Saturday, May 22, 2021

18 आधुनिक बलुतेदार

 *18* *आधुनिक बलुतेदार*


काल दिव्यांचा -पणत्यांचा उल्लेख झाल्याने जरासा दिवाळीचा माहोल तयार झाला! पण त्या आधीही बरेच सण येतात आणि तोपर्यंत जर लाँक डाऊन संपलं ( आणि ते संपेलच) तर सर्व नियम पाळून, स्वतःची काळजी घेऊन ते सण आपण नक्कीच साजरे करू शकतो. मग त्यासाठी नटणं, सजणं आलंच. आणि इतर साजशृंगारा बरोबरच बांगड्याही हव्यातच.


 त्याच बांगड्या घेऊन आलाय आजचा बलुतेदार...

       

              *कासार*


पूर्वी गा़वामध्ये, खेड्यांमध्ये एखादं कासाराचं घर असायचं. नागपंचमीला आणि दिवाळीला स्वतःबरोबर माहेरी आलेल्या लेकी, बहिणींना साडीचोळी बरोबरच कांचेच्या बांगड्या भराव्या लागत. सौभाग्याचं वाण असे ते. खानदेशांत अक्षय तृतीयेला हा मान असतो. 


मग अशा सणाला कासाराला बोलावणं जाई. आजूबाजूच्या सखी, शेजारणी, माहेरवाशिणी गोळा होत. आणि मग, ' ह्यो रंग चांगलाय यश्वदे, तुज्या हाताला लय सोबल बग,' 'नगं, नगं, लई नाजूक हायती, सासरी जायपत्तोर  बांगड्या टिकायला हव्यात' अशा चर्चेनंतर तिच्या हातांच्या गाळ्यानुसार (आतांपर्यंत सव्वा-दोन, अडीच, पावणे -तीन ह्या घड्याळांच्या वेळा असतात, एवढंच मला माहिती होतं.  (ते गाळ्याचे माप कसं असतं हे अजूनही कळलं नाही.) मग एकदाच्या त्या बांगड्या तिच्या हातांत  चढत आणि 'लई नादर दिसतोय हात अशी पावती मिळाली कीं दिवसभर ती आपला हात निरखत राही. लग्नकार्यांत तर कासाराला केवढा मान... लग्नासाठी पाव्हण्या बायका जमल्या कीं कासाराला आमंत्रण जाई आणि तोही आडव्या तारेत ओवलेल्या बांगड्या असलेली लाकडी चौकट ( हे त्याचं  फिरतं छोटेखानी दुकान )गळ्यांत अडकवून लगबगीनं हजर होई. यावेळी फक्त हिरव्या रंगाला प्राधान्य. त्यावरील जरीवर्ख कमी-जास्त एवढंच. नवरीबरोबरच प्रत्येकीच्या हातांत हिरव्या बांगड्या दिसत, आणि लग्न घरच्या पाव्हण्या ओळखु येत.


 आतां सर्वच गोष्टींत काळानुसार बदल झाला तर बांगड्या तरी मागे कशा राहणार! 'चूडी खनके' असं सांगणारी बांगडी कांचेचीच हवी ही संकल्पनाच बदलली. पितळीच्या, सोन्या-चांदीच्या, हिऱ्याच्या, प्लॅस्टिकच्या, लाखेच्या, एक ग्रॅमच्या, मोत्यांच्या, खड्यांच्या, अमेरिकन डायमंडच्या, पूर्वीच्या 20 पैशांच्या नाण्यांच्या, (आणखी कशाकशाच्या असतात?) सुद्धां बांगड्या तयार होऊ लागल्या. 


आता बांगड्यांचे एवढे प्रकार विकायला ठेवण्यासाठी 

  'अमुक बांगडी महल', 'तमुक बेंगल हाऊस' अशी *फक्त*  बांगड्यांची दुकानं थाटल्या गेली. आपण घातलेल्या प्रत्येक कपड्यांवर मॅचिंग बांगड्या घालण्याची फॅशन आली. 'मेरे हाथों में नौ नौ चुडियाँ हैं ' असं म्हणणार्‍यांची हौस पुरवण्यासाठी सगळी बाजारपेठ सज्ज झाली.


 मग एकदम यू-टर्न आल्यागत एका हातांत एखादी सोन्याची बांगडी किंवा कुठलंही रूंदसं कडं किंवा कांहीच न घालण्याकडे आणि दुसऱ्या हातांत घड्याळ घालण्याकडे कल वाढु लागला. आणि बांगड्यांची किणकिण अडचण वाटू लागली. 


बांगड्या घालण्याशी किंवा कुठल्याही दागिन्यांचा संबंध *फक्त* बायकांच्या आरोग्याशी निगडित आहे असं ठरवल्या जातं, ते खरंही असावं...किंवा ती तडा जाणारी आणि फुटणारी कांच प्रतीक म्हणून...'हँडल विथ केअर' असं लिहलेली... किती नुकसान...आणि कदाचित म्हणुनच पुरूष आवेशांत

बोलायचं किंवा……...असलं तर…

'मी कांही बांगड्या भरल्या नाही हातांत' असं ठणकावुन सांगत असावेत.


फिरोजाबाद बांगड्यांसाठी प्रसिद्ध आहे. बालमजुरीला कायद्याने बंदी असली तरी लहान आकाराच्या बांगड्या बनवायला लहानच हात लागतात,  म्हणून दिवस ऊजाडण्यापूर्वी लहान मुलांना झोपेतून उठवून,  भट्टीच्या उच्च तापमानांत  गरीब आईबाप त्यांना बांगड्या बनवायला घेऊन येतात, असं वाचण्यात आलं, म्हणून बांगड्या घालणं बंद करावं तर... फक्त एवढंच पिढीजात कौशल्य असणाऱ्या त्या अशिक्षित कुटुंबांनी आणि मोठ्या शहरांत आपली बांगड्यांची जड चौकट घेऊन फिरणं शक्य नसलं तरी पैशांअभावी दुकानही सुरू न करता येणाऱ्या कासारांनी काय करावं... हा तिढा कांही सुटत नाही.


उद्या बघू एक नवीन बलुतेदार...


सौ.भारती महाजन-रायबागकर

bharati.raibagjar@gmail.com

 9763204334

2 comments:

  1. छानच.... काळा बरोबर रिती बदलत आहेत तरी ठराविक प्रसंगी बांगड्या हव्यातच.... नवी पिढी सुद्धा ही प्रथा हौसेने पाळते

    ReplyDelete
  2. अगदी खरंय, पुन्हां पुन्हां फिरून तीच फँशन येत असते.

    ReplyDelete