Monday, May 17, 2021

13 आधुनिक बलुतेदार

*(13)*  *आधुनिक बलुतेदार*


- 'सुवर्णकार' वाचून कोणाकोणाला वेगवेगळे दागिने आठवलेत? कोणाकोणाची ( एखाद्या गोड कारणासाठी) खरेदी राहून गेली या लाँकडाउनमुळे? 


 आतां आजच्या बलुतेदाराची ओळख करून घेऊ या...


       *चर्मकार ( चांभार)*


पूर्वी गांवातल्या एकाच चांभाराकडे सगळ्या गावकऱ्यांची कामं असायची.

कामं म्हणजे काय, तर शेतकऱ्यांच्या नव्या मोटा शिवायच्या, आणि जुन्या दुरुस्त करायच्या. पुरुषांची कर् कर् वाजणारी पायताणं बांधून द्यायची, आणि ती झीजेस्तोवर त्यांची दुरुस्ती करत राहायची. गांवातल्या तालेवार घरांतले पुरुष कधीकधी जोडा घालायचे. बायकांच्या चपला ही गरजेची नव्हे तर ऑप्शन ची वस्तु होती. तशाही खेड्यातील बायका गावांबाहेर पडेपर्यंत चपला घालीत नसत, ही बाब वेगळी. मुलांच्या पायांना तर कितीतरी मोठं होईपर्यंत चपला माहीत नसायच्या. त्यामुळेच चांभारा जवळ वर्षभर काम नसलं तरी तो गांवात असणं गरजेचंच होतं. 


आत्तां कांही वर्षांपूर्वीपर्यंत जरा मोठ्या गावात किंवा शहरांत चपला बुटांची सामान्य दुकानं होती. बहुतेक दुकान मालकच स्वतः ऊठून आपल्याला आपल्या मापाचे चपला-बूट दाखवायचे. पसंती साठी दोनच रंग...काळा किंवा लाल... डिझाईन पेक्षांही मजबूतीला गिऱ्हाईकांचं प्राधान्य...  'बाटा' हे एकच कंपनीचं नांव सर्वसामान्यांना माहिती होतं. त्या कंपनीची महागडी (तेव्हांची) पादत्राणं घालायला मिळाली तर स्वतःला धन्य समजण्याचा तो काळ...


 आता कुत्र्यांच्या छत्रीसारखे जागोजागी सर्वसाधारण दुकानं तर उगवलीच आहेत, पण पॅरागॉन, नाइके, स्केचर्स, आदिदास,(इथेही पुन्हा माझं अज्ञान आडवं येतंय )इत्यादी बाटा कंपनीची  सख्खी, सावत्र, चुलत इ. भाऊबंद उदयाला आलेली आहेत. आणि लेदरच्या पादत्राणां पासून ते कापडी, प्लॅस्टिक, रबर इत्यादी प्रकारांपासून उन्हाळी, पावसाळी, हिवाळी... वाँकींगचे, ट्रेकिंगचे, रनिंगचे, सिटिंगचे, फिटिंगचे इत्यादी उपप्रकार इथपर्यंत त्यांची रेंज निर्माण झाली आहे.


पुन्हां बायकांसाठी स्टोन लावलेले, डेकोरेट केलेले, रंगीबेरंगी, कपड्यांना मॅचिंग बरहुकूम...हाय हिल्स, फ्लँट, डॉक्टर्स...चप्पल, सॅंडल्स, स्लीपर्स, ( घरांत घालण्यासाठी, घरांतल्या त्या 'विशिष्ट' जागेसाठी...अबब... एवढंच आठवतांना दमछाक झाली माझी )इतके उपप्रकार,उप-उपप्रकार असतात आणि घरांतील प्रत्येक सदस्यासाठी या सगळ्या प्रकारांतील 'किमान' एक तरी जोड असतोच. त्यामुळे आपल्या घराच्या दर्शनी भागांत चपला बुटांचे एक छोटेखानी? दुकानच असतं.

 

आतां ब्रँडेड वस्तूंचाच बोलबाला आहे. त्यामुळे छोट्या दुकानांत जाऊन खरेदी करणं आपल्या स्टेटस् ला शोभत नसतं. त्या मोठ्या कांचेतुन आरपार दिसत असलेल्या आकर्षक शोरूम मध्ये प्रवेश केल्यानंतर मालक अदबीनं आपले स्वागत करतो. नोकर सौजन्याने बसायला सांगतो. कोणासाठी खरेदी करायची आहे हे कळलं आणि जर ती स्त्री असली तर सिंड्रेलाच्या पायांत राजपुत्राने ज्या नजाकतींनं कांचेचा बूट चढवला असेल तसा तो आपल्या पायांसमोर ते पादत्राण धरतो. तेव्हा त्यांच्या किंमतीकडे...(यांच्या किंमती तीन आकड्यांपासून ते चार आकड्यांपर्यंत... माझी धाव इथपर्यंतच ) दुर्लक्ष करून त्या वाजवीच आहेत हे समजून घ्यावं लागतं. 


ही झाली आपल्याला प्रत्यक्ष भेटणारी माणसं. पूर्वी फक्त साध्या चपला, बूटं, मोट शिवत असलेल्या ह्या पिढीजात चर्मकारांच्या जमातीनं आता कौशल्यानं ही विविधरंगी, विविधढंगी पादत्राणं बनविण्याचं प्रशिक्षण घेतलं आहे आणि पडद्याआड राहून ते एखाद्या कारखान्यात त्यांचे उत्पादन करत आहेत, ही चांगली बाब आहे. कारण जो काळाबरोबर चालला तोच तरला.


 नाहीतर अजूनही रस्त्यांवर, झाडांखाली आपली पारंपारिक  चांभारकीची हत्यारं सांभाळत, जाणार्‍या येणाऱ्यांच्या पायांकडे आशाळभूत नजरेने बघणाऱ्या चांभाराचा प्रपंच कसा चालत असेल कोणास ठाऊक... 


 कारण आतांच्या 'युज अँड थ्रो' च्या जमान्यांत आपल्या फॅशनेबल पादत्राणांना त्याचं गावठी ठिगळ कोण लावून घेणार...


आतां उद्या बघू या कोणत्या बलुतेदाराची गाठ पडते ते...


सौ.भारती महाजन-रायबागकर

bharati.raibagkar@gmail.com

 9763204334

2 comments:

  1. तीन मजली शोरुम आणि युज अँड थ्रोच्या जमान्यात कोपऱ्यावर झाडाखाली बसलेला मोची/चांभार शोधायची वेळ पर्सचा बेल्ट तुटला किंवा चप्पलची तात्पुरती डागडुजी करणे गरजेचे आहे कारण आत्ता नवीन खरेदी करायला वेळ नसेल तरच येते. या पारंपरिक चांभार काम करणाऱ्या लोकांचा उदरनिर्वाह कसा चालत असावा असा प्रश्न पडतो? पुढच्या पिढीला हे लोक दिसतील का?


    .

    ReplyDelete
    Replies
    1. असे खूप कारागीर आहेत, जे कालौघांत दिसणार नाहीत. धन्यवाद.

      Delete