Wednesday, May 19, 2021

15 आधुनिक बलुतेदार

 *(15)* *आधुनिक बलुतेदार*

         

किती जणांना काल आपलं कॅन्टीन आठवलं? गृहिणी असणाऱ्यांनाही आपलं कॉलेज कॅन्टीन आणि ओघानं सोबतच्या मैत्रिणीही नक्कीच आठवत असतील... मोठ्ठा अवांछित ब्रेक मिळाल्यामुळे आत्ताचे कॉलेजगोइंग्ज, नोकरदार वर्ग तर ते 'मिस्'  करतच असतील... मला खात्री आहे, सीनियर सिटीझन्स सुद्धां भूतकाळाच्या त्या दिवसांचा मनोमनी फेरफटका मारून आले असतील...खरं ना...


आता़ बघू या आजचा बलुतेदार...


             *सुतार*


गांवातील सुताराला प्रामुख्याने बैलगाडी, नांगर आणि इतर शेतीची अवजारे बनवणे, त्यांची दुरुस्ती करणे अशी कामं असायची.

इतर सामान्य लोकांच्या मातीच्या घराला एखादं लाकडाचं दार असायचं. पण गरीबांच्या कुडाच्या झोपडीला तसंच एखादं पत्र्याचं किंवा तुराट्याचं दार असायचं.  त्यामुळे कडी कुलुपाचा प्रश्नच नसायचा. तसंही त्यांच्यासारख्याकडे चोरण्यासारखं असणार तरी काय म्हणा...

 पण सरपंच, पाटील इत्यादी तालेवार यांच्या वाड्याला मात्र भरपूर दारं-खिडक्या असायची. छप्परही लाकडाचंच असायचं. त्याला माळवद असं म्हणत. फर्निचर म्हणजे बाकं, पलंग, खुर्च्या इत्यादी एकाच छापाची असली तरी लाकडाची असायची. 


आतां सिमेंट चा शोध लागला आणि लाकडाची मक्तेदारी संपली. आधी फक्त बैठे बंगलेच असायचे. पण त्यांची दारं, खिडक्या लाकडाचीच असायची. आतां उंच टाँवरच्या जमान्यांत आणि सिमेंटच्या जंगलात दाराच्या चौकटी सुद्धा सिमेंटच्या बनु लागल्या, खिडक्यांची तावदानं कांचेची झाली खरी... पण फर्निचरचं प्रस्थ मात्र खूप वाढलं. घर घेतांनाच प्रत्येक वस्तूंची जागा नियुक्त करण्यात येते. कधी कधी त्यासाठी इंटेरियर डेकोरेटरचे मत विचारांत  घेण्यात येतं. मग सुरु होते सुताराची शोधाशोध... आप्त-मित्र परिवारांत  कोणाकडे सुतार काम चालू असलं तर त्याची कुंडली विचारण्यात येते आणि त्याचे-आपले छत्तीस गुण जुळतात काय ते तपासण्यात येतात. त्या गुणांपुढे मोठ्ठा 'पण' असला तरी त्यांतल्या त्यांत कोणाचा 'पण' सुसह्य करणं सोप्पं ठरेल याचं निदान करून त्याला पाचारण करण्यात येतं. मग त्याची मजुरी, प्लायवूड आणि इतर सामानाचा खर्च याचा ताळमेळ जमला कीं शेवटचा कळीचा प्रश्न...' कितने दिन लगेंगे?' ज्याचं खरं उत्तर कधीही मिळत नाही.


 नंतर घरी करून घ्यायचं कीं त्याच्या कारखान्यांत तयार करून आणायचं याचा उहापोह होतो, ज्या चोखंदळ लोकांचा घरी करून घ्यायचा आग्रह असतो त्यांना मग आधी त्यांच्या वेळेनुसार घरातली कामं आटोपणं, सर्व सामान यादी बर हुकूम आणलं तरी आयत्या वेळी आणखी सामान आणून देणं, त्यांचं चहापाणी करणं,  त्यांच्याकडून दिवसाच्या शेवटी सर्व पसारा आवरून घेतल्या नंतरही स्वतः स्वच्छ करावं लागणं इत्यादी इत्यादी कामं करण्याची तयारी ठेवावी लागते.मुख्य म्हणजे त्यांच्या करवती, हातोड्यासारख्या अवजारांच्या आवाजांत आपली दुपारची झोप हरवते आणि आपण हे 'आ बैल मुझे मार' असं का केलं असा प्रश्न स्वतःलाच विचारतो. सांगितलेल्या मुदतीपेक्षा दोन-तीन दिवस जास्त होऊनही बरंच काम शिल्लक राहतं आणि मग आपल्या संयमाची परीक्षा सुरू होते. आणि आपण जर गृहिणी असु, नव्हे असतोच, म्हणून तर आपल्याला हौस असते नं आपल्या समोर मनासारखं काम करून  घ्यायची...जे कधीच होत नाही... आणि घरांतील सर्व जण आपापल्या  कामांवरून घरी परत आल्यावर आपण वैतागून सुतारांविरूद्ध तक्रारी चा पाढा वाचण्यास सुरुवात जर केली तर... 'तुलाच हौस फार, आधी सावध केलं होतं नं...मग भोगा आपल्या कर्माची फळं' असंही ऐकावं लागतं...


जे सुज्ञ असतात ते कारखान्यांत फर्निचर करायला सांगतात. आणि जे 'महासुज्ञ' असतात ते 'फर्निचर शॉप' मध्ये जाऊन, दोन पैसे जास्त देऊन मनपसंत फर्निचर घरांत आणुन मोकळे होतांत. हे टिकाऊ नाही असं जर कोणी म्हटलं तर 'जाऊ द्या हो, नाहीतरी काय शाश्वत आहे या जगांत' असा तत्त्वज्ञानाचा मुलामाही देतात. असं असलं तरी कांही वेळा सुताराची गांठ घ्यावी लागतेच, हा भाग वेगळा...


आतां लाकडी फर्निचर मॉलचा मालक सुतारच पाहिजे असा कांही नियम नाही. कोणीही आपल्या स्वत:च्या कारखान्यांत कुशल/अकुशल कामगार कामांला ठेवून ग्राहकांच्या पसंतीनुसार फर्निचर बनवून घेतो आणि भरपूर फायदा मिळवतो. पण त्या सुतारांच्या मजुरी बद्दल तेच जाणोत...कारण श्रमाला प्रतिष्ठा नसणाऱ्या आपल्या देशांत त्याबद्दल न बोललेलंच बरं...शेवटी काय, काळाची पावले ओळखावी हेच खरं... ज्यांनी ओळखली तोच ह्या जगांत तरू शकतो...


आता उद्यां पुढचा बलुतेदार...


सौ.भारती महाजन-रायबागकर

bharati.raibagkar@gmail.com

9763204334

No comments:

Post a Comment