Thursday, May 20, 2021

16 आधुनिक बलुतेदार

 *(16)* *आधुनिक बलुतेदार*

       

 काल कोणी कोणी घरांतल्या फर्निचर वरून आपली नजर फिरवली आणि कोणाकोणाच्या त्याबद्दलच्या आठवणी... सुताराच्या नांवासकट जाग्या झाल्या... एखाद्या वेळेस आपल्याला असा अपवादात्मक इतका चांगला सुतार सापडतोही कीं आपण दुसऱ्या गांवी शिफ्ट झालो तरी, शक्य असेल तर त्याला तिथंही काम करायला घेऊन जातो. पण असे भाग्यवान विरळाच...


आजचा बलुतेदार घेऊन आलाय... *रंग*


         *रंगारी - पेंटर*



पूर्वी म्हटल्याप्रमाणे गांवातल्या मातीच्या घरांना साधारण दिवाळी आणि अक्षय तृतीया, नागपंचमी यासारख्या सणांच्या वेळी वर्षांतून किमान दोनदा रंगकाम केलं जायचं. दिवाळीला तर नक्कीच... रंग काम म्हणजे काय तर पिवळी माती आणून पोतेरं घेऊन रंगवायची. कधीकधी दुसरेही तत्सम रंग वापरले जात. ज्यांना तो रंग आणणं शक्य नसे, ते चुलीच्या धुरानं धुरकटलेलं घर चुना लावून जरासं उजळत, बाहेरील दर्शनी भागांत गेरूनं

 एखादा पट्टा किंवा पानं, फुलं,  सूर्य-चंद्र इत्यादी काढत, ज्यांना हेही शक्य नसायचं ते साध्या मातीनं घरं लिंपायचे. या सगळ्यांसाठी कोणी रंगारी यायचे नाहीत. त्यासाठी कांही प्रशिक्षण घ्यावं लागतं हे कोणाच्या गांवीही नव्हतं. सगळे रंगकाम पुरुष आणि स्त्रिया, बहुतांशी स्त्रिया स्वतःच करत.

हं...नेहमीसारखे तालेवार... त्यांच्या घरी मात्र बारमाही राबत असलेल्या गडीमाणसांना या कामाचाही भार ऊचलावा लागायचा.


आतांपर्यंत छोट्या, मध्यम गांवातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नव्हती. दिवाळी आली आणि शाळांना सुट्ट्या लागल्या कीं घर सफाई बरोबरच मुलांच्या *मदतीने* हे रंग काम हसत-खेळत पार पडायचं.नव्या रंगाने खुलणारं घर पाहिलं कीं सर्वांना आपल्या मेहनतीचं सार्थक झाल्यासारखं वाटायचं.


 आता आधी बैठे बंगले, मग रो हाऊसेस, फ्लॅटस् चा जमाना आला. त्यांत राहणाऱ्यांनी स्वतः रंग काम करायचं? कांहीतरीच काय!... हुशार लोकांनी समाजाची ही गरज नेमकी हेरली आणि एक नवा आधुनिक बलुतेदार उदयाला आला. चुकत, शिकत त्यांत हळूहळू सुधारणा होऊ लागली. एशियन पेंट, नेरोलँक सारख्या नामांकित कंपन्यांनी रंग मार्केट काबीज केलं. पिवळ्या आणि तत्सम इतर रंगांची माती केव्हांच हद्दपार झाली. आणि ती जागा साधा पेन्ट, प्लास्टिक पेन्ट, अँक्रलिक पेन्ट अशा चढत्या क्रमाच्या रंगांनी घेतली. 


घराचा आंतील रंग आणि बाहेरचा रंग वेगळा... एकाच घरांतील प्रत्येक खोलीतील रंगही वेगळा... खोलीत एकाच रंगाच्या दोन शेड्स, विरुद्ध रंगांच्या दोन शेड्स, एकच भिंत  हायलाईट, टेक्श्चर असे नाना प्रकार आवडीनुसार ठरू लागले. त्या रंगांच्या शेड्सही आता कॉम्प्युटरवर प्रत्यक्ष दिसू लागल्या आणि पूर्वीची पांढरा रंगाचा स्टेनर टाकून आधीची शेड पुन्हा करतांना डोळ्यांनी अंदाज करण्याची रीत कालबाह्य झाली. आता शेडचा नंबर पाहिला कीं तोच रंग लगेच तयार.

ब्रशची जागाही विविध प्रकारांनी घेतली आणि आतां तर रोलर, स्पंज अशी सोप्पी साधनं वापरली जातात.  रंगांबरोबर रंग देणाऱ्यांचेही स्वरूप बदलले. पूर्वी पेंटर स्वतः च एखादा मदतनीस घेऊन घराला रंग द्यायचा. आतां पेन्टरची टीम तयार असते. त्यामुळे तो अनेक साईट्सवर कामं करू शकतो. कधी कधी मात्र तो एकाच ठिकाणचे पेंटर दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातो आणि त्यांची येण्याची  वेळ उलटून गेल्यावर आपण फोन केला तर 'दो दिन छुट्टी है' असे बिनदिक्कत सांगून टाकतो. अशावेळी सगळ्या खोल्यांतील सामान मध्यभागी आणून, झाकून ठेवलेल्या, घरांतील स्वयंपाकघरासह सगळ्या खोल्यांच्या जागा तात्पुरत्या बदललेल्या, त्या अर्धवट रंगलेल्या, धुळभरल्या घराकडे आपले न रंगलेले हात चोळत बसण्याशिवाय आपल्याजवळ पर्याय नसतो. यावेळी मात्र हे सुताराचे सख्खे भाऊबंद वाटू लागतात. 


घराच्या दर चौरस फुटावर रंग द्यायचे  भरमसाठ दर ठरवणारे कॉन्ट्रॅक्टर, उप-कॉन्ट्रॅक्टर प्रत्यक्ष रंग देणाऱ्या, फाटके जुने कपडे घालून, उंच झुल्यावर चढून कधीकधी जीवाची जोखीम उचलणाऱ्या कारागिरांना पोटापुरती मजुरी तरी देतात की नाही कुणांस ठाऊक!


कधी मिळणार प्रतिष्ठा आपल्या देशांत श्रमाला असा विचार करून तेव्हां मात्र मन विषण्ण होतं. 


ऊद्या पुढच्या बलुतेदाराला भेटु...


सौ. भारती महाजन-रायबागकर 


bharati.raibagkar@gmail.com

9763204334

4 comments: