Monday, May 24, 2021

20 आधुनिक बलुतेदार

 *20*  *आधुनिक बलुतेदार*

        

काल कितीवेळा डोक्यावरून हात 'सहजच' फिरवल्या गेला... आपल्याच हो... कोणी कोणी 'त्याचं'... म्हणजे सध्यातरी आपलंच...कौशल्य पुन्हां आजमावून पाहिलं!


सध्या ज्यांचे विवाह ठरले आहे त्या भावी वर -वधूंना आपले विवाह पुढे ढकलावे लागत आहेत किंवा सर्व नियम पाळून जमेल तसे उरकून घ्यावे लागत आहेत? ठिक आहे... पण तोपर्यंतच्या *ह्या मंतरलेल्या दिवसांत* तासन् तास फोनवर बोललो, अगदी व्हिडिओ कॉल वर... तरी त्याला आधीच्या, जरा अलीकडच्याच जमान्यांतील, जराशी वाट पाहायला लावणाऱ्या पत्रांची सर कशी येणार! आणि ते आणून देणाऱ्या  व्यक्तीचीही...तो म्हणजे...


               *पोस्टमन*


पूर्वीची खेड्यांतील जनता निरक्षर, अंगठेबहाद्दर असायची. (आतांचा अंगठेबहाद्दर म्हणजे कॉम्प्युटर साक्षर... नव्हे मास्टर.) एखादं पोरगं शाळेत शिकत असलं तरी अक्षरं वाचता येतील याची खात्री नसायची. गांवात पोस्ट नसलं तरी शेजारच्या मोठ्या गांवातून, किंवा तालुक्यांतून आठ-पंधरा दिवसांनी 'डाकिया डाक लाया' म्हणत पोस्टमन यायचा. पत्र पोहोचवणं हे त्याचं अधिकृत काम असलं, तरी एखाद्या म्हातारीच्या सैनिक असलेल्या लेकाचं खुशालीचं किंवा वाईट बातमीचं पत्र, एखाद्या शेतकऱ्याच्या पोरानं शहरांतून धाडलेली मनीऑर्डर, एखाद्याच्या सातवी- आठवी पास असलेल्या लेकीनं सासरच्यांना चोरून लिहलेलं, पैशाच्या मागणीचं किंवा माहेरी घेऊन जाण्याचं पत्रं अशी सगळ्यांची सुख-दुःखांची पत्रं त्याला वाचूनही दाखवावी लागायची आणि कधीकधी लिहूनही... एखादी दुःखाची खबर ऐकवल्यावर त्यांचं सांत्वन करावं लागायचं, लेकीची खुशाली ऐकल्यावर किंवा लेकाची मनीऑर्डर मिळाल्यावर, ती माऊली त्याचीच अलाबला घेऊन त्याला घोटभर चहा द्यायची. आपल्या सैनिक लेकासाठी त्याच्याकडून पत्रही लिहून घ्यायची, पण 'खत लिख दे, साँवरिया के नाम बाबु' अशी आर्जव करणारी  ग्रामीण प्रेमिका कदाचित सिनेमातच असावी.


शहरांत मात्र या पत्रांतील मजकुराचं स्वरूप बदललं. लोकंही बर्‍यापैकी साक्षर झाले. पोस्टमन कडून वाचून घ्यायची गरज उरली नसली तरी 'चिट्ठी आई है' हेच एक संपर्काचे साधन असल्याने त्याची वाट मात्र आवर्जुन पहावी लागत असे. खाकी युनिफॉर्म घातलेला, खांद्यावर पत्रांची खाकी बँग अडकवलेला, हातांत 10-15 पत्रांचा गठ्ठा घेतलेला पोस्टमन यायची वेळ झाली, कीं पाय आपोआप नेहमी ऊघड्या असलेल्या दारांतच रेंगाळत असत. त्यामुळे तो दुरूनच दिसल्यावर आनंदानं फुललेला चेहरा, हातांनच कांही नाही आज अशी खूण करत पुढे निघून गेला, कीं औदासिन्याचे काळे ढग चेहऱ्यावर दाटून येत. छोटी मुलं तर 'पोश्मन काका, आमचं पत्...लं द्या नं 'असं ओरडत त्याच्या मागं लागत असत. कधी पोस्टमननं आणलेल्या पत्रांत ओठांवर हसूं आणणारी आनंदाची बातमी असे, कधी अक्षरं धुसर होणारी दुःखाची खबर... कधी आई बापाची माया ठासून भरलेली ऊबदार पत्रं असत, तर कधी एखादं गुलाबी पत्र भावी जोडीदाराची किंवा झालेल्या साथीदाराची गालांवर गुलाब फुलवणारी असत. त्या त्या पत्रांनुसार त्यांची कमी-जास्त पारायणही होत.  पण एक मात्र झालं...शहरांतल्या पोस्टमनला त्या पत्रांत काय आहे हे कधीच कळत नसे.


संपर्काच्या साधनांत उत्तरोत्तर बदल होत गेला, आणि सासरी निघालेल्या लेकीला, कॉलेज/ नोकरीसाठी परगांवी जाणाऱ्या लेकाला, किंवा अन्य कोणालाही निरोप देतांना, 'पत्र टाक बरं पोहोचल्याचं' याऐवजी 'फोन कर, हं, पण फक्त पोचल्याबरोबर नव्हे, तर पोहचेपर्यंतच्या प्रवासांतही...वारंवार असा बदल झाला.


आणि मग पोस्टमनचं अस्तित्व विम्याच्या हप्त्याचं रिमाइंडर, एखाद्या कंपनीचे लेटर, जे ई-मेलवर पाठवू शकत नाही असं, किंवा अशाच एखाद्या औपचारीक कामापुरतं ऊरलं.


कारण आता ही कामं कुरियर सर्विस ची माणसं करतात. गाडीवर येऊन आपलं पाकीट किंवा सामान दिलं, सही केली, आपण थँक्यू म्हटलं, की त्याचं काम संपलं. ना आपुलकी, ना जिव्हाळा, ना एकमेकांच्या सुखदुःखांची खबरबात... ते तरी काय करणार... शहरांत रोज एकाच कंपनीचा एकच कुरीअरवाला येईल असं नाही, वेळही नसतो, त्यामुळे 'आपण भलं, आपलं काम भलं' असा विचार असणं साहजिक आहे.


पोस्टमन प्रमाणे आतां स्त्रियांही पोस्टवुमन म्हणून नोकरी करतात. उन्हांताह्नांत, पाण्या- पावसात हिंडून, कधीतरीच जरी असले, तरी ते आपल्याला पत्र द्यायला जेव्हां येतात, तेव्हा त्यांना क्षणभर बसवून, त्यांचीच विचारपुस करून पाणी विचारलं,  कधीतरी चहाही, आणि हो... दिवाळीला सढळहस्ते पोस्त ही.......तर...


ऊद्या भेटुच, बलुतेदारासह...


सौ. भारती महाजन-रायबागकर, चेन्नई

Bharati.raibagkar@gmail.com

9763204334

No comments:

Post a Comment