Saturday, May 8, 2021

२ *आधुनिक बलुतेदार*

 *(२)*   *आधुनिक बलुतेदार* 


याआधी आपण लॉक डाऊनच्या काळांत कोण कोणत्या भूमिका निभावल्या ते पाहिलं...आतां पुढे......


 थोडक्यांत काय तर, 'तूं च तुझ्या जीवनाचा शिल्पकार' या धर्तीवर  शिल्पकार तर नाही, पण आपण आपलेच बलुतेदार झालो. आत्तांच्या पिढीला नाही तरी आमच्या पिढीला ऐकुन तरी नक्कीच माहीत असतील.

(मी तर अगदी छोट्याशा खेड्यांत राहून हा अनुभव घेतला आहे.)

 पूर्वी भारत हा 'भारतच' होता. त्याचा 'इंडिया' झाला नव्हता. कारण तेव्हां बव्हंशी जनता खेड्यांतच राहायची आणि त्यांचा मुख्य व्यवसाय शेती हाच होता. तेव्हां 'उत्तम शेती, मध्यम व्यवसाय, कनिष्ठ नोकरी' असाच समज होता. त्यामुळे बाकीचे गांवकरी आणि शेतकऱ्यांमध्ये अलिखित असा करार झालेला असे. गावात एखादं किराणा दुकान असे. जरा बरं, मोठ्ठसं गांव असलं तर एखादा सोनार, क्वचित एखादं कापड दुकान... बस्... पण लोहार, चांभार, सुतार, शिंपी, न्हावी,भटजी मात्र नक्कीच असत. आणि या सर्वांमध्ये एकमेकांशी कामाच्या बदल्यात धान्य...( आत्ताच्या भाषेत कॅशलेस म्हणता येईल काय )असाच व्यवहार चाले. वर्षभर शेतकऱ्यांचे मोट, पायतान दुरुस्त करणे, हजामत करून देणे, कपडे शिवणे, किराणामाल देणे, सोन्याचा दागिना घडवणे, शेतीची अवजारं नीट करणे इत्यादी इत्यादी कामं करून द्यायची. त्याबदल्यात पैशांऐवजी सुगीच्या दिवसांत शेतांतील खळ्यांत जाऊन कामाच्या प्रमाणांत धान्य घेऊन येणे असा व्यवहार चालायचा. याला *बलुतं* असं म्हणत आणि या लोकांना *बलुतेदार* असं नाव होतं. हे साधारण बारा असत.आतां खेडी ओस पडली, शेती ही बहुतांशी उजाड झाली. कनिष्ठ नोकरी उत्तम झाली आणि बलुतेदारी जवळजवळ लयाला गेली. पण जुनी बलुतेदारी जरी कालबाह्य झाली तरी नवे बलुतेदार मात्र नव्याने उदयाला आले. फक्त ते रोख पैसे घेऊनच आपली सेवा देतात. 


भेटायचंय कां तुम्हांला या सगळ्या बलुतेदारांना? मग ऊद्यापासुन एक एक करून येतील ही मंडळी…पण तेव्हां त्यांना पुरेसा मेहेनताना द्यायला विसरू नका हं...आणि मी त्यांना तुमच्या भेटीला आणलं म्हणुन मला…?☺️आपण सूज्ञ आहांत...(पुढील लेखांत)


सौ. भारती महाजन- रायबागकर

चेन्नई

9763204334

bharati.raibagkar@gmail.com

2 comments:

  1. एक छान विचार अशाप्रकारे आम्हाला माहिती मिळेल.

    ReplyDelete