Monday, May 31, 2021

28 आधुनिक बलुतेदार

 *(28)*.  *आधुनिक बलुतेदार*


पूर्वी गावांत नळ नव्हतेच. सगळं पाणी नदी वरून किंवा विहिरीवरून भरलं जायचं त्यामुळे नळ बिघडण्याचा आणि दुरुस्त करण्याचा प्रश्नच नसायचा.

शिवाय गावातलं बाथरूम 

 म्हणजे अंगणातलं अर्धवट साडेतीन भिंतींचं उघडं न्हाणीघर... त्याचं पाणी केळी सारख्या एखाद्या झाडाला जाणार... तुंबण्याचा प्रश्नच कुठे येतोय! आणि प्लंबरची गरज तरी कशाला लागते!


हे सगळे प्रश्न शहरांतल्या बंदिस्त घरांत निर्माण झाले. पुढच्या किंवा वरच्या घरातलं पाणी तुंबलं तरी तो पुढचा किंवा वरचा घरवाला 

 प्लंबरला बोलवायला तयार नसतो. कारण त्याला कांहींच त्रास नसतो. नाइलाजाने आपण त्याला बोलावून आणतो. तो निरीक्षण करतो, आउटलेट वरच्या जाळ्या उघडतो, गाळ साचला असेल तर तो काढतो, आपल्याला 2-4 बादल्या पाणी ओतायला लावतो. घसघशीत मजुरी घेऊन,' झालं साहेब, आतां कांही प्रॉब्लेम नाही बघा, असं म्हणून तो निघून जातो. सगळं सुरळीत झाल्यासारखं वाटुन आपण हुश्श म्हणतो. पण कसचं काय! 4-5 दिवसांनी पुन्हां 'येरे माझ्या मागल्या'


आपण पुन्हां त्याला बोलावल्यावर तो त्याच्या सवडीनं येतो. आपण त्याला जरा धारेवर धरण्याच्या प्रयत्न करून पाहिला तर, साहेब, आधी वरवरच काम करून पाहावं लागतं, एकदम मोठं कसं करणार! बघतो मी आतां...पुन्हां थोडा फार प्रयत्न करून पाहिल्यावर  म्हणतो, 'आतल्या पाईपचा ऊतार नीट नाही, फरशी खोलावी लागंल , खर्च करावा लागंल थोडा, 4-8 दिवस बाथरूम बंद ठेवावं लागंल.' आता काय करावं! आत्तांच तर एवढा खर्च झाला, पुन्हां एवढा खर्च, आणि दुसरं बाथरूम असलं तर ठीक , नाहीतर शेजाऱ्यांची मनधरणी !               

कधी गॅलरीचं आउटलेट उलट्या बाजूला असतं, पावसांत गॅलरीचा मिनी स्विमिंग पूल होतो. मुलं पोहायची हौस भागवुन घेतात. दुसरं आउटलेट करण्याशिवाय पर्याय नसतो. आणि त्यासाठी प्लंबरलाच शरण जावं लागतं. 

किचन ओट्यासाठी तर दुसरा/ तिसरा/ चौथा कुठलाच पर्याय नसतो.(नामजप करत ?) ओटा धुतल्यावर पाणी सिंक कडे लोटायचं किंवा न धुतां कपड्याने फक्त पुसून घ्यायचं एवढंच आपल्या हातांत असतं...बस्स्.


कधी एखादा नळ अचानक टप्  टप् करत गळायला लागतो. आपल्या डोळ्यांपुढे 'पाणी वाचवा' ही जाहिरात सारखी नाचत असते. आजकालचे नळ एक तर  वेगळ्या प्रकारचे, फॅशनेबल असतात. त्यांना लागणारे मोठे पान्हे आणि इतर साहित्य आपल्याकडे कुठून असणार! आपण बोलवल्यावर प्लंबर येईपर्यंत दोन -तीन बादल्या पाणी जमा झालेलं असतं. प्लंबर येतो, आपल्याला दोन बादल्या पाणी भरून ठेवायला सांगतो. वरचा कॉक बंद करतो. त्याच्या जवळच्या त्या विशिष्ट पान्ह्याने नळ उघडतो. आंत मधलं वाँशर किंवा अशीच काहीतरी क्षुल्लक गोष्ट, लागत असलेली त्याच्याकडे नसते. आणि आपल्याकडे असायचा तर प्रश्नच नसतो. मग तो सांगतो, ' हे बघा, मी आतां जेवायला जातो, येतांना ते घेऊन येतो.' आतां त्याला जेवायला नको कसं म्हणणार! आपण मुकाट मान डोलावतो. दुपारचं जेवण संपवून रात्रीच्या जेवणाची वेळ होते. 'हा काय शेतांत धान्य पिकवून, ते दळून, स्वयंपाक करून मग जेवणार होता की काय ! आपण आपला राग मनांतच ठेवून, आवाजांत शक्य तितकां नम्रपणा आणून त्याला फोन करतो. ' साहेब, काय झालं, मी येणारच होतो जेवण करून,   

पण इकडे दुसरं अर्जंट काम आलं आलं होतं दुपारच्याला. आतां उद्या सक्काळच्याला पैलेछुट येतो बघा, तंवर भागवुन घ्या जरा.' न भागवून कोणाला सांगता . आपण मनांतच चरफडत मुलांवर डाफरतो, "ए पाणी कमी सांडा रे, दोन बादल्या पाणी सकाळपर्यंत पुरवायचं आहे". 


फ्लॅटसिस्टीम मध्ये तर कधी भिंतीला लिकेज, कधी  वरच्या छताला ! 

कधी वरच्या तर कधी शेजारच्या फ्लॅटमधून आपल्या घरांत, कधी आपल्या घरातलं  खालच्या किंवा शेजारच्या घरांत! अगदी त्याच्यावर खाली बाथरूम किंवा किचनचं सिंक नसलं तरी... प्लंबरला विचारावं तर एखाद्या आशा सोडलेल्या पेशंटला पाहून डाँक्टर नकारार्थी मान डोलावतात तशी मान हलवून तो म्हणतो, 'कांही उपाय नाही साहेब. एकात एक गुंतलेलं आहे सारं.

तरी वॉटरप्रूफिंग करून टाकु. नवीन टेक्निक हाय, बघूया काय उपेग होतो का ते! आपल्याला मम म्हणण्याशिवाय पर्याय नसतो.


अगदी स्वतःच्या घरांत राहिलो तरी 'ठेविले कारागीरे,तैसेची रहावे' हेच खरं.

भेटुया…


सौ. भारती महाजन रायबागकर, चेन्नई

bharati.raibagkar@gmail.com

9763204334

1 comment: