!

 तेच घेऊन येतोय आजचा बलुतेदार... 

       

              *कुंभार*


 पूर्वी गांवाच्या एका बाजूला कुंभारांची वस्ती असायची. त्याला कुंभारवाडा म्हणत. भरपूर पाणी घालून भिजत घातलेला, चाळून घेतलेल्या मातीचा चिखल, भिजलेला चिखल पायाने तुडवून मऊ करणारा कुंभार किंवा कुंभारीण, एका बाजूला लाकडाचं मोठं चाक आणि मधल्या बोथट आरीवर भांड्यांच्या आकारानुसार मातीचा गोळा घेऊन छोटी-मोठी मडकी, रांजण, दिवाळीच्या पणत्या, संक्रांतीला सुगडी करणारे कुंभार, एका बाजूला अर्धवट वाळलेली, भाजलेली भांडी, एका बाजूला चरणारं गाढव असं दृष्य दिसायचं कुंभार वाड्यात...


पाणी पिण्यासाठी माठ, पाय धुण्यासाठी दारांत रांजण, भाजी (कालवण) बनवण्यासाठी छोटं मडकं, दही घालण्यासाठी वेगळं मडकं, दूध तापवण्यासाठी वेगळं मडकं, आणि थोडंफार धान्य धुन्य साठवण्यासाठीही मडक्याचीच उतरंड...प्रत्येक प्रसंगात वापरल्या जाणाऱ्या मडक्यालाही वेगवेगळ्या नांवाने संबोधले जाते.हा भाग वेगळा. 


खेडेगांवातील घराघरांतील संसाराची या भांड्यांची गरज पुरवणाऱ्या, फिरत्या चाकावर मातीला सुबक आकार देणाऱ्या कुंभाराची ही कथा...


गांवाकडे, मध्यम शहरांमध्ये अजूनही लग्नकार्यात मातीच्या कळसांचं पर्यायाने ते घडवणाऱ्या कुंभारांचं महत्त्व आहे. मारवाडी आणि इतर कांही समाजातील लोक वाजत-गाजत कुंभारवाड्यात जाऊन डोक्यावर कलश घेऊन कार्यस्थळी घेऊन येतात. आजकालच्या आधुनिक युवक-युवतींच्या लग्नांतही आतां ही पारंपारीक रीत फँशन म्हणून सांभाळली जाते. 


पण स्वयंपाकासाठी आणि पिण्याचं पाणी साठवण्यासाठी तांबे, पितळ, स्टील, अँल्युमिनीयम, हिंडालियम, नाँनस्टिक इ.चा शोध लागला, आणि मातीच्या माठाची गरज फक्त ऊन्हाळ्यांत पाणी पिण्या पुरती उरली. ( तरीही कोणाकोणाला फ्रिजचंच पाणी हवं असतं, हा भाग वेगळा.) कोणी कोणी माठ वर्षभरही वापरतात. पाणी साठवण्यासाठी आतां प्लास्टिकची पिंपच

सोयीची होऊ लागली. आतां खेड्यांत माणसंच उरली नाहीत मग मातीची भांडी तरी कितीशी  लागणार!...


त्यामुळे शहरांत मोक्याच्या जागी या कुंभारांनी दुतर्फा आपली दुकानं थाटली. पण फक्त माठ बनवून थोडंच भागणार... मग सिझन प्रमाणे उन्हाळ्यांत माठ, पावसाळ्यांत कुंड्या, दिवाळीत पणत्या, अक्षय तृतीयेसाठी छोटीशी मडकी, संक्रांतीसाठी लहानशी सुगडी आणि हो........मुखी अंगार घेऊन अपरिहार्य अशा 'त्या' प्रवासासाठीही ...अशी व्हरायटी दिसू लागली. माठांतही मग *घटाघटांचे रूप आगळे* तसे काळे, लाल, नळ लावलेले, साधे, गोल, उभट, आणि आतां तर रंगवलेले, त्यावर डिझाईन काढलेले आकर्षक माठ विकायला असतात. तहान भागते आणि स्वयंपाक घराची शोभाही वाढते. कुंड्याही लहान-मोठ्या वेगवेगळ्या आकारां प्रमाणेच प्लेन किंवा थोडीफार डिझाईन असलेली असतात. त्यांच्या जोडीला असतात रंगीबेरंगी फुलापानांची अनेक रोपं...त्या रोपांच्या आणि फुलांच्या मोहानं माणसं तिथे थांबतातच, आणि कुंभारांचा व्यवसाय थोड्याफार प्रमाणात चालू राहतो. 


मध्यंतरी दिवाळीच्या पणत्यांवर इतर वस्तूंप्रमाणे चिनी मातीचं टिकाऊ म्हणून अतिक्रमण झालं होतं. पण ती खरेदी करतांना...कच्च्या मातीची भांडी...जी फुटली तरी (आणि ती तर आतां परगांवाहुन, परप्रांतातुनही मागवावी लागतात, त्यामुळे नुकसान जास्त) नाशवंत म्हणून अखेर मातीतच मिळणार... आणि व्यवहाराच्या दृष्टीने आपल्यासाठी थोडीशी नुकसानकारक असली, तरी त्यामुळे कुंभारांची घरं चालणार, हेही लक्षांत घ्यायला हवं. 


नंतर या मातीचं रूपांतर टेराकोटा मध्ये झाले. ज्यामध्ये तुटफूट होण्याचं प्रमाण अतिशय कमी असतं.  कांही दिवसांपूर्वी तांब्याच्या भांड्यांचं महत्व आपल्या मनांवर बिंबवलं होतं, मातीच्या भांड्यां बाबतही हेच घडतंय. ते खरंही असेल /आहे... मग पाणी भरून ठेवण्यासाठी आकर्षक जार, *कुणा मुखी पडते लोणी* तसं विरजण लावण्यासाठी सुबक आकाराचं छोटंसं भांडं, पोळ्या करण्यासाठी टेराकोटाचा आकर्षक, दांडीचा तवा, अशी विविध कारणांसाठी विविध भांडी, पुन्हा माती पासून माती पर्यंत प्रवास...! ज्या वेड्या कुंभाराने  आपलं हे मातीचं शरीर बनवलं ते आपण, ही माती, पर्यायाने निसर्ग वाचवण्यास हातभार लावतो अशी मनाची समजूत करून घेऊन धन्य होतो...पण खरंच तसं होतं...?


 मध्यंतरी कुंभारांची एक खंत वाचण्यात आली, टेराकोटाची भांडी आकर्षक आणि पक्की भाजलेली असल्याने टिकाऊ असली तरी फुटल्यावर मातीत मिसळत नाहीत. पण *या मातीच्या* भांड्यांच्या जोरदार मार्केटिंग मुळे आणि माणसांच्या गैरसमजुतीमुळे मुळ, नैसर्गिक माती मात्र वेगाने नष्ट होत आहे, जी निर्माण होण्यासाठी बरीच वर्षं लागतात. 


आणि पुन्हां गरीब, दरिद्री, अडाणी कुंभार मात्र मातीला आकार देण्यापुरतेच ऊरतात, त्यांचं काय... त्यामुळे दिवाळीत जेव्हां आपण 'टिकाऊ म्हणून, दिखाऊ म्हणून, रंगवलेल्या, मोहक पणत्या' खरेदी करण्याचे ठरवू तेव्हां...संध्याकाळी सगळं जग उजळलेलं असतांना त्याच्याही झोपडीत एखादा दिवा लागेल, असं पाहु या?


ऊद्या हजर होते एका नव्या बलुतेदाराला घेऊन…


सौ.भारती महाजन-रायबागकर

bharati.raibagkar@gmail.com

9763204334

2 comments: