Monday, August 9, 2021

तिमिरातुन तेजाकडे

 

*तिमिरातुनी तेजाकडे*

हाती लेखणी देऊन
अंध:कार अज्ञानाचा
प्रकाशाने उजळेल
*लावु दिपक ज्ञानाचा*

दारिद्र्याने, नैराश्याने
जीवनेच्छा संपवती
द्रव्य, धीर मिळताच
*जगी सुखाने नांदती*

व्यसनाच्या गर्तेमध्ये
जाती संगतीच्या पायी
नको दु:स्वास तयांचा
*सावरावी तरूणाई*

भ्रष्टाचारी तुडविती
नीतिमूल्य पायदळी
नसो सहभाग त्यांत
*जन जीवन उजळी*

कन्या, जननी उदरी
घुसमटे तिमिरात
*जन्म ज्योत पणतीची*
काळोखाच्या गाभाऱ्यात

तत्त्वज्ञान आचरण
*दीप धर्माचा जगती*
निज-स्वरूप-दर्शन
साधेलच आत्मोन्नती

सौ.भारती महाजन-रायबागकर
चेन्नई
9763204334

Friday, August 6, 2021

दरी सांधु या

 *दरी सांधु या*


कमी करा पुस्तकांचे

ओझे बाल पाठीवरी

नच सुचला पर्याय

तज्ज्ञ हात वर करी


कधी मिळे बोजा ऐसा

दिसे डोळ्यांमध्ये भाव 

ललाटीच्या रेषांमध्ये

काय लेख? कोणा ठाव


जगण्याच्या लढाईस

गोळा करी ज्ञानकण

त्याच युद्धाच्या कारणे

कचर्‍यात वेचे धन


परस्परभिन्न मार्ग

दोन रेषा समांतर

कशा व्हाव्यात एकत्र

कसे मिटावे अंतर


ईश्वराला नको दोष

न्याय अन्याय अटळ

ज्याचे त्याला भोगायाचे

भलेबुरे कर्मफळ


बदलुया मन:स्थिती

यत्न नकोत तोकडे

दोघांतील *दरी सांधु*

घालु मनाला साकडे


सौ. भारती महाजन-रायबागकर

चेन्नई

९७६३२०४३३४

Wednesday, August 4, 2021

मी आणि ती

 *मी आणि ती*


*पाॅंडिचेरी…*


काळा कातळी किनारा...सरत्या पौषाचा सुखद गारवा... *रात्रीचा समय सरूनी येत उषःकाल हा...* अशी पंच पंच उष:कालची मंगल प्रभात...समोर अथांग दर्या…त्याच्या निळसर लाटा हळुवारपणे किनार्‍यावर येऊन, त्यापेक्षाही अलवारपणे परत जाताहेत...मंद, शितल वारा अंगावर शिरशिरी उठवतोय…

कातळापासून समुद्र जरासा खाली...त्यामुळे कधी लाटांकडे, कधी समोर बघत आम्ही पूर्वाभिमुख होऊन बसलोय...नि:स्तब्ध…मी...आणि… *ती*…


हळूहळू क्षितीजापासुन एक सुवर्णरेघ लांब लांब होत त्या रत्नाकराच्या मध्यापर्यंत येते...क्षितीजावरची केशरी शिंपण बाजुला सारून वर वर डोकावत येतोय...सुवर्ण गोल...सागरजलाची निळाई फिकट होतेय...त्यावर सुवर्णतेज चढतंय... मनातल्या सगळ्या विचारांचं धुकं विरत जाऊन ते निरभ्र होतंय...वरच्या आकाशा सारखंच…


प...ण...तिच्या मनांत काय असेल बरं... चेहऱ्यावरचे मिश्किल भाव पाहुन वाटतंय...


*दरिया किनारे एक बंगलो दे?*


*ती*...*समोरच्या* *तेजोमय उगवतीशी नातं सांगणारी…*


"चल उठुया?" *ती* हलकेच आधाराचा हात देऊन मला उठवते.


पुन्हा तेच कातळ...त्याच महासागरावरील, त्याच लाटांवर, तशीच सुवर्णआभा पसरलेली...निळ्या आकाशांत निसर्गाची तशीच रंगीबेरंगी चित्रकारी...पण आता त्यात मावळतीच्या धुसर सावल्यांचे सावळे रंग मिसळताहेत...आणि त्याच कातळावर बसलेल्या आम्ही दोघी...मी... आणि...*ती*...तशाच नि:स्तब्ध...स्वत:तच हरवलेल्या... आणि या संध्याछाया नातं सांगताहेत *माझ्याशी…*


*संधीकाली या अशा, रंगल्या दिशा दिशा*


सकाळच्या उत्साही लाटा आता धीरगंभीर वाटताहेत...त्यावर जणू कांही काळी शाई सांडलेली आहे...पण या जलधीची

मोहिनी मात्र तश्शीच...सकाळ इतकीच…


"चल उठुया?" जपुन... *तिचा*  आधाराचा हात आणखीनच घट्ट…


आज सुट्टीचा दिवस...पर्यटकांची अलोट गर्दी...आणि कळत नकळत...जाणवेल न जाणवेलसा...माझ्या नजरेचा पहारा...छे, छे, सुरक्षा कवच...तिच्याभोवती...


असे तब्बल एक नाही...दोन नाही...तीन वेळा उषेशी आणि  संध्येशी मनमुक्त भेटी…मी आणि *ती*…

दोघीही तृप्त...


आज त्याचा निरोप घ्यायचाय…


*जीवनात ही घडी अशीच राहू दे*


 असं वाटत असलं तरी…*


कारण... त्या तृप्ततेतही थोडंसं असमाधान टोचतंय...अखेर मानवी मनंच ते...कितीही दिलं तरी समाधान मुळी नाहीच...वाळुत किल्ला बांधायची हौस कुठे पूर्ण झालीय अजुन...? शिवाय मुक्कामाच्या ठिकाणाहुनही अविरत दिसत असलं तरी हे तर फक्त दूरदर्शनच होतं त्या पयोनिधीचं...किमान पावलांना तरी त्याचा उबदार स्पर्श व्हावा याची आस होतीच मनीं…


पण महर्षी अरविंदांसारख्या महान  व्यक्तीच्या पावन सानिध्याने पुनीत झालेल्या ह्या जलसिंधुला मात्र आप ल्यासारख्यांचे मलिन पाय त्याच्या पवित्र जलात भिजवावे असं वाटत नसेल...म्हणुन तर त्याने किनाऱ्यापासुन जरासं अंतर राखलं असावं…?


 म...ग?


*चलो महाबलीपुरम…*


उतरत चाललेल्या संध्याकाळच्या गडद छाया...पाॅंडिचेरीला दुरूनच पाहीलेल्या सागराचा आत्ता निदान पायाला तरी स्पर्श व्हावा म्हणुन आसुसलेल्या आम्ही...घेतली धाव त्याच्याकडे...पण...हाय...

निरव शब्दाने सुद्धा ती गुढ, गंभीर शांतता भंग पावेल असा माहोल...तरीही आमची मऊसुत वाळुत बैठक... पुन्हा एकदा दूरदर्शन...मी...आणि...*ती*…


अमावस्येची रात्र...वर आकाशगंगा नक्षत्रांचा चांदणचुरा  ऊधळुन दिमाखात आपली काळी चंद्रकळा मिरवतेय...आणि खाली आम्ही भारलेल्या...मंत्रमुग्ध...किती दिवसांनी बघितलं होतं बरं असं विशुध्द चांदणं...शांततेच्या ह्या मैफिलीत लाटांच्या आरोह-अवरोहांची सुरेल गाज..‌.अविस्मरणीय अनुभूती…वर्णन करायला शब्दसंपदा तोकडी पडतेय...


"चल, उठू या?" पुन्हा तोच आधाराचा हात...


प्रसन्न सकाळ...उतरता सागर किनारा... भरतीच्या लाटांच्या ओढीचे अनामिक भय...त्यामुळे पाऊलस्नानाचा जेमतेम उपचार...आणि मग…आतापर्यंतच्या गांभीर्याचं वलय बाजूला सारून अखंड बडबड करत, हसत-खेळत, वय विसरून वाळूत घर बांधणाऱ्या आम्ही दोघी...शंख शिंपल्यांची सजावट, आणि वाळूत कोरलेली आमची नांवं... 


आली...आली...एक मोठ्ठी लाट...आणि बघता बघता आमचं वाळूचं घर भुईसपाट...माझं हळहळणं...


"समुद्र काय सांगतो आपल्याला?"

*ती*…


"माझ्यासारखं विशाल ह्रदय ठेव…" हळहळ मनाच्या एकदम कोपऱ्यात ढकलून माझं धीर गंभीर वयाला साजेसं पोक्त उत्तर…


"आणि कुठल्याही संकटाला हसत हसत तोंड द्यावं…" *तिची वयाला साजेशी? पुस्ती*... 


"चला, निघायचं?"


अरेच्चा! *ती* म्हणजे कोण विचारतांय…?


*समान-शीले-व्यसनेषु सख्यम्...*


*कल्पनेच्या कुंचल्याने स्वप्नात रंग भरण्यासाठी…*


सागराच्या ओढीने आलेलो आम्ही दोघी...


*ती* म्हणजे…पुष्पकोशाचे अवगुंठन हलकेच बाजुला सारून, वार्‍याच्या झुळकीने इकडेतिकडे झुलत, उमलती मुग्ध कलिका...

*माझी दुधावरची साय!*


सौ.भारती महाजन-रायबागकर

 चेन्नई

९७६३२०४३३४.

Friday, July 30, 2021

नामी युक्ती

 नामी युक्ती


आज्जी कां गं रुसलीस?

डोळ्यांत कां गं पाणी?

अंगणी झोक्यावर एकटीच

बसलीस बापुडवाणी


आईचं नि तुझं आज 

भांडण झालं काय?

मला नाही सांगणार?

मी तुझ्या दुधावरची साय


आईचं बोलणं कधीच फार

मनांवर नको घेऊ 

आत्तां हाक मारेल तुला

'चला लवकर, जेऊन घेऊ'


ऑफिस आणि घर, 

वैतागुन जाते फार

मनांत मात्र जाणीव असते,

तुझा कित्ती आधार


गोष्ट सांगतेस परीची?

कीं खेळायचा खेळ

बोल ना कांहीतरी आतां, 

होउ दे तुझा माझा मेळ


आई शेजारच्या काकुला,

मघाशी सांगत होती बाई

सासुबाई सांगण्यापुरत्या,

आहेत माझी दुसरी आई


आजी म्हणे"थांब" तिच्या

आवडीची भाजी करते मी

रुसवा घालवण्यासाठी 

कशी केली युक्ती नामी



सौ.भारती महाजन-रायबागकर

चेन्नई

९७६३२०४३३४


Thursday, July 29, 2021

पुन्हा तुझाच पुकारा

 *पुन्हा तुझाच पुकारा*


तप्त होऊनी अवनीचा

उष्ण, श्वास-नि:श्वास

गंध ओल्या मातीचा

मन भरून घेता खास


धसमुसळ्या जलदांनी

अत्तर कुप्या लवंडल्या

भांडणांचा लाभ आम्हां

मनकुंभ भरुनी गेल्या


साठवण? नसे युक्ती

निरंतर अनुभूती घेण्यास

धरा तावून-सुलाखून

तेव्हांच मिळे हमखास


असे अद्भुत रसायन

कस्तुरी सुवास अहा!

हस्तलाघव निसर्गाचे

*एकस्व* घेतले पहा


आलबेल असता, कवतिक

संगम महाप्रलयात

खारं पाणी डोळ्यांतलं

मिसळलं निष्ठुर गोड्यात 


आतां गंध नकोसा ओला

स्पर्शही उठवी शहारा

पण रखरखत्या वाळवंटी

*पुन्हा तुझाच पुकारा!*


सौ. भारती महाजन रायबागकर

 चेन्नई

९७६३२०४३३४

Wednesday, July 28, 2021

ज्ञानाई

 ज्ञानाई


शाळा आमची फारच भारी

व्ही.जे. हायस्कुल तिचं नांव

दुमजली, दगडी, देखणी इमारत

शंभरावर वय, तालुका नांदगाव


नदीकाठी, मोठ्ठे, मोकळे मैदान

विज्ञानासाठी सुसज्ज प्रयोगशाळा

खो-खो, लंगडी, हुतुतू, पळापळी

हवं तेवढं, हवं ते, भरपुर खेळा


शाळेमध्ये मिळाल्या कितीक

जिवलग मित्र मैत्रिणी

कलागुणांना वाव मिळतसे

वार्षिक स्नेहसंमेलनांनी 


थोर थोर गुरूजन आमचे 

ज्ञानदानाची तळमळ

आयुष्य-रणांगणी सोडिले

शहाणे करून सकळ


अशी आमची आवडती शाळा 

विद्यार्थ्यांसाठी *ज्ञानाई*

स्मरणरंजन-अंजुली वाहते

कृतज्ञतेने तिच्यापायी


सौ.भारती महाजन-रायबागकर

चेन्नई, 

9763204334

Tuesday, July 27, 2021

नवोढा ते माता

 - *नवोढा ते माता*


आज जणू धरित्रीचा

विवाह सोहळा

रंगीबेरंगी फुलांच्या

घाली पुष्पमाळा


हिरवा शालू नेसली

निर्झरांचे चाळ 

आरस्पानी जलबिंदु

मौक्तिकांची माळ


पाखरांची किलबिल

मयूर नर्तन

निसर्गाच्या वऱ्हाड्यांचे 

प्रसन्न वर्तन


मीलन होईल जेव्हां

भूमी पर्जन्याचे

मनमोर आनंदाने

थुई थुई नाचे


फुलारुन आली धरा

रोमांचित झाली

आला साजण भेटाया

नवा साज ल्याली


रत्नगर्भेचा शृंगार

सोज्वळ, सात्विक

फलश्रुती, तरारेल

बीजं-बाळं-पीक


नवोढा वसुंधरेला

मातेचा सन्मान 

पृथ्वीमाय प्रसवेल

भरघोस धान


सौ.भारती महाजन-रायबागकर

चेन्नई

Monday, July 26, 2021

कारगिल विजय दिन

 *कारगिल विजयदिन*


     ‌    *पोवाडा*


उणे साठ डिग्री तापमान

हाडं गोठवणाऱ्या, बोचऱ्या थंडीचे

नगाधिराज हिमालयाच्या

बर्फाच्छादित पर्वतराजींचे


पर्वतराजींचे हो...जी...जी...जी...रं जी


आले बेसकॅम्पला आपले सैनिक

करारातील नियम पाळण्याला

जरा उसंत मिळेल, वाटले

परि शत्रुने घातला घाला


घातला घाला हो...जी...जी...जी...रं जी


जाणुनिया इरादा गनिमाचा

जांबाज जवान मुळी ना डगमगले

ऊरी राष्ट्रप्रेम जाज्वल्य

लढण्यास सिद्ध जहाले


सिद्ध जाहले हो...जी...जी...जी...रं जी


गर्जा *भारत माता की जय*

बोला *हर हर महादेव*

तुटून पडले, त्वेषाने वैऱ्यावर

एकेकाला चढला होता चेव


चढला होता चेव हो...जी...जी..जी..रं जी


सत्त्याहात्तर दिवस धुमश्चक्री

युद्ध झाले अतिशय घमासान

विसरुनी मुलं, माणसं, घरदारं

लढतांना कसे हरपले भान


हरपले भान हो...जी...जी...जी...रं जी


सव्वीस जुलै एकोणवीसशे नव्याण्णव

*कारगिल विजय दिन*  मान

तिरंग्यात लपेटून, कित्येक

हिंदुस्तानाची राखली शान


राखली शान हो...जी...जी...जी...रं जी


सौ. भारती महाजन-रायबागकर

चेन्नई

२६-७-२१.

Saturday, July 24, 2021

कवडसा...शोधु कुठे

 विषय- *कवडसा*


शीर्षक- *कुठे शोधावा?*


त्या घनदाट जंगलातील मोठमोठी झाडं...


'तूं ऊंच जातोस कीं मी',असं आव्हान देत...


उंच उंच झेपावत आहेत जीवनदात्याच्या दिशेने...


तोही आपल्या उबदार हातांंनी

मायेनं कुरवाळतोय त्यांना...


'या... आणखी जवळ या...'


झाडंच ती...लहान मुलांसारखी भांडत...


आपापल्या फांद्यांनी एकमेकांना ढकलत, ऊंचच ऊंच वाढताहेत...


त्यांच्या मुळाजवळची इवलीशी

झुडूपं...


तीं मात्र वाट पाहताहेत...


कधी आपल्याही वाट्याला येईल एखादा *कवडसा...*


पण खंत...? अजिबात नाही...


मोठ्या झाडांच्या ऊबदार छायेत 

वाढताहेत ती समाधानानं...

 

आणि त्या जंगलाशेजारचं हे आणखी एक जंगल...


झाडांचं...? छे! महानगरांतील एकमेकींशी स्पर्धा करणाऱ्या इमारतींचं


ऊंच...आणखी उंच... इमारतीमधील अंतर कमी...आणखी कमी...


मोकळी मैदानं...? कशाला...? वेळ कुणाला आहे खेळायला...


 *डी* जीवनसत्वाची कमी...?  सूर्यप्रकाशातुनच हमी... 


पण...कुठं बरं मिळेल तो...?


आपणच तर पक्का बंदोबस्त केलाय...


सूर्यकिरणांना जमिनीपर्यंत पोहोचू न देण्याचा...


आणि आता शोधत फिरतोय एखादा तरी *कवडसा*!


सौ.भारती महाजन-रायबागकर

चेन्नई

9763204334

Thursday, July 22, 2021

शरण जाऊ या

 शरण जाऊ या*


अनन्यभावे, विनम्रतेने *शरण जाऊ या* नतमस्तक होऊनी गुरु चरण वंदु या


सान थोर भेद नसो, गुरु मानण्यास

होई जरी निर्माल्य, पुष्प दे सुवास

इवल्याश्या मुंगीची शिकवण आचरूया...

नतमस्तक होऊनी गुरुचरण वंदु या


चुका टाळूनीया घेऊ धडा भविष्यांत

आपलेच हित असे  संयम राखण्यात... 

निसर्गापासुनी कांही बोध घेऊया

नतमस्तक होऊनी गुरुचरण वंदु या


मात-पित्यांचे संस्कार पथप्रदर्शक

शिक्षकांचे मार्गदर्शन जीवन रक्षक

मर्म जाणुनी आत्मसात करूया... 

नतमस्तक होऊनी गुरुचरण वंदु या


वाट दाखविती जे पारलौकिकाची

अध्यात्म शिकवुनी धर्माचरणाची

सत्पदी नेतील ते सन्मार्गी जावु या... 

नतमस्तक होऊनी गुरुचरण वंदुया


सौ. भारती महाजन-रायबागकर

चेन्नई

२३-७-२१.

Monday, July 19, 2021

बोला मुखाने पांडुरंग

 *बोला मुखाने पांडुरंग*


विठ्ठल नामांत, वारकरी दंग

बोला मुखाने, पांडुरंग  


भक्त हृदयी, विठु करी वास

नको कसले, नवस-सायास

रूप साजिरे, सावळेची अंग

बोला मुखाने, पांडुरंग  


वेध लागती, तुझ्या दर्शनाचे

नाद घुमती, टाळचिपळ्यांचे

नाही साक्षात, मन तुझ्या संग

बोला मुखाने, पांडुरंग  हो. हो.हो.हो.


थोर संतांचे, राखलेस सत्व

तुझ्या कृपेने, प्राप्त हो महत्व

भल्याभल्यांचा, केला मुखभंग

बोला मुखाने, पांडुरंग


भक्ती भावात, सामर्थ्य महान

अंतरंगी तू, शोधी समाधान

येऊ वारीत, बांधलाय चंग

बोला मुखाने, पांडुरंग 


सौ. भारती महाजन- रायबागकर

चेन्नई

९७६३२०४३३४

Saturday, July 17, 2021

मन हीच पंढरी

 मन हीच पंढरी


 *विठ्ठल नामांत | झाले मी दंग*

*हरी पांडुरंग मुखे | हरी पांडुरंग*


"ए...शुक्...शुक्..."


"कोण आहे ती शुक् शुक् करणारी..." कमळा असेल शेजारची...आली असेल सुनेचं गाऱ्हाणं करायला रोजच्या सारखी...दिसत नाही कां मी विठ्ठलाचं भजन करते आहे ते..."


*सुंदर ते ध्यान | उभे विटेवरी*

*कर कटेवरी | ठेवोनिया*


"अगं...इकडे...इकडे..."


"अगं! काय उद्योग धंदा आहे कीं नाही कमळे तुला...

मी एवढी विठ्ठलाच्या नामात गुंग झालेली आहे आणि...तू..."


*देव माझा विठू सावळा*

*माळ त्याची माझिया गळा*


"हे बघ, मी कमळा नाही*


"मग...?"


"मी म्हणजे... *तू...तूच*


"हे बघ, तुझं असलं कोड्यातलं बोलणं मला काही कळत नाही. मी आतां वारीला निघालेय..." 


*मी तर निघाले पंढरीला* 

*तुम्ही येता कां बोला?*


"हा काय प्रश्न झाला? मी म्हटलं ना मी म्हणजे तू... मग...*तू तिथं मी...*


"अस्सं होय? चल मग माझ्यासोबत पंढरीला"


"कुठे आहे पंढरी ? काय असतं तिथं?"


"कुठं म्हणजे? पंढरपुरात...आषाढी एकादशीला मोठ्ठी यात्रा भरते तिथं...


*विठु माझा लेकुरवाळा*

*संगे गोपाळांचा मेळा*


असं दृश्य असतं बरं"


"असं होय...?"


"तर...महाराष्ट्रातील कितीतरी संतांच्या पालख्या घेऊन वारकरी पांढरे कपडे घालुन भजन- किर्तन करत, नाचत-गात  पायी पायी पंढरपुरला जातात. काय तो थाट! किती तो उत्सव! डोळ्यांचं पारणं फिटतं अगदी...


“पुरे...पुरे...पुरे...ते सर्व वर्णन मला अगदी तोंडपाठ आहे.अनेकजणांकडुन ऐकलं आहे मी कितीदा तरी... पण मला एक सांग...कोण कोण येतं गं वारीला..."


“कोण कोण म्हणजे...? ज्यांना ज्यांना इच्छा आहे पायी चालणं होतं ते सग्गळे...लहान-थोर, गरीब-श्रीमंत, स्त्रिया- पुरुष...”


“अगं बाई...मग प्रत्येकाची जेवणा खाण्याची, राहण्याची व्यवस्था त्यांच्या त्यांच्या दर्जाप्रमाणे वेगळी असेल, नाही? कोणाला फाईव्ह स्टार, कोणाला...”


“छे, छे...भलतंच...वारी म्हणजे समानता...”


*उच्च-नीच सारे | नाही भेद भाव*


"अगं! माझा विठोबा सर्वसामान्यांचा देव आहे बरं...त्याच्या शिष्यांमध्ये सर्व जाती-जमातीचे लोक होते, हो कीं नाही...एका नामावाचुन त्याला दुसरं कां...ही लागत नाही... सच्च्या भक्तांसाठी तो नेहमीच धावुन गेलाय..."


"किती छान! पण काय गं? ही वारीची शिकवण तुम्ही जन्मभर पाळतच असाल?"


"म्हणजे? म्हणायचंय तरी काय तुला?"


"हेच... वारीची शिकवण तुम्ही नेहमीसाठी मनापासुन आचरणात आणता कां? तुमच्या कृतीतून भेदभाव नष्ट झाला कां?

विठ्ठलाचे नांव फक्त वारीपुरतं कीं सदासर्वदा तुमच्या मुखांत असतं? नाहीतर...


*वारीपुरती ओवी आणि जन्मभर शिवी*


"ते कसं शक्य आहे? अगं, प्रपंच म्हटला म्हणजे थोडं भलंबुरं व्हायचंच..."


" पण प्रयत्न तर करता येतो नं! आपलं आचरण जर नेहमीसाठी अंतर्बाह्य एकसारखं असलं तर आपलं मनच पंढरी समजून

 आपल्या मनाची वारी करता येते. आपल्या मुलामाणसांत, दीनदुबळ्यांत, पशुपक्ष्यांत आपल्याला विठ्ठल भेटत असतो.

सावता माळी यांनी म्हटलं आहे ना...


 *कांदा मुळा भाजी | अवघी विठाई माझी*


"वारी हे आपल्या आयुष्याचं प्रतीक आहे.

आषाढी-कार्तिकीला पंढरीला जरूर जावं. पण ती पंढरी नेहमीसाठीच आपल्या मनाच्या ठायी वसु द्यावी.


*मन माझे असे | पंढरी, विठाई*

*जरी तुझ्या ठायी | पांडुरंगा*


बोला... 


*विठ्ठल...विठ्ठल...जय हरी...विठ्ठल*

*विठ्ठल...विठ्ठल...जय हरी...विठ्ठल*


सौ. भारती महाजन-रायबागकर 

चेन्नई

9763204334.

Friday, July 16, 2021

संसाराचा सारीपाट

 -बाराखडी काव्यलेखन

शब्द-   *स*


शीर्षक-. *संसाराचा सारीपाट*


समानतेच्या समविचारी

सुह्रुदांचे साहचर्य सोडुन

सहजतेने सुलभतेने

साधण्यास समर्पण संपूर्ण


साजशृंगाराने सजुनी

संगतीने सखयाच्या

सुलग्नाच्या सूत्रबंधने

सौभाग्यकांक्षिणीच्या


सुवासिनीच्या सत्कर्मांनी

सुमंगल सदासर्वदा

समृद्धी, सुयश सुनिश्चित

सौख्य, संपत्ती, संपदा


संसाराच्या सारीपाटावर

सोंगट्या सुखदुःखाच्या

सज्ज संकटी सावरण्या

सदैव सासरघरच्या


सानंदे स्वीकारूनीया

सृजनाच्या सोहळ्याला

सुपुत्राच्या, सुकन्येच्या

सहर्षे स्वागताला


स्निग्ध, स्नेहार्द्र, सुलोचनांनी

सुसंस्कारे संगोपले

सक्षम, समर्थ,सद्वर्तनी

सद्विचारी साकारले


सत्व, स्वत्व, सुनीतीने साध्य

संधिकाल सहजीवनाचा

सुज्ञपणाने सहनशीलता

संपन्न, सोनेरी संवेदनांचा


स्मरण,स्वलेखन, सुस्पष्ट

सदोदित साहित्याचे

संधीला सोने समजुनी

सार्थक स्त्री-जन्माचे


सौ.भारती महाजन-रायबागकर

चेन्नई

९७६३२०४३३४.

Wednesday, July 14, 2021

संभ्रम

 

शीर्षक- *संभ्रम*

हिरव्या पानांच्या छायेत
भिजण्याचा आनंद जरी
हवीच छत्री तरी हक्काची
शोभती मौक्तीक सरी

कर्ण संपुष्टांस तोषवी
गिटारीचे मंद स्वर
मोदभरे, निखळ, निर्मळ
हास्य फुलवी मुखावर

धराशायी जाहला वृक्ष
बसण्यास्तव आसन परी
हिरव्या रानीं मुग्ध बालकें
विसरुनी दुनिया सारी

*सुर निरागस हो* सांगते
जणूं बालपण निष्पाप
नात्याला या नांव कशाला
जुळेल जे आपोआप

सकल नात्यांची अवीट गोडी
पण मनीं असाही *संभ्रम*
पाठोपाठच्या बंधुभगिनीचे
असतील सुरेख विभ्रम?

सौ.भारती महाजन-रायबागकर
चेन्नई
९७६३२०४३३४

Monday, July 12, 2021

प्रश्न रेशमी, उत्तर मखमली

 विषय-  *प्रश्न रेशमी... उत्तर मखमली*


 सात-आठ महिने झाले होते तो तिचा निरोप घेऊन जाण्याला...अगदी तृप्त मनाने...समाधानाने...तिने त्याला निरोप दिला होता...द्यायलाच हवा होता...नाही तर... *अति तेथे माती...* ही म्हण तिच्या चांगलीच परिचयाची होती...खूपदा तिने त्याचा अनुभवही घेतला होता... तिच्याइतका दारुण अनुभव आणखी कोणाच्या वाट्याला येणार म्हणा...


आणि आतां मात्र ती त्याची उत्कटतेने वाट पाहत होती...अगदी वेध लागले होते तिला त्याचे...त्याच्यासाठी तिने सगळी... अगदी सगळी तयारी करून ठेवली होती...थोडा त्रास झाला होता तिला...बरंच सहन करावं लागलं होतं... पण तिला त्याची तमा नव्हती... अखेर ती...*ती* होती...आणि ती तर असतेच सहनशील...खंबीर... आणि...


*आखिर कुछ पाने के लिए...*


पण कधीकधी तो नुसताच संकेत देत होता... आपल्या आगमनाचा...ती गडबडीनं आपलं विस्कटलेलं...जरासं विकल झालेलं रूप सावरत होती...


*वाट पाहुन नयन सख्या शिणले रे*


कधी कधी तो निरोप पाठवायचा...मी येतोय...आलोच बरं मी...आणि...पुन्हां हुलकावणी...ती पुन्हां कोमेजायची...नाराज व्हायची...


'कां रे असा छळतोस मला...ये ना लवकर... किती वाट पाहायला लावतोस...तुझ्याशिवाय मला दुसरं आहे तरी कोण...?' 


आणि मग तो तिच्या कानांत कुजबुजायचा...


' येऊ...? खरंच येऊ...? त्याचा मऊ मुलायम रेशमी  प्रश्न तिच्या मनांला स्पर्शुन गुदगुल्या करायचा...ती असोशीनं उत्तरायची...


'ये, लवकर ये...असा अंत नको पाहुस आतां...ह्या दीर्घ विरहानंतरची प्रतीक्षा  संपु दे एकदाची...'


अखेर तोही म्हणायचा...'चला, बस्स् झाला आता हा लपंडावाचा खेळ... नाहीतर बाईसाहेबांना गुस्सा यायचा...'


* गुस्सा इतना हसीन है तो...* 


'छे, छे...हा गुस्सा हसीन बिसीन कांही  नाही बरं...रागाने अगदी तप्त होऊन गेलेल्या असतात'


आणि...तो येतो...तिच्याकडे झेपावतो... झंझावाताप्रमाणे...तीही अनावर आवेगाने त्याला बिलगते...जिवाशिवाचं मंगल मिलनच जणूं...ती तृप्तीचे हुंकार देते...समाधानाचे निश्वास सोडते... पुन्हां...पुन्हां... 


आतां दोघांच्याही मिलनाचं सार्थक झालेलं असतं...तिचाही पहिलावहिला आवेग ओसरलेला असतो...त्यालाही जायचं असतं...कांही दिवसांसाठी...तो तिला हलकेच विचारतो...जाऊ मी...? ती म्हणते..


'अहं...येऊ म्हणावं...' तो एकवार तिला थोपटुन निघुन जातो...


आता तिच्या मनाला दुसरंच व्यवधान लागलेलं असतं...त्याची निशाणी तिच्या कुशीत वाढत असते...त्याला नीट जपायचं असतं...अर्थात् अधून मधून  त्याचीही सोबत हवीच असते...तोही ते कर्तव्य तत्परतेनं पार पाडतो...


आणि पुरेशा अवधीनंतर त्या दोघांचंही  इप्सित साध्य झालेलं असतं...आतां तिची भूमिकाही बदललेली असते...एक तृप्तीची साय तिच्या तनामनावर पसरलेली असते...


आणि पुन्हां एकदा तोच रेशमी प्रश्न...'मी येऊ...?' पण आतां मात्र...आतुर आगमनाचा...?अं..हं... हळव्या, कातर स्वरातील निरोपाचा...प्रदीर्घ कालावधीसाठी...


तिलाही त्याची अपरिहार्यता माहित आहे..‌.त्यामुळे आतां ती त्याला अडवत नाही... आपल्या कुशीतील लेकरांच्या *हिरव्या, पोपटी, मखमली जावळावरून* आपला ममतामयी हात फिरवत त्याला  उत्तर देते...स्निग्ध, शांत नजरेनंच...


सौ. भारती महाजन-रायबागकर

चेन्नई

भेटी लागे जीवा

 https://m.facebook.com/story.php?story_fbid=2764237103868101&id=100008455146775&sfnsn=scwshmo

Saturday, July 10, 2021

आषाढगान

 शीर्षक- *आषाढगान*


आषाढाच्या प्रथम दिवशी

महाकवी कालिदास दिन

मेघदूतासम प्रसिद्ध काव्य

नाटकंही असती प्राचीन


वैशाखाच्या वणव्यामाजी

शुष्क, तृषार्त धरा तप्त

*येता बहरून आषाढ*  

प्राशुनी अमृत होई तृप्त


चराचरातील सृष्टीचेही

सुरु जाहले *आषाढगान*

पसरे हिरवा रंग सभोती

न्हाऊ घातले अवघे रान


मिरविती थेंब मोत्यांचे

हिर्वी पानं अंगावरती

जलद फिरती अंबरात

उतरण्यास अवनीवरती


बरसती आषाढधारा

वाट पाही चातक पक्षी

हिरव्या हिरव्या गालिच्यावर

गवतफुलांची रंगीत नक्षी


संजीवनी ठरे सकळांस

दुजे नांव आषाढाचे

बळीराजा, भुमी, वारकरी

स्वागत करू जलधारांचे


सौ. भारती महाजन रायबागकर

चेन्नई

Tuesday, July 6, 2021

काजव्यांची पालखी, स्वप्नांची पहाट

 *नक्षत्रांची पालखी निघाली*

*पहाट स्वप्नांची फुलली*


मध्यरात्रीची वेळ...संध्याकाळपासूनच विजांचा कडकडाट चालु आहे...दूरवर कुठेतरी थोडासा पाऊस पडतोय वाटतं...वीजही गेलेली...त्यामुळे सर्वत्र अंधाराचंच साम्राज्य...अन् निद्रा जागृतीच्या सीमेवर मनाचा लंबक हिंदकळतोय...भास-आभासांचा लपंडाव...स्वप्न-सत्याची शिवाशिवी...एक अनामिक हुरहुर...


पण हे काय... हा कुठला प्रकाश...मिटलेल्या डोळ्यांसमोरूनही त्याचा मंद उजेड जाणवतोय...अं हं...हा कांही लखलखणाऱ्या विजेचा प्रकाश नाही...डोळे दिपवुन टाकणारा...एक शांत...स्निग्ध अशी भावना जाणवतेय डोळ्यांना...वीजही आलेली नाही...मग काय असावं बरं... *उघड नयन देवा* ... अरे, हे...हे काय...


नभ उतरू आलं

धरा चांदणं ल्याली...


छे...छे...आकाशांतील चांदण्या तर तश्शाच आहेत...आपापल्या जागी...मग...


ओ हो...! हे तर काजवे...असंख्य...अगणित काजवे... ह्या टोकापासुन त्या टोकापर्यंत...काजवेच काजवे...काजव्यांची पलटण...? कांहीतरीच काय...ते काय सैन्य आहे लढाईला निघालेलं...मग...? काजव्यांचा मोर्चा...?बाई, बाई...काय ही कल्पनेची धाव...सरड्यासारखी कुंपणापर्यंत...काजव्यांची मिरवणुक...?बस् झाली निरर्थक उपमांची घोडदौड... 


ही तर काजव्यांची पालखी आहे पालखी...! हं...आतां हे नांव कसं छान शोभुन दिसतंय...


वारीत निघणाऱ्या पालख्या...पंढरपुरला निघालेल्या...विठ्ठलाच्या दर्शनाला... हरीनामाचा गजर करीत... समतेचा संदेश देत...मी...तू पणाचा विसर पडलेला... सर्वत्र भक्तीचाच रंग...भगवा...आणि तो रंग मिरवणारे वारकरी...शुभ्रधवल रंगात... *अवघा रंग एक झाला...*


हे काजवेही कांहीतरी संदेशच देत आहेत वाटतं...मी इवलासा असलो म्हणुन काय झालं...मी सूर्य नाही होऊ शकत... सगळ्या जगाला प्रकाश देणारा...पण मी माझ्यापुरता टिमटिमता  प्रकाश तर देऊ शकतो...आणि आमचा हा प्रकाशपुंज... यातुन बघा कसा प्रकाश निर्माण होतोय...थोडा उजेड कमी असेल पण तुम्हाला मोहुन तर टाकतोय...आमच्या एकीचं बळ आहे हे...


आणि ह्या पालखीचे भोई तरी कोण कोण आहेत...जराशी ओळख पटतेय...अरे, ही तर *आपली* *साहित्यनक्षत्रंच* आहेत सगळी...काजव्यांच्या मंद मंद प्रकाशांत सगळी कशी उठून दिसताहेत...स्वयंप्रकाशाने...


आपणही व्हावं कां त्यांत सामील...पेलवेल नं आपल्याला भोई  होणं...? हो...हे भोई कांही असे तसे नाहीत...सारस्वत आहेत ते सगळे...पण...घेतील ना ते आपल्याला त्यांच्यात... कां नाही...नक्कीच घेतील...अशी शंका सुद्धां कां यावी मनांमध्ये... आत्तांच काजव्याचा संदेश ऐकला ना... मग...?  तरीही...


*मैं अकेला था और कारवॉं बनता गया...*

असंच तर होत असतं नं...


 हो...त्या कारवॉंमध्ये सामील व्हायलाच हवं...आपल्या चालीनं...हळूहळू...पण सामील व्हायचंच...


पण मग... त्यासाठी आतां या निद्रादेवीची साथ सोडायला हवी...हो...हो...बरोबर...स्वप्नं पहाण्यासाठी तिचीच साथ हवी... पण तीं पूर्ण करण्यासाठी मात्र...उषेचेच स्वागत करायला हवे...तर आणि तरच... *स्वप्नांची पहाट फुलेल...* आणि ईप्सित साध्य करता येईल...खरं नं...?


सौ.भारती महाजन-रायबागकर

चेन्नई

Friday, June 25, 2021

आधुनिक सावित्री, तळ्यांत- मळ्यांत

    *आधुनिक सावित्री* 


      शीर्षक- *तळ्यांत मळ्यांत*


सत्यवान-सावित्रीची कथा आपण

वर्षानुवर्षे विश्वासानं ऐकतोय. आणि त्याच श्रद्धेनं दरवर्षी वटवृक्षाला फेरेही न चुकता नेमानं मारतोय.


त्या वटपर्णांच्या प्राणवायूतून तिच्या पतीला नवसंजीवन मिळाले

आणि फक्त त्या *एकाच* यमाचे आवळलेले करपाश सुटले.


 पण यमही आतां निरनिराळ्या भयंकर रूपांत सामोरा येतोय.

अपघात, घातपात, हार्टअटॅक, कॅन्सर 

ही अशी तर नित्याचीच रूपं...

पण किडनी फेल होण्यासारखे असाध्य जीवघेणे रोग, आणि आत्ताचं साध्या स्पर्शालाही महाग झाल्याने हतबल करणारं, भयंकर जीवघेणं संकट...

ही सुद्धां त्या यमाचीच आणखी कांही अक्राळविक्राळ रूपं!


शिवाय आज जिवंत वटवृक्ष सांपडतात कुठे सहजासहजी?

आणि सांपडलाच एखादा

तर...त्याच्यामुळे

आत्तांच्या या यमाचं कां...ही वाकडं होत नाही बरं!


मग स्वतःचा देह हाच एक वटवृक्ष असतो तिच्यापाशी.

आणि त्यातील तिची किडनी म्हणजे जणूं त्याचा बहि:श्चर प्राण...


पूर्वी नाही कां जादूच्या गोष्टींत राक्षसाचे प्राण दुसऱ्याच एखाद्या गोष्टीत सुरक्षित असायचे.

फरक एवढाच की तेव्हां राक्षसाचे प्राण हरण करायचे असत, आतां पती परमेश्वराचे प्राण वाचवायची पराकाष्ठा करायचीअसते. त्यासाठी वडाच्या नव्हे, दवाखान्याच्या फेऱ्या माराव्या लागतात

आणि स्वतःची किडनी कर्तव्यभावनेनं दान करावी लागते. 


कधी घरावर आर्थिक संकट येतं, पण ही सावित्री डगमगत नाही. वेळ प्रसंगी आपलं स्त्री-धन सहजतेने पुढे करते. शारीरिक कष्ट करायला तर मागे पुढे पाहतच नाही पण मानसिक आधारही देऊन घराचा भक्कम आधारस्तंभ  बनते.


पण आजची सावित्रीबाई फुल्यांची लेक आचार विचारांनी आधुनिक झालेली असली तरीही तिच्या अंतरंगात रुढी, परंपरा यांची मूळं खोल रुजली आहेत. त्यामुळे दोन्ही डगरींवर हात ठेवतांना ती संभ्रमावस्थेत असतांना दिसते. नाहीतर पर्यावरणाचं महत्त्व मनांवर बिंबवत असतांनाच कधी घरच्यांच्या दबावामुळे, कधी 'लोक काय म्हणतील' ह्या सनातन बागुलबुवामुळे तर कधी स्वतःच्याच दोलायमान अवस्थेमुळे ती 'तळ्यांत-मळ्यांत' करून निसर्गाचं नुकसान करतांना दिसली नसती. कळतंय पण वळत नाही...


कित्येकदा पती दुर्गुणांचा पुतळा असतो. पण स्त्रीने मात्र सद्गगुणांची पुतळी असण्याची अपेक्षा असते. आणि पुष्कळदा ती तशी असतेही. कारण *न स्त्रीं स्वातंत्र्यमर्हती* हे मनुवचन मनोभावे पाळणारी आपली आदर्श पुरूषप्रधान संस्कृती. यांत अशिक्षितांबरोबरच सुशिक्षित पुरुषही मागे नसतात आणि हा त्रास सहन करूनही *सात जन्म हाच पती मिळो* अशी प्रार्थना करणाऱ्या स्त्रियांतही हा भेद दिसत नाही हे विशेष.( तो मिळतो कीं नाही हा भाग अलाहिदा)


भारतीय संस्कृती  खरोखरच महान आहे. आपल्या पूर्वजांनी विचारपूर्वक सणं, व्रतवैकल्यं यांचा काळ ठरवला आहे. त्यांचं तंतोतंत पालन केलं नाही तरीही त्यातलं मर्म जाणुन घ्यावं.  आपण भारतीय देवभोळे, नाही केलं तर तो *दयाघन*  कोपेल ही आपली (अंध)श्रद्धा,  म्हणुन त्याला धार्मिकतेची जोड दिली एवढेच.


आणि हे सर्व वटपौर्णिमे पुरतंच मर्यादित न ठेवता नेहमी पर्यावरण पुरकच दृष्टिकोन ठेवुन,प्रदुषण टाळुन निसर्गाचं संवर्धन केलं पाहिजे. 


म्हणजे आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य मागतांना ते निरामयच असेल आणि पुढच्या पिढीसाठीही हा निसर्गाचा ठेवा राखुन ठेवला तरच आपली व्रतवैकल्यं सार्थकी लागतील.


एकंदरीत अशा कितीतरी सावित्री जगत आहेत आज

मुक्या ओठांनी,अबोलपणे, आपल्या भरलेल्या कपाळासाठी...


सांगा, कुठल्या पुराणात नोंद होईल त्यांच्या नांवाची...

कुठला इतिहास दखल घेईल त्यांच्या त्यागाची...


आणि आणखी एक मनाला छळणारा अनुत्तरीत प्रश्न

तसाच प्रसंग आला...तर...


किती सत्यवान उभे राहतील पाठी...

आपल्या जन्म सावित्री साठी!


सौ. भारती महाजन -

रायबागकर, चेन्नई


२५-६-२१


Thursday, June 24, 2021

वसा एक, रूपं अनेक, वट सावित्रीचा वसा

 *वट सावित्रीचा वसा*


शीर्षक- *वसा एक, रूपं अनेक*


जुन्या रूढी,अर्थपूर्ण

होते त्यामागे धोरण

आरोग्याशी निगडीत

घेऊ जाणुन कारण


वड आधीच दुर्मिळ

नको फांदी तोडलेली

प्राणवायूसाठी लावु

नवी रोपं, रुजलेली


बदलत्या सावित्रीस

वसा अनेक रूपांत

कमावते पतीसह

लक्ष ठेवुन घरांत


देई हसत स्त्री-धन

येता संकट आर्थिक 

पती कसाही, मागते

त्याच्या आयुष्याची भीक


शरीराचा हिस्सा देई

जेव्हां निकड पतीला

*वट सावित्रीचा वसा*

तिने ऐसा चालविला


वसा सावित्रीस, कधी

असो सत्यवानासाठी

तेव्हां कळेल जगास

किती सावित्रीच्या पाठी!


सौ.भारती महाजन-रायबागकर, चेन्नई 

२४-६-२१

Monday, June 21, 2021

योगासनं आपलीच

 *योगासनं आपलीच*



आला आला एकवीस जून

आजच्या पुरते जागती सकल

आंतरराष्ट्रीय योग दिवस हा

नंतर करती चालढकल


आहे अतिशय महत्वाचं

योगासनांचं जीवनी स्थान

पूर्वसुरींनी सांगुन ठेवलंय

योग परंपरा किती महान


फक्त संकटी नको आठवण

हवी निरंतर संगत

शरीरस्वास्थ्य,मन:शांतीने

वाढे आयुष्याची रंगत


सूर्यनमस्कार किमान बारा

सहजच पाळु, नित्यनेम

आदित्यावर अवलंबूनी

चराचराचे कुशलक्षेम


आपलीच योगासनंं तरीही

आयात करू *आपलंच ज्ञान*

पाश्‍चात्त्यांनी दखल घेता

कळते, मायदेशाची शान


सौ.भारती महाजन-रायबागकर, चेन्नई

२१-६-२१

Sunday, June 20, 2021

बाप आधीचे-बाप आतांचे

 *बाप आधीचे...बाप आतांचे*...


 - *फा...र आधीच्या... आमच्या पणजोबांच्या वेळेच्या बापांबद्दल न बोललेलंच बरं*...


- त्यांची फोटोतील उपरणं, फेटाधारी,उग्र, करारी प्रतिमा पाहुन आणि त्यांच्याबद्दल इतरांकडून ऐकुनच अंगाला भरतंय कापरं...


*आमच्या* *आजोबांच्या वेळेचे* *बाप*


- फेटा तर क्वचितच,

 पण टोपी येई कामी

माया दिसत नव्हती, 

शिक्षेची मात्र हमी


- बाप येता दारांत, 

मुलं लपती घरांत

चिडीचूप घर सारं, 

आईचाही थरथरे हात


- *आमच्या वेळचे बाप*...


- शर्ट, पायजमा, टोपी, 

हाच वेश सर्वांचा

शर्ट, पॅन्ट, शुज... 

जरा जास्त शिकलेल्यांचा


- पण बाप असायचे...जसे नारळ

वरून कठीण कवच, आंत मधुर जळ


- बाप असायचे...जसा फणस

आंत मधुर गर, वर कांटेरी स्तर


- बापाशी बोलण्यासाठी लागे

 आईच्या पदराचा आधार

त्यांच्या शिस्तीचा तेव्हां

 राग येत असे फार...


- *आतांचा बाप*...


 - 'अहो बाबा' वरून 'अरे बाबा' वर कधी आला ते कळलंच नाही

बाप मुलांच्या मैत्रीची देतात ते ग्वाही


- 'अरे बाबा, कांही कळतंच नाही तुला

थांब समजावुन सांगतो, हे माहिती आहे आम्हांला'


- बापही निमूटपणे ऐकतो,

 मानत नाही अपमान

*बाप से बेटा/ बेटी सवाई* 

म्हणतो, वाढते आपली शान...


- बाप मुलांसाठी राबत होता तेव्हांही 

बाप मुलांसाठी खपत असतो आतांही...


- कधी असते मुलांना जाणीव,

कधी म्हणती तुमचेच  कर्तव्य

*जातील आपल्या वंशा*

 तोपर्यंत *मा फलेषु कदाचन*

असं म्हणत जगायचं असतं...


पण तरीही...


 - आतांच्या बाप मुलांचं

 हे निकोप, खेळकर नातं

मनाला आमच्या भावतं

 *जमाना बदल गया है*

आपल्याच मनाला समजावतं.


सौ.भारती महाजन-रायबागकर, चेन्नई

Monday, June 7, 2021

चारोळी---दर्पण/आरसा

 *चारोळी*

*दर्पण-आरसा*

१) शब्द- ८

दिसे प्रतिबिंब छान

जल-दर्पणी, प्रशांत

जरा पाहु डोकावुन

अंतर्मन-दर्पणांत


२) शब्द- ८

गेलाय उडोनी आतां

आरशावरील पारा

चेहरा दिसे धुसर 

चढतोय माझा पारा 


३) शब्द- ९

दिसते वार्धक्याची खुण

साठी उलटता वयाची

पहाया, रुपेरी पताका

साथ हवीच आरशाची


सौ. भारती महाजन- रायबागकर

bharati.raibagkar@gmail.com

Sunday, June 6, 2021

33 आधुनिक बलुतेदार

 33 *आधुनिक बलुतेदार*



      तर मंडळी!

कामवाल्या मावशीचे अनुभव किती जणींना आपल्या अगदी जवळचे वाटले? सध्यांच्या काळांत बाकीची सर्व कामं आपण थोपवून धरली असली, तरी रोजची झाडू, फरशी, धुणी,भांडी ही कामं मात्र रोजच करावी लागतात. त्यातलं कपडे धुणं एकदा, फरशी पुसणं एकदा किंवा एक दिवसाआड, झाडणं दोनदा अशी केली तरी चालतात. भांडी मात्र एखाद्या गाण्यांतील कडव्यांच्या संख्येनुसार गाव्या लागणाऱ्या 

ध्रूवपदा प्रमाणे दिवसांतून किमान तीनदा तरी घासावी लागतात. आणि मग आपल्या कामवाल्या मावशीची आठवण कितीदातरी येते.आतां जेव्हां ती पुन्हा कामावर येऊ शकेल तेव्हां तिच्याशी कामांबद्दल तक्रार करतांना आपण नक्कीच पुन्हां पुन्हां विचार करू. तिच्या वंशाला जाऊन आपल्याला आतां पुरतं कळून चुकलंय कीं.......


सध्यां जरी ती आपली कामं करू शकत नसली तरी कुणी तिचा पूर्ण पगार देतंय, कुणी अर्धा आणि कुणी कांहीच देत नाही. आपल्याला वाटतंय की तो पगार देऊन आपण उपकार करतो तिच्यावर...पण वस्तुस्थिती तशी नाहीये, तिला खूप शरमिंध वाटतंय हा फुकट पगार घ्यायला. 'सगळी काळजी घेईन, पण मला कामावर येऊ द्या, आंग आंखडुन गेलंय बसून बसून.' असे तिचे सारखे फोन येत आहेत. अशावेळी तिला कामवाली, मदतनीस यापेक्षांही आपल्या घरच्या सदस्याचा दर्जा द्यावासा वाटतो.


पूर्वी गांवात बारा बलुतेदार असत. आपण तब्बल दोन डझन पेक्षाही जास्त बलुतेदारांना भेटलो. त्यांतील कांही जण 'अलुतेदार' होते तर कांही 'बलुतेदार, तर कांही कामवाल्या मावशी सारखी 'महाबलुतेदार.' अलुतेदार म्हणजे नैमित्तिक प्रसंगी लागणारे आणि बलुतेदार म्हणजे वारंवार लागणारे. त्यांच्या कामाच्या महत्त्वाप्रमाणे त्यांना धान्य दिले जात असे. फक्त तेव्हां ते शेतकऱ्यांच्या /मालकाच्या मनांवर असे. आतां मात्र जमाना बदलला, भूमिकाही बदलल्या.


यांतील कांही परंपरागत बलुतेदारांनी काळाबरोबर बदलत आपलं स्वरूप बदललं. नव्या जीवनशैलीला अनुरूप असं कौशल्य आत्मसात केलं आणि ते फक्त तगुनच राहिले असं नाही तर शिक्षणाचं महत्व ओळखून त्यांनी आपली प्रगतीही केली. काहींनी लोकांच्या वाढत्या गरजांच्या संख्येनुसार/प्रकारानुसार नवनवीन कामं शिकून घेतली आणि ते *आधुनिक  बलुतेदार*  म्हणून उदयाला आले. ज्यांना कांहीच जमलं नाही ते मात्र नाईलाजानं जीवनौघांत प्रवाहपतिता सारखे वाहत राहिले.


तांत्रिक युगांत कुटुंबाचा आकार आक्रसत असतांना आणि आपलं वर्तुळ *आपण-आपलं* *आम्ही-आमचं* *ते *मी-माझं* असं संकुचित होत असतांना ही सर्व मंडळी मात्र आपल्या आयुष्याच्या परिघांत सहज सामावल्या जातात. ते नातलग नसतात पण त्यांचं असणं ही आपली गरज असते. 


आपली बरीचशी नाती रक्ताची असतात. ती जन्माबरोबरच आपल्या सोबत असतात. पण कधी कधी ती फक्त *आहेत* म्हणून *असतात*. त्यांत मायेचा ओलावा, जिव्हाळा असतोच असं नाही. तर पुष्कळदा रक्ताचं कांहीच नातं नसतांना फक्त प्रेम, स्नेहाच्या रेशीम धाग्यांच्या नात्यांची वीण अधिक घट्ट, गहिरी होत जाते. इतकी घट्ट की संशयाच्या, गैरसमजाच्या दुःखाचं सावट जरी त्यावर पसरलं तरी ते लगेच विरून जातं. या नात्यांना नावाचं लेबल नसतं, ती अनाम असतात इतकंच...

 जवळपास गेल्या महिनाभर आपण दररोज एका बलुतेदाराला भेटत होतो.


मंडळी! या प्रत्येक बलुतेदाराच्या केलेल्या वर्णनातील  प्रसंग कमी जास्त प्रमाणांत आपल्या प्रत्येकाच्या अनुभवास आले असावेत. पुढेही आपल्या दैनंदिन व्यवहारांत, भविष्यातही कदाचित त्यांचे अनुभव येतच राहतील. लिहिण्याच्या ओघांत कुठेकुठे अतिरंजितपणा आलाही असेल, पण तो क्षम्य असावा.


हे लिखाणही मी *थोडक्यात गोडी* या उक्तीप्रमाणे केव्हांच संपवणार होते. रोज लेख पाठवला कीं ठरवायचे, हा शेवटचाच बरं कां!  पण रात्री प्रतिक्रियांच्या शेवटी *आतां उद्या कोण?* हा प्रश्न वाचला कीं तो निश्चय डळमळीत होऊन मी पुन्हां पुढच्या बलुतेदाराला आपल्यापुढे सादर करायचे. 


कांही बलुतेदार अजूनही एकमेकांना बाजूला सारत 'मला पण भेटू दे नं सर्वांना... मला पण 'असं म्हणत माझ्याकडे हट्ट करत आहेत, पण....


*कधी थांबणार?* या प्रश्नांपेक्षा *कां थांबलात?* हा प्रश्न जास्त अर्थपूर्ण आहे, असं थोरामोठ्यांनी म्हणून ठेवलंय, नुसतंच म्हटलं नाहीतर आचरणातही आणलंय. माझी त्यांच्याशी  तुलना करण्याचा अजिबात विचार नाही, ती होऊच शकत नाही. पण *महाजनो येन गत: स पन्थ:* मी विराम घेतलाय.

या लेखन प्रवासांत आपण सर्वांनी आपल्या बहुमोल भावना वारंवार माझ्यापर्यंत पोचवल्या.

मी आपली अत्यंत आभारी आहे.

भेटुया........ पुन्हां....... कधीतरी


सौ..भारती महाजन-रायबागकर

bharati.raibagkar@gmail.com

9763204334

Friday, June 4, 2021

32. आधुनिक बलुतेदार

 *32*   *आधुनिक बलुतेदार*


काल जेवण झाल्यानंतर उशीर झाला म्हणून तसंच झोपुन गेलो. टोचणाऱ्या गादीवर झोप आली नाही ही गोष्ट वेगळी. 


आतां मात्र हा पसारा आवरतांना आपली कंबर ढिली होणार. कारण कामवाली मावशी दुपारी उशीरा येणार, नंतर   धुसपुसत तो पसारा कसाबसा आवरणार, तोपर्यंत हे काम असंच कसं ठेवायचं. त्यांतही ती आली तर ठीक, नाहीतर अचानक सुट्टी घेतली तर... 


 अशी ही जिच्यावाचुन आपले, विशेषतः महिलांचे पदोपदी अडते  ती... आपली…


      *मोलकरीण, कामवाली बाई किंवा मदतनीस*



पूर्वी गांवातल्या सर्वच बायका घरचं काम स्वतः करत. शिवाय शेतांत मजुरीलाही जात. त्यामुळेच मालकीण आणि कामवाली बाई त्या स्वतं:च असत. फक्त तालेवार  किंवा सावकार यांच्या घरी माणसं /बायका  कामाला असत. वडिलोपार्जित मिळालेलं कर्ज, आणि त्यावरील व्याज फिटण्यासाठी त्यांना त्यांच्या घरी काम करण्याशिवाय गत्यंतरच नसे. कर्ज फिटत नसेच, ही गोष्ट वेगळी. मग त्यांची मुलं ते कर्ज फेडण्यासाठी तिथंच कामाला जाऊ लागत. असं पिढी दर पिढी हे दुष्टचक्र चालत असे.


पुढे शहरांत स्त्रिया नोकरी करू लागल्या आणि त्यांना मदतीला कोणीतरी हवं असं  वाटु लागलं. नोकरी केली नाही तरी घर काम करणे हे तब्येतीमुळे किंवा कंटाळ्या मुळे शक्य होत नसे. गांवातून शहरांत आलेल्या गरीब कुटुंबांनाही कांहीतरी काम हवंच होतं. असं दोघींच्याही गरजेतून घरकाम करणाऱ्या मावशींची  जमात उदयाला आली असावी. 

 ( दोन-तीन दिवस जर बदली न देता बाई आली नाही तर किती तारांबळ उडते आपली. अक्षरशः देव आठवतात सगळे. गृहिणी असली तर कसंतरी निभावून तरी नेता येतं. पण नोकरदार स्त्रियांची तर तारेवरची कसरत असते. )


तिला कामावर ठेवतांना साधारण असे प्रसंग घडतात. आपण तिला आधी आपल्या कामाचं स्वरूप समजावून सांगत असतो तेव्हां ती आपल्या पूर्ण घरावरून शोधक नजर फिरवत असते, घरातल्या माणसांचा अंदाज घेते, आणि मग विचारते, "काय काय काम करायचं हाय?"

 (समजा)

आपल्याला स्वयंपाकाला बाई ठेवायची असली तर आपण म्हणतो,

“ आम्ही पांच माणसं आहोत, त्यांचा स्वयंपाक करायचा. फुलके पातळ झाले पाहिजेत, चट्टे पडायला नको. फुलके सकाळ-संध्याकाळ दोन्ही वेळेला गरम करायचे. भाजी नीट बारीक चिरुन घ्यायची. जास्त तिखट करायची नाही. आणि सर्वांत शेवटी कुकर लावायचा. ओटा नी...ट आवरून घ्यायचा. त्यानंतर इतर कामं करायची. आपल्याला मध्येच थांबवून विचारते, 

“थांबा थांबा, ताई,

 पोळ्या किती करायच्या? त्याप्रमाणे माज्या येन्याआदी तुमी कणीक मळुन ठेवायची. प्रत्येक पोळीचा इतका रेट हाये. ज्यादाच्या पोळीचे ज्यादा पैसे लागतील. आन भाजी तुमी चिरून ठेवायची. पालेभाजी असली तर आदी धुऊन घ्यायची. डाळ तांदूळ धुऊन ठेवायचे.”


“ आणि मग तू काय करणार?”


मी फक्त पोळ्या लाटणार, भाजी  फोडणीला घालणार, आणि डाळ तांदळाचे डबे कुकरमध्ये ठेवून तो गॅसवर ठेवणार.!


 तिनं सांगितलेल्या रेटप्रमाणे आपण आयुष्यभर किती रुपयांच्या पोळ्या लाटून, प्रत्येकाच्या वेळेप्रमाणे, गरम करून खाऊ घातल्या याचा मनांतल्या मनांत हिशोब करून आपण हतबुद्ध होऊन पहातच रहातो. तिला कांही बोलणार एवढ्यात आपले गुडघे हलवून हलवून आपल्याला भानावर आणतात. आंता पोळ्या लाटणं तर होतच नाही. मग काय करणार! तिच्या अटी ऐकणं

भागच पडतं.


“आणखी काय काय कामं करायचीत?” तिनं विचारल्यावर आपण सांगायला सुरुवात करतो...


"हे सर्व घर झाडून घ्यायचं, कोन्या कोपऱ्यातून..."

" बरं पुढं... "

“सर्व फरशी नीट पुसून घ्यायची, प्रत्येक खोलीतील फरशी पुसून झाल्यावर पाणी बदलायचं.”

“आस्सं... पुढं...”

"कपडे हाताने धुवायचे”

"कामुन  वं, ती मशीन दिसतीया कीं..." आपल्याला थांबवुन ती विचारते, 

“मला नाही आवडत मशीनचे कपडे...”

“भांडी स्वच्छ घासायची, साबण ठेवायची नाही, आणि दोनदा यायचं सकाळ-संध्याकाळ...”


"झालं तुमचं?" ती शांतपणे विचारते.


"आता सांग, किती पगार घेशील?”  

आणि तिने सांगितलेला आंकडा ऐकून आपण एकदम जमिनीवर येतो.

“अगं खूप झाला हा, मी पहिल्या बाईला इतकाच देत होते.”


“ म्हणून तर ती सोडून गेली न्हवंं, आसंल एकांदी आडलेली, मी बी तेवडाच पगार घिन, पर एकाच बकेटीत पुऱ्या घरची फरशी पुशीन, कापडं हातानं धुनार नाय, ती वाशिंग मशीन जाम हुईल वापरल्या बिना...आणि भांड्यान्ला आन् पोळ्यान्ला      बी एकडावच यीन, आन जुनं कापडं तुमी माझ्या बिगर कोणाला देनार! हाय का कुबुल?”

आणि आपण शरणागती पत्करून 'कबूल, कबूल, कबूल ' असं म्हटलं कीं ती विचारते, “

“मंग यिऊ का उद्यापास्नं?”

आपण हो म्हटल्याबरोबर ती आठवल्यासारखं करून म्हणते...

“रविवारी मी येणार नाय, माजी सुट्टी असते, आन्  ती भांडी सोमवारी घासायला टाकायची न्हाईत. आल्या आल्या मला च्या लागतो, ताज्या दुधाचा... आदीची उकळलेली पावडर टाकायची नाय, पावन्यांचे कापडं मी धुवायची नाय, आन् अधनंमधनं खाडे झाले तर ते कापायचे नाय. ठरलं तर मग ...येत्ये उद्यापास्नं. किती वाजतां यिऊ? "


 आणि आपण विचार करून सांगते असं म्हणेपर्यंत आपली पाठ, कंबर आपल्याला *हाय, हॅलो*  असं म्हणतात. शिवाय उद्या तिचा विचार बदलला तर काय करायचं या धास्तीने आपण घाईघाईत तिला म्हणतो,

"अगं, उद्यापासुन  कशाला?आजपासुनच...नाही, नाही... आत्तांपासुनच सुरु कर कीं काम!"


भेटुया…...


सौ. भारती महाजन-रायबागकर, चेन्नई

bharati.raibagkar@gmail.com

9763204334



Thursday, June 3, 2021

31 आधुनिक बलुतेदार

 *31*   *आधुनिक बलुतेदार*


पीठ दळुन आणलं, स्वयंपाक झाला, जेवणावर भरपेट तावही मारून झाला, आतां...? आतां काय... किती उशीर झालाय एवढी सगळी उठाठेव करतांना...बाहेर जेवायला नक्को म्हणे...मग आतां निद्रादेवीची आराधना करायची...पण हे काय...!ही गादी अशी काय टोचतेय पाठीला! च्च...कापूस गोळा झालाय वाटतं...नाहीतरी खूपच जुन्या झाला होत्या गाद्या...आणि आतां सगळंच नवीन आणलंय तर गाद्याही नवीनच कराव्यात...कसं...


                 *गादीघर वाला*


पूर्वीचं आठवतं? सगळ्यांनाच नाही आठवणार. लहान गावांत बायका दुपारच्या जराश्या निवांत वेळी अंगणात गोधड्या शिवत बसलेल्या दिसायच्या. अर्थात या निवांत बायका म्हणजे ज्यांना शेतात जाणं शक्य नसायचं अशा वयस्कर बायका. 

गोधडी म्हणजे जुनी, सुती,२-३ नऊवारी लुगडीं गोधडीच्या आकाराप्रमाणे एकाआत एक नीट घडी घालून ती जमिनीवर अंथरायची  आणि जाड दोऱ्याने त्यावर सुबक धावदोरा घालायचा. ह्याच गोधड्या मातीच्या जमिनीवर झोपतांना सर्वसामान्य माणसांच्या अंथरूण आणि पांघरून म्हणूनही कामी यायच्या. तालेवाराकडे क्वचित गाद्या असायच्या.

आता शहरांत मातीच्या जमिनीही नाहीत आणि सहसा जमिनीवर कोणी झोपतही नाही. लोखंडी पलंग, लाकडी दिवाणावर झोपण्यासाठी गाद्यांची आवश्यकता अपरिहार्य झाली. आणि साहजिकच गादीघरवाला हा नवा बलुतेदार उदयास आला.

पूर्वीही कापूस पिंजून घ्यायचे. आधी एक धनुकली घेऊन, नंतर हात गाडीवर यंत्र लावून घरोघरी जाऊन  *आपल्याच अंगणात* कापूस पिंजून देत असत. आता अंगणही नाही आणि म्हणुन ते दारावर येऊन पिंजून देणारेही नाहीत. म्हणून हळूहळू इतरांप्रमाणे  यांनीही आपली दुकानं थाटली आणि आतां त्यांच्याच  *अंगणात* आपल्याला गाद्या भरायला जावं लागतं. *अमुक गादी घर* अशी पाटी दुकानांवर झळकू लागली. झळकते कसली! कापसाचे तंतू उडुन झाकोळलेली असते खरं तर. 

एखादा दुकानाचा गाळा...बाहेर आठ-दहा गाद्यांची थप्पी, एका बाजूला थोडेफार गादीच्या कापडाचे तागे, वर टांगलेल्या ऊशा, आणि एका बाजूला गाद्या-ऊशांच्या खोळी शिवण्यासाठी मशीन असे साधारण त्या दुकानाचे दर्शनी स्वरूप असते.

मागच्या भिंतीशी कापूस पिंजायचे यंत्र आणि  *माळ्यावर कापसाने भरलेली पोती*  ठेवलेली असतात. आणि कापसाचे बारीक तंतू आणि कचऱ्याचे कण बाहेर उडुन येऊ नयेत म्हणून एखाद्या कापडाचा किंवा बारदानाचा पडदा लावलेला असतो. बारदान म्हणजे विरळ विणीचं पोतं किंवा फारी किंवा किंतान.

या दुकानाच्या बाहेर रस्त्यावरच एखादं बेडशीट किंवा बारदान टाकून  एक दोन कारागीर एखाद्या गादीला टाके घालत बसलेले असतात किंवा ती पूर्ण झाल्यावर तिच्यावर काठीने धोपटुन आंतील कापुस एकसारखा पसरवत असतात. अशावेळी या सर्वांच्या तोंडाला कपडा बांधलेला असतोच असंही नाही.

आपण आपली गादी त्याच्याकडे घेऊन जातो. एकदा तिच्याकडे पाहून तो गादीच्या आकाराप्रमाणे (सिंगल बेड-डबल बेड) प्रकाराप्रमाणे (साधी- बॉक्स टाईप)  साधारण दोन चार दिवसांची मुदत सांगतो. अशावेळी आपण एकाच वेळी सर्व काम एकदाच करून घेऊ या विचाराने जर घरांतील सर्वच गाद्या एकदम घेऊन गेलो तर मग तोपर्यंत झोपायचं कशावर हा प्रश्न पडतो. आणि कांही पर्याय नसला तर त्यांतल्या त्यात लवकर देण्याची विनंती करून सतरंजीवर झोपण्याचा पर्याय स्वीकारतो. अशावेळी पाठदुखी साठी सतरंजीच बरी असंही आपल्या मनाला घरातल्या सर्वांना पटवुन देतो.

कधी तो आपल्या गाद्यांचा कपडा पाहून म्हणतो,

“पुराना हो गया है साब, बनाते बनातेही फट जायेगा, खाली पिली नुसकान, देखो अपने पास बढीया कपडा है, एकदम फस्क्लास, बोलो कौनसा दू?”

आपण एकदा गाद्यांकडे आणि एकदा त्याच्याकडे,मग गाद्यांच्या कपड्याकडे बघतो. आणि निघतांना घरून दिलेल्या  "नीट लक्ष द्या, कापसाची अदलाबदल होऊ देऊ नका, कपडा चांगला आहे गाद्यांचा, उगीच नव्याचा खर्च नको आत्तांच, अन् हो...समोर बसूनच भरून घ्या गाद्या...कितीही वेळ लागला तरी... इत्यादी इत्यादी ह्या ढिगभर सूचना आठवताच क्षणभर 

'नको नको हाच राहू दे कपडा' असं म्हणावं वाटत असतांनाच...तो म्हणतो,

“ठीक है साब, भरता हू इसमेच” पण ह्या त्यांच्या प्रकट वाक्याबरोबर आपल्याला 'मेरा क्या, मेरा फायदाच है इसमे' हे स्वगत ऐकू येते. आणि आपण नवा कपडा घेऊन टाकतो.

कधीकधी कापसाबाबतीतही असंच होतं. त्याच्या जवळच्या रेडिमेड गाद्या चांगल्या कापसाच्या नसतील अशी खात्रीच असल्यामुळे आपण त्या पसंत करत नाही. शिवाय आपल्याला फसवून तो आपला चांगला कापूस बदलून कमी प्रतीचा भरेल अशी सार्थ भीती वाटत असते. मग आपण 'किती छान झोप लागेल यावर' अशी दिवास्वप्नं पहात त्याच्याकडचा अगदी उच्च प्रतीचा कापूस महाग असला तरीही घेतो. आणि आपल्या समोरच गाद्या उशा भरून दे असा आग्रह करतो. आपल्या कामाची आणि त्याच्या वेळाची सांगड जमली तर तो तयारही होतो. आपण बाजी मारल्याच्या समाधानानं बाहेरच्या खुर्चीवर, बाकड्यावर, कधी पायरीवर सुद्धा ठिय्या मारून बसतो.  आणि बाहेर जर गादीला टाके घालणं चालू असेल तर आपण मन लावून ते काम बघत बसतो. पण गादी धोपटणं चालू असेल तर मात्र शेजारच्या एखाद्या पायरीचा आसरा घ्यावा लागतो. पण... *परदे के पीछे क्या है*  हे आपल्याला कुठे माहीत असतं! काही दिवसांतच गादी-उशीला टेंगळं येऊन आपल्याला ॲक्युप्रेशरचा मस्त फिल येतो. मुफ्तमें इलाज! किंवा एखादा लोड, ऊशी जर काही कारणाने उस वावी लागली किंवा फाटली तर काय दिसतं...बरोब्बर! वरवर आपला चांगला कापूस आणि आंत मध्ये...?

*माळ्यावरील कापसाच्या पोत्यांचं रहस्य*  आत्तां उलगडतं...पण आतां काय करणार!

अशावेळी आपल्या भ्रमाचा भोपळा फटकन फुटतो. बरं तेवढ्यासाठी ते सगळं ओझं त्याच्याकडे घेऊन त्याच्या पदरांत त्याचं माप घालणं शक्यच नसतं. किंवा नुसतंच जाऊन त्याला जाब विचारणं...? काय उपयोग! त्यापेक्षा घरचा आहेर गपगुमान स्वीकारावा हे उत्तम.

डनलाॅपच्या गाद्या तर आपल्या आरोग्यासाठी चांगल्या नसतात असं आपलं ठाम मत असतं. मग...?

मग काय...?

 *भरे जैसी गादी। तैशी नीज घ्यावी*

     *कुस पालटावी । वारंवार*


सौ.भारती महाजन-रायबागकर 

bharati.raibagkar@gmail.com

9763204334

      

Wednesday, June 2, 2021

30. आधुनिक बलुतेदार

 *30*     *आधुनिक बलुतेदार*


 नवीन भांडी घेऊन आलो. आणि ती लगेच वापरण्याचा मोह तर होणारच. म्हणून लगबगीनं स्वयंपाक करायला जावं तर... डब्यात कणिक पीठ काहीच नाही. आतां.... काय म्हणता...? नुसता भात किंवा खिचडी करून खायची...! छे...ते! आपल्या नाही बुवा पोट भरत तेवढ्यांन... पोळी भाकरी पाहिजे म्हणजे पाहिजेच... त्यासाठीच तर...


 पहिली माजी ववी ग। 

द्येवा पांडुरंगाला।।

उदंड आऊक्ष लाभू दे।

कपाळीच्या कुक्काला


दुसरी माजी ववी ग।

माझ्या धुरपतीला।।

ल्येक आली म्हायेराला।

पंचिमीच्या सनाला


जात्याच्या घरघरीत आपला सूर मिसळून पुराणांतल्या, इतिहासातल्या, संसारातल्या घटनांची, नात्यांची सांगड घालुन, ओव्या म्हणत दळणाचे श्रम हलके करणाऱ्या ग्रामीण स्त्रिया आतां आतांपर्यंत दिसायच्या. पहाटेच्या पवित्र वातावरणांत त्या सुरांनी पहाट मंगलमय होऊन जायची. पण हे कानांना कितीही गोड लागत असलं आणि व्यायाम- बियाम होऊन शरीर काटक, घाटदार होतं हे कितीही खरं असलं तरी आता ऐकायला रेडीओ,  मोबाईलवरचं प्रभात संगीत असतं आणि व्यायामाचं म्हणाल तर त्यांना इतर कामं काय थोडी असतात होय? आणि शहरांत जर गिरण्या किंवा रेडिमेड आटा वापरला जातो तर ग्रामीण स्त्रियांनी तरी जात्यावर दळण्याचे कष्ट कां करायचे?(आणि व्यायामासाठी जिम असतंच कीं... शहरांत)


 बरोब्बर! आजचा बलुतेदार आहे...


*पिठाची गिरणीवाला*


पीठ, कणिक ही तर आपली अत्यावश्यक दैनंदिन गरज. ते घरचं असो, गिरणीचं असो किंवा रेडिमेड. आपला एक दिवसही त्यावाचुन निभणार नाही. मग पिठाच्या गिरण्या सुरू होणं तर अपरिहार्य! एक छोटासा गाळा असला की पुरे! मग तेथे पांढरट दगडाचं मोठं जातं, ते चालवण्यासाठी मोटार, त्याला आणि धान्य टाकायच्या यंत्राला जोडणारा एक रुंद पट्टा, धान्य टाकण्यासाठी एक गोल, मोठ्या तोंडाचं पत्र्याचं नळकांड्या सारखं भांडं आणि खालच्या बाजूला दळलेलं पीठ पडण्यासाठी एक रुंदसं तोंड.


पूर्वी ही गिरणी डिझेलवर चालायची. तिचा फक् फक् असा वेगळाच आवाज यायचा. एखादी बाई बापडी दळण घेऊन यायची आणि म्हणायची, 


 "दादा, अर्जंट पायजेल बग, पीट न्हाई घरात आन् पाव्हनं यिवुनश्यान बसल्यात". 


त्यावर तो नाईलाजानं म्हणायचा, 


"ते समदं खरं आहे,पण डिजल संपलंय, काय करू मग!"त्यावर


"अरे द्येवा! आता उसनवारी कराया पायजेल"


असं म्हणून ती हताशपणे निघून जाई. 


हळूहळू अपवाद सोडले तर खेड्यापाड्यातही वीज आली. आणि गिरण्या विजेवर चालू लागल्या. आता डिझेल सारखी तीही संपतेच कधीकधी. संपते म्हणजे येणं-जाणं हा लपंडाव चालूच असतो ना! लोडशेडिंगच्या काळांत तर वीज असण्याच्या वेळी त्या गिरणीवाल्या वरच अधिक लोड असतो. कारण सगळ्यांनाच लवकर पीठ हवं असतं. 


बरं त्यांतही गहू, बाजरी, ज्वारी, हरभरा दाळ असे विविध प्रकार आणि ते एकाच घरचे असले तर मग आणखीच पंचाईत. कारण पुढच्या नंबरच्या गिर्‍हाईकाला गव्हांवर गहूच दळुन हवे असतात. मग पहिल्या नंबरचे ज्वारी, डाळ इत्यादी इत्यादी साईड ट्रॅकवर पडतात. असे पुढचे नंबर जितके जास्त तितके हात चोळत, चरफडत बसण्याचा वेळ जास्त.

कारण आपल्याला आपल्यासमोरच दळण दळून हवं असतं नं! नाहीतर पीठ जाड, बारीक तरी व्हायचं किंवा पीठ खाल्ल्याचा (शब्दशः) तरी संशय असतो. अखेर 

"तुझ्या सवडीनं ठेव दादा दळून, नंतर येऊन नेता येईल, कामं पडलीत माझी" असं म्हणत आपण रागारागांत निघून जातो. आणि गिरणीवाला त्या समोरच्या गिर्‍हाईकाला म्हणतो,

"आतां मी चार धान्यांच्या चार गिरण्या लावु कां काय? एकाचं ऐकावं तर एक नाराज होतो. भाव वाढवला तर मात्र सर्वजण कुरकुर करतात. मला पण पोट आहे कीं नाही?"


पिठाचं जाड-बारीक पण हा तर नेहमीच वादाचा मुद्दा असतो.एखादेवेळेस आपल्याशिवाय म्हणजे (आपणच,) दुसरं कोणी गेलं तर... 

"लक्ष कुठे होतं? कुठे गेले होते? त्या मोबाईल मध्ये डोकं घालून बसले असाल...आतां ह्या जाड पीठाच्या पोळ्या नाही, रोटले करून खाऊ घालते जाडजाड"

असा शाब्दिक आहेर मिळतो.


कधी हरभरा डाळ कितीही गरम करून नेली तरी तो हात लावून म्हणणार,

"सादळली आहे, आतां नाही दळल्या जाणार, पुन्हा गरम करून आणा."

'आता काय शेगडी घेऊन येऊ इथे' 

असं आपण  म्हणतो (अर्थात...मनांतल्या मनांत) अशावेळी आपलं डोकं मात्र नको गरम व्हायला.


आतां कितीतरी कंपन्यांचा रेडीमेड आटा जरी मिळत असला  

आणि *घर के चक्की जैसा आटा* अशी कितीही भलामण करत असले तरी तो नाइलाज म्हणूनच वापरला जातो. कधी गिरणी जवळ नसते, कधी आपल्याला वेळ नसतो, कधी गहू मिळत नाहीत अशी अनेक कारणं असतात.


यावर उपाय म्हणून आता घरघंट्या उपलब्ध झाल्याहेत. अगदी एका स्टुलच्या आकारापासुन ते एखाद्या छोट्याशा टेबलाच्या आकारापर्यंत जागेच्या उपलब्धतेनुसार त्या आपल्याला घेता येतात. पण त्या साफ करण्याची ही कटकट नको म्हणून रेडीमेड आटा घेणारे आहेतच. शिवाय हेही काम बहुतांशी स्त्रियांनाच करावं लागतं.अपवाद सोडा.


सैन्य पोटावर चालते असं म्हणतात. त्यांच्या पोटासाठी टनावारी पीठ दळण्यासाठी काय वापरत असावेत बरं! मला फक्त औरंगाबादची पाणचक्की तेवढी माहित आहे.


तर असा हा गिरणीवाला...दिवसभर ते बारीक पीठाचे कण नाकातोंडावाटे शरीरांत जाऊन त्याला अपाय तर होत नसेल? पीठ उडू नये म्हणून गिरणीच्या तोंडाला एक कपडा बांधलेला असायचा. तसं कांही तो तेव्हां *आपल्या* तोंडाला बांधत नसे. *आतां*?  


जातां जातां एक गंमत... मी लहानपणी रावळगाव चॉकलेट फॅक्टरी गेले होते. तेथे अशा गिरणी सारख्या यंत्रातुन वरून कोरडे मिश्रण टाकल्यावर खालुन मिंटच्या चौकोनी गोळ्या पडतांना पाहिल्या होत्या.


 मनात आलं...वरून पीठ टाकुन खालुन आपोआप तयार पोळ्या मिळणारं *छोटसं घरगुती यंत्र* आलं तर...


सौ. भारती महाजन- रायबागकर

bharati.raibagkar@gmail.com

9763204334

Tuesday, June 1, 2021

29 आधुनिक बलुतेदार

 *(29*  *आधुनिक बलुतेदार*


आत्तां कुठे घर स्थिरस्थावर झाल्या सारख वाटतंय. जरा नव्यासारखी झळाळी आलीय. तशी... स्वयंपाक घरात... भांडी खूप आहेत...पण *किचनमध्ये* ही जुनी भांडी ज...रा...


 आलं ना लक्षांत...


*भांडी दुकानदार*


खूप पूर्वी लहान खेड्यांत मातीच्या भांड्यात अन्न शिजवत असत आणि लाकडाच्या परातीत (काठवट) कणीक भिजवत असत. अजूनही काही खेड्यांत नक्कीच अशाप्रकारे अन्न शिजवत असतील. पण खूप ठिकाणी आता स्टीलची

किमान ॲल्युमिनियमची भांडी वापरायची पद्धत सुरू झाली आहे.


फार जुनी गोष्ट नाही. स्टीलच्या भांड्यांनी बाजारात नुकताच चंचुप्रवेश केला होता. पण बऱ्याच ठिकाणी चुलीवर स्वयंपाक करायचा असेल तिथे स्वयंपाकासाठी पितळेची भांडी वापरली जायची. प्रदेशानिहाय त्यांना गंज, पातेलं, भगुनं असं म्हणत. वरण शिजवण्यासाठी गोल बुडाचा लोटा, भरत्या असायचा.

 अन्न करपु नये म्हणून रोज रात्री त्यांना ओल्या मातीचा पातळ थर द्यावा लागायचा. चुलीच्या पोतेऱ्याबरोबर हे एक आवश्यक काम असायचंच.


त्यानंतर ॲल्युमिनियम, मग त्याहुन थोडं जाड, न करपणारं... विशेषतः दुधासाठी...आलं. त्यांनी कांही दिवस राज्य केल्यावर त्यांच्या भल्याबुऱ्या परिणामां बद्दल कांहीबाही बोललं जाऊ लागलं आणि नंतर मात्र किंमतीच्या तुलनेत टिकाऊ आणि स्वच्छ करण्यास सोपे, मुख्य म्हणजे कल्हई करण्याच्या  कटकटी पासून सुटका...त्यामुळेच  भांड्यांच्या विश्वांत स्टेनलेस स्टीलनं आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं.


पाण्यासाठी मुख्यत्वें तांब्याची भांडी वापरल्या जात. त्यांना कल्हईचे काम नसले तरी तीं चकाचक घासणे हा एक सोहळाच असायचा. तेवढा वेळ आतां कोणाला असतो! त्यामुळे त्यांतही वेगवेगळ्या घाटांचे हंडे, पिंपं,कळश्या विराजमान झाल्या. 


याशिवाय आवश्यक- अनावश्यक अशा अनेक वस्तूंसाठी आपण गरज किंवा हौस म्हणून जेव्हां भांड्यांच्या दुकानांत जातो तेव्हां चारही भिंतीवर, मधल्या जागेत, छतावर अडकवलेली, दुकानाच्या बाहेरील भागांतील उतरंड अशा दहाही दिशांना भरगच्च भरलेल्या...तांबे, पितळ, स्टील, हिंडालियम आपले स्वतःचे रंग घेऊन दिव्यांच्या उजेडांत त्या दुकानांत चमकत असतात. आणि तो दुकानदार आपला      वेगळाच रंग घेऊन गल्ल्यावर बसलेला असतो. पण त्याचं आपल्याकडे मात्र बारीक लक्ष असतं. चेहऱ्यावरून, पोषाखावरून, आधुनिक पोशाखाआड दडलेल्या  बोलण्याच्या ढंगावरून तो गिऱ्हाईकांवर गरजु, टाईमपास, हौशी इ.शिक्के लावुन टाकतो.


 आणि मग एका दांडीला बांधलेल्या मळकट कपड्याने भांड्यांवरची धूळ झटकत असणाऱ्या नोकराला आवाज देऊन सांगतो...

"अरे, ताईंना ते... हे... दाखव बरं! आणि ती कालच आलेली नवीन वरायटी पण दाखव. *(ताईंनाच* इथे साहेबांचं काम असलंच तर मुलं सांभाळायचं किंवा पिशव्या ऊचलायचं असतं.) एखाद्या वेळेस आपल्याला हवं असलेलं भांडं छताला टांगलेलं असलं तर काठीच्या टोकाला असलेल्या हुकानं तो ते इतकं लीलया काढतो कीं बस्...


कधी कधी आपण विंडो शॉपिंग करत असतांना अचानक आपल्याला मैत्रिणीकडे पाहिलेला चमच्यांचा आधुनिक सेट आठवतो. *जुळ्याचं दुखणं* दुसरं काय! आपण सहजच बघू तर खरं असं म्हणत दुकानात शिरतो आणि घरांत डझनावारी चमचे असतांनाही पुन्हां तस्सेच चमचे घेऊन निघणार तेवढ्यात...

"काय ताई... एवढ्या सुंदर चमच्याने तुम्ही जुन्याच प्लेटमध्ये खाणार आणि पाहुण्यांनाही देणार? कसं दिसेल ते!     ह्या डिश बघा,एकदम मॅचिंग आहेत चमच्यांना..." आपल्यालाही ते पटतं आणि मग त्याच्या जोडीला वाट्या ही कधी येऊन बसतात ते बिल देतांनाच कळतं.

तेव्हांही तो हळूच म्हणतो...

"एक मस्त डिनर सेट आलाय... आणि नवीन पद्धतीचा कुकरही... दाखवू कां? एकदम रिझनेबल रेट मध्ये...लिमिटेड आहे स्टाॅक..."

आपल्यालाही मोह होतो, पण तिरप्या नजरेने  हळूंच *तिकडं* बघितलं तर आपल्याला निग्रहानं नकार द्यावा लागतो. आपण तिकडे बघितलेलं त्याच्याही लक्षात येतं... तो म्हणतो...

"ठीक आहे, पुढच्या वेळी...तेव्हां मात्र तुमच्या त्या मैत्रिणीला घेऊन या... मागच्या वेळी आणलं होतं त्यांना..."


 कपड्यांच्या दुकानां सारखेच आतां भांड्यांचे पण इतके प्रकार आले आहेत कीं... *हे घेऊ कीं ते घेऊ, दुकान उचलुनी कां नेऊ!*  म्हणत आपण आपल्या घराचं खरोखरच *मिनी भांडी भांडार* करून टाकतो. तरीही वेळेवर हवं ते भांडं सापडेलंच याची खात्री नसते ते वेगळंच.


भेटुया...

सौ.भारती महाजन-रायबागकर

arati.raibagkar@gmail.com

9763204334

Monday, May 31, 2021

28 आधुनिक बलुतेदार

 *(28)*.  *आधुनिक बलुतेदार*


पूर्वी गावांत नळ नव्हतेच. सगळं पाणी नदी वरून किंवा विहिरीवरून भरलं जायचं त्यामुळे नळ बिघडण्याचा आणि दुरुस्त करण्याचा प्रश्नच नसायचा.

शिवाय गावातलं बाथरूम 

 म्हणजे अंगणातलं अर्धवट साडेतीन भिंतींचं उघडं न्हाणीघर... त्याचं पाणी केळी सारख्या एखाद्या झाडाला जाणार... तुंबण्याचा प्रश्नच कुठे येतोय! आणि प्लंबरची गरज तरी कशाला लागते!


हे सगळे प्रश्न शहरांतल्या बंदिस्त घरांत निर्माण झाले. पुढच्या किंवा वरच्या घरातलं पाणी तुंबलं तरी तो पुढचा किंवा वरचा घरवाला 

 प्लंबरला बोलवायला तयार नसतो. कारण त्याला कांहींच त्रास नसतो. नाइलाजाने आपण त्याला बोलावून आणतो. तो निरीक्षण करतो, आउटलेट वरच्या जाळ्या उघडतो, गाळ साचला असेल तर तो काढतो, आपल्याला 2-4 बादल्या पाणी ओतायला लावतो. घसघशीत मजुरी घेऊन,' झालं साहेब, आतां कांही प्रॉब्लेम नाही बघा, असं म्हणून तो निघून जातो. सगळं सुरळीत झाल्यासारखं वाटुन आपण हुश्श म्हणतो. पण कसचं काय! 4-5 दिवसांनी पुन्हां 'येरे माझ्या मागल्या'


आपण पुन्हां त्याला बोलावल्यावर तो त्याच्या सवडीनं येतो. आपण त्याला जरा धारेवर धरण्याच्या प्रयत्न करून पाहिला तर, साहेब, आधी वरवरच काम करून पाहावं लागतं, एकदम मोठं कसं करणार! बघतो मी आतां...पुन्हां थोडा फार प्रयत्न करून पाहिल्यावर  म्हणतो, 'आतल्या पाईपचा ऊतार नीट नाही, फरशी खोलावी लागंल , खर्च करावा लागंल थोडा, 4-8 दिवस बाथरूम बंद ठेवावं लागंल.' आता काय करावं! आत्तांच तर एवढा खर्च झाला, पुन्हां एवढा खर्च, आणि दुसरं बाथरूम असलं तर ठीक , नाहीतर शेजाऱ्यांची मनधरणी !               

कधी गॅलरीचं आउटलेट उलट्या बाजूला असतं, पावसांत गॅलरीचा मिनी स्विमिंग पूल होतो. मुलं पोहायची हौस भागवुन घेतात. दुसरं आउटलेट करण्याशिवाय पर्याय नसतो. आणि त्यासाठी प्लंबरलाच शरण जावं लागतं. 

किचन ओट्यासाठी तर दुसरा/ तिसरा/ चौथा कुठलाच पर्याय नसतो.(नामजप करत ?) ओटा धुतल्यावर पाणी सिंक कडे लोटायचं किंवा न धुतां कपड्याने फक्त पुसून घ्यायचं एवढंच आपल्या हातांत असतं...बस्स्.


कधी एखादा नळ अचानक टप्  टप् करत गळायला लागतो. आपल्या डोळ्यांपुढे 'पाणी वाचवा' ही जाहिरात सारखी नाचत असते. आजकालचे नळ एक तर  वेगळ्या प्रकारचे, फॅशनेबल असतात. त्यांना लागणारे मोठे पान्हे आणि इतर साहित्य आपल्याकडे कुठून असणार! आपण बोलवल्यावर प्लंबर येईपर्यंत दोन -तीन बादल्या पाणी जमा झालेलं असतं. प्लंबर येतो, आपल्याला दोन बादल्या पाणी भरून ठेवायला सांगतो. वरचा कॉक बंद करतो. त्याच्या जवळच्या त्या विशिष्ट पान्ह्याने नळ उघडतो. आंत मधलं वाँशर किंवा अशीच काहीतरी क्षुल्लक गोष्ट, लागत असलेली त्याच्याकडे नसते. आणि आपल्याकडे असायचा तर प्रश्नच नसतो. मग तो सांगतो, ' हे बघा, मी आतां जेवायला जातो, येतांना ते घेऊन येतो.' आतां त्याला जेवायला नको कसं म्हणणार! आपण मुकाट मान डोलावतो. दुपारचं जेवण संपवून रात्रीच्या जेवणाची वेळ होते. 'हा काय शेतांत धान्य पिकवून, ते दळून, स्वयंपाक करून मग जेवणार होता की काय ! आपण आपला राग मनांतच ठेवून, आवाजांत शक्य तितकां नम्रपणा आणून त्याला फोन करतो. ' साहेब, काय झालं, मी येणारच होतो जेवण करून,   

पण इकडे दुसरं अर्जंट काम आलं आलं होतं दुपारच्याला. आतां उद्या सक्काळच्याला पैलेछुट येतो बघा, तंवर भागवुन घ्या जरा.' न भागवून कोणाला सांगता . आपण मनांतच चरफडत मुलांवर डाफरतो, "ए पाणी कमी सांडा रे, दोन बादल्या पाणी सकाळपर्यंत पुरवायचं आहे". 


फ्लॅटसिस्टीम मध्ये तर कधी भिंतीला लिकेज, कधी  वरच्या छताला ! 

कधी वरच्या तर कधी शेजारच्या फ्लॅटमधून आपल्या घरांत, कधी आपल्या घरातलं  खालच्या किंवा शेजारच्या घरांत! अगदी त्याच्यावर खाली बाथरूम किंवा किचनचं सिंक नसलं तरी... प्लंबरला विचारावं तर एखाद्या आशा सोडलेल्या पेशंटला पाहून डाँक्टर नकारार्थी मान डोलावतात तशी मान हलवून तो म्हणतो, 'कांही उपाय नाही साहेब. एकात एक गुंतलेलं आहे सारं.

तरी वॉटरप्रूफिंग करून टाकु. नवीन टेक्निक हाय, बघूया काय उपेग होतो का ते! आपल्याला मम म्हणण्याशिवाय पर्याय नसतो.


अगदी स्वतःच्या घरांत राहिलो तरी 'ठेविले कारागीरे,तैसेची रहावे' हेच खरं.

भेटुया…


सौ. भारती महाजन रायबागकर, चेन्नई

bharati.raibagkar@gmail.com

9763204334

Sunday, May 30, 2021

27 आधुनिक बलुतेदार

 *27*  *आधुनिक बलुतेदार*


काल धार लावुन घेतली तरी आधुनिक लोहाराला भेटुन आल्यावर राँट आयर्नचं, पावडर कोटिंग केलेलं फर्निचर खूपच आवडलं, मग ते खरेदी करावं असं वाटणारच ना! पण घरांतील सध्याचं फर्निचर जुनाट वाटायला लागलं तरी कधीकधी ते काढुन टाकावंही वाटत नाही. एकतर त्यात आपल्या आठवणी गुंतलेल्या असतात किंवा 'राहू दे,कधीतरी कामी येतंच बसायला पाहुणे आल्यावर, असाही विचार करतो.  पण सध्यांच्या घरांत तर नवीन फर्निचर साठी जागा होऊ शकत नाही.  मग आपण शक्य असल्यास खोल्या वाढवायचे ठरवतो आणि शोध घेतो घर बांधून देणाऱ्या मिस्त्रीचा, त्यालाच तर घेऊन आलेय आजचा बलुतेदार म्हणून....


              *मिस्त्री*


पूर्वी गांवातली घरं दगडा मातीची असत. आणि ती घरांतील बायका माणसं मिळून बांधत असत. सगळ्या घरांचा ढाचा साधारण सारखाच असे. जागेनुसार गरजा कमी जास्त होत असत, एवढेच. प्राथमिक ज्ञान प्रत्येकालाच असे.शिवाय गांवात सर्व जण एकमेकांची मदत करत असतात. 


तालेवार लोकांच्या वाड्याच्या बाहेरील भिंती चिरेबंदी दगडाच्या असत. चिरा म्हणजे टाके घालून ओबडधोबड दगडाचा घडवलेला चौकोनी दगड. ते काम पाथरवट करत.


आता सिमेंटच्या घरांची चलती आहे.  मातीच्या घरांची उपयुक्तता कितीही पटली तरी ते शक्य नाही. त्यासाठी सिमेंट काम करणारे कारागीर निर्माण झाले. मिस्त्रीला बढई किंवा कारागीर असे म्हणतात.


 एकदा घराचा नकाशा मोजमापासह तयार होऊन आला कीं कारागिराचे काम सुरू होते. कंत्राटदार, सुपरवायझर, कारागीर, आणि त्याच्या हाताखाली सिमेंट, वाळू, पाणी इत्यादी साहित्य आणून देणे, कॉंक्रीट तयार करणं इत्यादी काम करण्यासाठी रोजंदारीवर स्त्री पुरुष कामगार असतात. 


नकाशानुसार पाया खणल्या जातो. पिलर उभे राहतात, स्लँब पडतो आणि भिंती उभ्या करण्यासाठी विटांचे थर एकावर एक चढु लागतात. आपण देखरेख करण्याच्या निमित्ताने बांधकामाच्या ठिकाणी चक्कर मारतो. एकमेकांशी गप्पा करत त्यांच्या 'पद्धतीने ' काम व्यवस्थित चालू असतं. गप्पांच्या नादांत किंवा मुद्दाम संवय म्हणून अर्धी वीट पाहिजे असली तरी जवळच असलेली पूर्ण वीट घेऊन  तिचे खट्कन आपल्यासमोर दोन तुकडे करतो. तेव्हा आपण चट्कन तिथली एखादी अर्धवट वीट उचलून त्याला देत म्हणतो, “अहो दादा, ही घ्या नं, ती पूर्ण वीट कशाला फोडता?” कारण आपल्या डोळ्यांसमोर वाढता वाढता वाढलेल्या आणि म्हणूनच कोलमडलेल्या बजेटचे आंकडे नाचत असतात. पर अब *ओखलीमें सर दिया तो मुसलीसे क्या डरना*


 या कामांत मुरलेल्या मिस्त्रीला मात्र अशा प्रश्नांची संवय झालेली असते. तो आधीचीच फोडलेली वीट भिंतीत शांतपणे, व्यवस्थित लावून मग आपल्याला म्हणतो, “अहो साहेब/ मॅडम, असं नाही चालत, घर बांधायचं म्हणजे अशी बारकाई करून कसं चालंल! 'दात कोरून पोट भरतंय व्हंय.' आपण निमुटपणे दुसऱ्या किंचित तिरप्या दिसत असलेल्या भिंतीकडे जातां जातां गप्प बसून मागं वळतो, हो, नाहीतर तसं म्हटलं तर लगेच ओळंबा लावून दाखवायला तयार! 'हा सूर्य, हा जयद्रथ'! तो दिसला नाही तरी मान डोल्यावल्याशिवाय पर्याय नसतो.


खरी कथा सुरू होते फ्लोअरिंग करतांना. इतरांच्या अनुभवावरून शहाणं व्हावं म्हणून आपण तिथे जातीनं उभं राहतो. "दादा, उतार नीट काढा हं' अशी वारंवार सूचना देतो. 'तुम्ही अजिबात काळजी करू नका ताई, तुम्हांला तक्रारीला जागाच ठेवणार नाही बघा,” एकीकडे आपल्याला असं भरघोस आश्वासन देत दुसरीकडे, “ए पोरा, नीट स्लोप काढ तिथं, हां ,आस्सं, टाक तिथे शिमीट जरासं” असं काम करणाऱ्याला बजावत राहतो. 


बरं घरांतूनही, " ते उताराचं तुझं तूं बघून घे बरं कां ! नाहीतर, तक्रार करत बसशील मग!' असं म्हणून सगळी जबाबदारी आपल्यावरच अलगद लोटून दिली जाते. 


काम झाल्यावर संध्याकाळी नीट आवरून घे

 म्हणावं तर, “ बाई, आवो, उद्याच्याला पुन्हा असाच

 खकाना व्हायचांय न्हंव, रोज रोज झाडून पुसून घ्यायला ते काय रहातं घर हाय व्हंय' अशा शहाणपणाच्या दोन गोष्टी आपल्यालाच शिकवतात. कारण त्यांच्यासाठी ही रोजचीच गोष्ट असते.


आतां एवढे सगळे अनुभव आल्यावर कुठून आपल्याला हे बांधकाम करण्याची दुर्बुद्धी झाली असं म्हणत, ( मनांतल्या मनांतच हं... नाहीतर... 'तुलाच हौस होती फार' हा घरचा आहेर स्विकारावा लागतो.) आपण दुसर्‍या दिवशी पुन्हां आलिया भोगासी असावे सादर' होतो, '............, घर पहावे बांधून' या म्हणीची सत्यता पडताळून  पाहण्यासाठी.....


भेटूया......... उद्या.......


सौ. भारती महाजन- रायबागकर

चेन्नई

bharati.raibagkar@gmail.com

9763204334

Saturday, May 29, 2021

25. आधुनिक बलुतेदार

 *(25)* *आधुनिक बलुतेदार* 


काल लोहाराला भेटलो आणि माझी नजर कैची कडे गेली. कपडे कापतांना ती शार्प नसल्याने अडचण होते हे ही आठवलं. धार लावायला हवीत... पण कशी... कुठे... बाकीच्या वस्तुंचं ठीक आहे. पण कैची ही तर उपयोगी वस्तु, कोणाला रोज तर कोणाला कधीमधी...मग धार लावणारा शोधायला तर हवाच...


   *धार लावणारा*


 हत्यारांना धार लावण्यासाठी पूर्वी एका विशिष्ट प्रकारच्या दगडाचा वापर करत होते. हत्याराचा पातं त्या दगडावर घासलं कीं ते कामासाठी तय्यार. नंतर *गरज ही शोधाची जननी आहे* या उक्तीनुसार इतर यंत्रांप्रमाणेच धार लावण्याच्या यंत्राचाही शोध लागला.


 तोच दगड वेगळ्या आकारांत वापरलेलं एक चाक, पट्टा, चाकाची बैठक आणि इतर आवश्यक बाबी इत्यादी लावुन ते सायकलवर बसवलं कीं झालं धार लावण्याचे यंत्र. सायकलवर बसुन पायडल मारलं कीं चाक फिरायचं आणि हव्या त्या वस्तूला धार लावुन मिळायची. सायकलच्या पूर्वी एक मोठसं लाकडी स्टॅन्ड वापरत असत. पण हे लाकडी स्टँड त्यावरील यंत्रासह घेऊन फिरणं मोठं जिकिरीचं असायचं. त्याबद्दल त्यांना मेहनताना तरी किती मिळत असणार कोणास ठाऊक! त्यांतही घासाघीस करणारे महाभाग असतातच. वेगवेगळ्या प्रकारच्या हत्यारांना वेगवेगळ्या प्रकारच्या कोनांतुन कमी जास्त वेळ घर्षण करून धार लावली जायची.


अजूनही छोट्या गावांत किंवा मोठ्या शहरांत हे धार लावणारे *धार लावायची...य् का धार* असा पुकारा करत फिरत असतात. पण नाईलाज असला तरच त्यांच्याकडून कोणी धार लावुन घेत असावं. नाहीतर 'तो नीट लावत नाही, लगेच बोथट होते वस्तू' असं अनुभवांती ठरवून आपण त्याला टाळतोच. आणि जर एखाद्या वेळेस लावुन घेतलीच तर 'अच्छी लगाओ, और घुमाओ ना  मशीन' असं सारखं म्हणत असतो. आणि त्याने 'बस, अब ठिक है?' असं विचारल्यावर तोंड जरासं वाकडं करून 'हां... ठि..क है, पण पुढच्या वेळी अच्छी कर देना' असं बजावुन पुन्हां पैसे देतांना खळखळ करतो ते करतोच. तोही बिचारा 'ठीक है, बाईजी/मॅडम' असं म्हणत पुढचं गिऱ्हाईक शोधण्यासाठी गांवभर हिंडत फिरतो.


हं... आतां *चक्कु छुरीयां तेज कराले* असं गाणं म्हणत, नाचत कुणी सुंदरी आपल्या कामाची जाहिरात करत फिरत असली तर गोष्टच वेगळी. अशावेळी कामाचा दर्जा-बिर्जा...! त्याचं काय एवढं! पण आतां तेही कांही शक्य होईल असं वाटत नाही.गंमतीचा भाग सोडा. पण आतां तसाही घरांत स्टीलच्या वस्तूंचा वापर जास्त आणि लोखंडाच्या वस्तूंचा वापर कमी झाला आहे.


त्यामुळे आतां मध्यम शहरांतही या धार  लावणाऱ्यांचं एखादं दुसरंच दुकान असतं. त्याची हक्काची गिऱ्हाईकं म्हणजे न्हावी, शिंपी, माळी आणि असाच इतर व्यवसाय असणारे व्यावसायिक. ह्यांना

 तर गिऱ्हाईकांची कमीच नाही. त्यामुळे धार लावणाऱ्याकडे कामंही भरपूर असतं.


त्यातही त्याच्या कामाचा दर्जा चांगला असला तर आपलं अगदी अडत नसलं तर, जरा उशीर झाला तरी चालेल पण आपल्याला त्याच्याकडूनच धार लावुन घ्यायची असते. आणि तोही आपला दर्जा टिकवण्याचा प्रयत्न करतोच.


या चाकुसुऱ्यांचे आकारा-प्रकाराप्रमाणे धार लावण्याचे दरही ठरलेले असतात. तसा दर-फलकच त्यांनी दुकानाच्या बाहेर लावुन टाकलेला असतो. म्हणजे दारावर येऊन धार लावणाऱ्याशी करतो तशी घासाघीस करण्याचा प्रश्नच मिटला शिवाय कांही कैच्यांना तर दोन्ही पाती वेगळी करून धार लावावी लागते.


'कारागीर कमी आणि गिऱ्हाईक जास्त' असं व्यस्त प्रमाण असल्यामुळे इथेही रांग लावावी लागते आणि मग आपला नंबर यायला वेळ असला तर बाजारांतुन फेरफटका मारून नंतर आपली वस्तु घेऊन जावी लागते. शिवाय इथे फसवाफसवी चा प्रश्नच येत नाही.


आता लहान-मोठ्या कंपन्यांमध्ये पॉवरफुल ग्राइंडर असतात. त्यावर दिवस पाळी/ रात्र पाळी मध्ये काम करणारे कुशल-अकुशल कामगार असतात. काम मेहनतीचं आणि जोखमीचंही असतं. त्यांना पुरेशी सुरक्षितता, मेहनताना मिळत असेल ना!


सहज जातां जातां... ह्या धार लावणाऱ्यांना कांही विशिष्ट नांव आहे काय?


उद्या एक नवीन बलुतेदार...


सौ.भारती महाजन- रायबागकर, चेन्नई

bharati.raibagkar@gmail.com

Friday, May 28, 2021

24 आधुनिक बलुतेदार

 *24*  *आधुनिक बलुतेदार*


काल कापड दुकानदारांकडील एकही कपडा पसंत पडला नाही, खरेदी बारगळली आणि मन खट्टू झालं. पण तो तरी काय करणार! त्याचा जुना मालच खपला नाही तर तो नवीन कसा आणणार! त्यामुळे आतां इतक्या दिवसानंतर तेच कपडे घातल्यावर आपल्याला नव्याने नवीन वाटायला लागतील. लहान मुलांचं नाही कां... त्यांचे जुने, लहान झालेले कपडे, आवरायला म्हणून, कोणाला देऊन टाकायला म्हणून बाहेर काढले रे काढले कीं,' कित्ती छान, मला पाहिजे' असं म्हणत, त्यातला एखादा कपडा घालून दिवसभर बागडत असतात. 


बाहेर जाण्यावर आधीच निर्बंध, त्यांत कधीकधी सगळीकडे अवकाळी, पावसाळी वातावरण असतं. अंधारुन मळभ दाटून येतं आणि मन आणखी उदास होतं. मग दिवसाही अंधारलेल्या घरांत आपण दिवे लावतो, घर प्रकाशमान होतं, आणि आपलं मन प्रसन्न होतं. आपल्याला प्रकाश देऊन उजळणाऱ्या दिव्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच 'आषाढी अमावस्येच्या दिवशी आपण दिव्यांची पुजा करत असतो.म्हणुनच तिला 'दिव्यांची अमावस्या' म्हणतात. 


या दिवशी घरांतील सर्व दिव्यांची घासून पुसून स्वच्छता केली जाते. त्यांना एका पाटावर ठेवून गंध पुष्प वाहून त्यांची पूजा केली जाते. आपल्या वंशाच्या दिव्याचं आणि पणतीचंही औक्षण केल्या जातं. पण कितीतरी निर्जीव वस्तू स्वतः कांही करू शकत नसल्या तरी त्यांच्या सहाय्याने त्यांना साधन म्हणून वापरून आपण आपली सोय करू शकतो, म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्याची ही पद्धत असावी. 


आतां आपल्याला वाटेल तेला तूपाच्या दिव्यांचं ठीक आहे,  पण विजेच्या दिव्यांचं काय! ते तर बटन दाबलं की लागतात /विझतात. त्यांची पुजा कशी करायची? पण पण कुठल्याही कृती मागचा उद्देश लक्षांत घेतला तर पद्धत बदलली तरी तो साध्य होऊ शकतो. मग पारंपारिक पद्धतीने पूजा करता नाही आली तरीही त्यांना ओल्या कपड्याने पुसून स्वच्छ केलं तर ते अधिक प्रकाश देऊ शकतात. त्यांची बटनं तपासणं, एखादं वायर कुठे लुज झालं आहे का हे बघणं, एखाद्या वायरचं वरचं आवरण निघून गेलं आहे कां हे तपासणं, सगळ्या विजेच्या उपकरणांची तपासणी करणं, हेसुद्धा त्यांची पूजा करण्यासारखेच आहे. आणि ते फक्त ह्या दिवशीच करावी असं नाहीतर ती वारंवार केलेली बरी. 


आता ह्या दिव्यांचं जर कांही बिनसलं तर ते कांही आपण घरी दुरुस्त करू शकत नाही.त्यासाठीच आलाय आजचा बलुतेदार....


        *इलेक्ट्रिशिअन*


पूर्वी गावात वीजच नसायची. दिवली, चिमणी, कंदील यांच्या ऊजेडांत, रात्रीच्या गडद अंधारात गांव टिमटिमत असायचं, मग त्यांना या बलुतेदाराची गरजच काय!


याची गरज शहरांत वीज आल्यावरच भासू लागली, आणि उदयाला आला आणखी एक आधुनिक बलुतेदार! कुठल्याही वस्तूचा शोध लागल्यावर ती वापरतांना कधीतरी नादुरुस्त होतेच आणि ती दुरुस्त करणाऱ्याची गरज पडते. 


कधीतरी अचानक आपली ट्यूब पेटायची थांबते. आपण थोडेफार तिला हलवून पाहतो, पण ती ढिम्म! आपण इलेक्ट्रिशयनला फोन करतो. हो, येतो... येतो म्हणत दिवस मावळतांना येतो. ( तोपर्यंत दिवसभर ट्यूब कडे वर बघता बघता आपला मानेचा व्यायामही अनायासे होऊन जातो) तो आल्यावर ती जराशी हलवल्यासारखी करतो, आणि 'लागली बघा, जरासाच प्रॉब्लेम होता' असं सांगून त्या 'जराशा' प्रॉब्लेमचे पैसे मात्र 'बरेचसे' घेऊन जातो. 


  कधी ऐन ऊकाड्यांत डोक्यावरचा पंखा एकाएकी गरगरायला थांबतो आणि आपण घामाघूम होतो. आपण पुन्हां त्याचा धावा करतो, पुन्हा तो तसाच त्याच्या चालीने येतो, फॅन खाली घेऊन पाते  काढुन ठेवतो, मोटर किंवा सगळीकडे बारकाईनं  तपासतो, आणि अमुक पार्ट आणावा लागेल असं सांगतो. आपल्याला त्यातलं ओ कि ठो कळत नाही आणि आणायला वेळ नसतो. मग त्यालाच पैसे देऊन आणायला पाठवतो, आणि 'आत्ता घेऊन येतो' असं म्हणून गेलेल्या इलेक्ट्रिशियनचा 'आत्ता' कधीकधी दुसऱ्या दिवशी पर्यंत लांबतो. मग त्या अस्ताव्यस्त पसरलेल्या पंख्याला उचलून नीट ठेवण्याशिवाय पर्याय नसतो, आणि त्यानंतर त्याला उचकी लागेल इतकं त्याचं नांव घेत, रात्री झोप न आल्यामुळे पदर नाहीतर पेपर घेऊन न लागणारा वारा घेत जागत राहतो. कधी बटनं, कधी फ्युज, कधी आणखी कांही दुरुस्त करावं लागत असतं. किरकोळ दुरूस्ती कदाचित आपण शिकुन घेऊ, विजेचं काम करतांना रिस्क असते, त्यासाठी हा नेहमीच लागणारा अत्यावश्यक बलुतेदार...


 पण सगळेच असे नसतात. 'उडदामाजी काळे गोरे' तसे कांही प्रामाणिकपणे, वेळेवर, चोख काम करणारेही इलेक्ट्रिशयन असतात. मग भलेही ते पैसे थोडे जास्त घेवोत, पण त्यांनाच बोलवायचं असं आपण ठाम ठरवून ठेवतो. कारण काम खात्रीपूर्वक आणि 'वेळेवरच' होणं महत्त्वाचं...हो नं?


ता.क. इलेक्ट्रिशियनला मराठी प्रतिशब्द काय आहे, मला माहिती नाही. जाणकारांनी मार्गदर्शन करावं.


भेटुया.......


सौ. भारती महाजन-रायबागकर, चेन्नई

bharati.,raibagkar@gmail.com

9763204334

Thursday, May 27, 2021

23 आधुनिक बलुतेदार

 *23*  *आधुनिक बलुतेदार*


आपले माळीबुवा आजकाल चलती असलेले आणखी एक काम पण छान करतात बरं... *बोनसाय* ! या जपानी कलेने भारतातही आता छान बाळसं धरलं आहे. बोगनवेल, वड, पिंपळ, लिंबू, संत्री इत्यादींची ही  फळाफुलांनी लगडलेली, देखणी, कमी उंचीची झाडं पाहिली कीं ती पाहून प्रसन्न व्हावं कीं मुद्दाम वाढवून त्यांच्यात कृत्रिम रीत्या परिपूर्णता आणलेली पाहून खंत करावी…? कालाय तस्मै नमः!


पण आतां माळ्याअभावी बाग सुकत चालली असेल आणि आपल्यालाच मातीत हात घालावे लागले असतील तर, चिखल तर लागणारच ना! कपडे बदलण्यासाठी कपाट ऊघडावे तर कपाटातील नवे कपडे आपल्या सहवासा अभावी मलुल झाल्यासारखे वाटतात. आणि घालुन जाणार तरी कुठं? पण घ्यावेसे तर वाटतात, फार दिवस झाले ना नवीन कपड्यांची खरेदी करून... म्हणूनच आपल्याकडे कपडे घेऊन आलाय आजचा बलुतेदार...


            *कापड दुकानदार*


पूर्वी बऱ्याश्या गांवातच एखादं कपड्याचं दुकान असायचं. छोट्या खेड्यात तर नाहीच. लोकांचा पोशाखही धोतर आणि बंडी किंवा शर्ट, नऊवारी लुगडं, चोळी किंवा झंपर, मुलांना हाफ चड्डी आणि शर्ट, मुलींना झगा किंवा परकर पोलकं, बास्स...


एखादा शेतकरी आठवडी बाजाराला गेला की गरजेनुसार, आपल्या पसंतीनं कपडे घेऊन यायचा, तेही एखाद्या मोठ्या सणालाच...


शहरांत दुकानं जास्त असायची, 'अनुभव हीच खात्री' झाल्यावर एखादं स्वस्त आणि त्यांतल्या त्यांत मस्त दुकान नेहमीसाठी ठरवल्या जायचं. पुष्कळदा हा व्यवहार उधारीवर ह्वायचा. मग शाळा सुरू झाली की गणवेश आणि सण आला कीं नवीन कपडे वडीलधाऱ्यांसोबत खरेदी करायला दुकानांत जायचं. मुलींसाठी फुलाफुलांचं डिझाईन असलेलं कापड, आणि मुलांसाठी चौकडा, प्लेन, लाइनिंग हे पॅटर्न ठरलेलं असायचं. त्याच्या विरुद्ध म्हणजे मुलांसाठी फुलांफुलांचे किंवा मुलींसाठी चौकड्याचे कपडे... तोबा, तोबा! एकदा कपड्यांची पसंती झाली कीं... (पोत, रंग आणि भाव पाहून मोठ्यांनी ठरवलेली,) मापानुसार सरसकट सर्व मुलांसाठी आणि मुलींसाठी ठरल्याप्रमाणे एकाच ताग्यातून कपडे घेतल्या जात. आणि ते शिवुन आल्यावर अंगात घातले की ही एकाच घरची मुलं आहेत हे आपणांस समजून येई. (त्यावेळी त्यांना बँड पार्टी वगैरे कोणी म्हणत नसत. )खरं म्हणजे आतां पती-पत्नी आणि मुलं फॅशन म्हणून, मुद्दाम ठरवून, एकाच रंगाचे कपडे घालतात...मग! ड्रेसकोड म्हणतात म्हणे त्याला...


आता तर दुकानांचे स्वरूपच बदलले. मोठ-मोठी किमान दोन-तीन मजली दुकानं...छे, शोरूम्स उभ्या राहिल्या. डिस्प्ले साठी दर्शनी भागांत फॅशननुसार कपडे टांगल्या जाऊ लागले. प्रत्यक्ष कल्पना यावी म्हणून माणसांएवढ्या पुतळ्यांच्या अंगावर ते परिधान केले जाऊ लागले. स्त्रियांचे, पुरुषांचे आणि मुलांचे प्रत्येक कपड्यांच्या प्रकारानुसार, आजकालच्या फँशननुसार ( ती तर काय, दर बारा कोसावर बदलणाऱ्या भाषेपेक्षाही वेगाने बदलते) वेगवेगळे विभाग तयार झाले. 


आणि अशा भव्य दुकानांत प्रवेश करताक्षणी, मालक ज्या अगत्याने, तोंड भरून आपले स्वागत करतो त्याला तोड नाही. “ या, या ताई, फार दिवसांनी आलात, अरे, ताईंना काय पाहिजे बघ बरं” असं जेव्हां तो फर्मावतो, तेव्हां मागच्याच महिन्यांत जाता जाता सहजच डिस्प्ले मध्ये ठेवलेली साडी आवडली म्हणून आपण खरेदी केली होती हे आपण विसरूनच जातो. आणि यानंतर जेव्हां 'या डिझाईन मध्ये दुसरा रंग आहे कां किंवा हा रंग  चांगला आहे पण काठ जरा नाजुक पाहिजे होता, किंवा नव्या फॅशनची, वेगळी दाखवा नं' अशा संवयीच्या चिकित्सक प्रश्नांना ( तुम्ही फॅक्टरीतुनच पाहिजे तशी साडी करून घ्या मॅडम हे ओठावर आलेले उत्तर) बाजूला सारून जेव्हा सेल्समन हसऱ्या मुद्रेनं, न कंटाळता आपल्यासमोर साड्यांचा ढीग लावतो तेव्हां तर आपण कोणी 'व्ही.आय.पी' असल्याचा भास होतो. पण तरीही आपण प्रसन्न न होतांच 'नको आज' असं म्हणत ऊठलो,  तर...'अरे, तो कालच माल आला आहे, त्यांतल्या साड्या दाखवा बरं ताईंना,' या मालकाच्या आज्ञेनुसार  तो जेव्हां त्यांतल्या साड्या काढून आणतो, तेव्हां तर आपण 'व्ही. व्ही.आय.पी, आणि तो  सेल्समन संयम, चिकाटीची कठीण परीक्षा 1 ल्या नंबरने ऊत्तीर्ण झालेला, 'कर्मण्येवाधिकारस्ते, मा फलेषु कदाचन' या उक्तीचं तंतोतंत पालन करणारा कोणी स्थितप्रज्ञ, संत-महंत  असावा असंच वाटतं. 


रेडिमेड कपड्यांच्या दुकानाची हीच गत. आज काल ड्रेसचे तरी किती विविध प्रकार, इंडियन, वेस्टर्न...पूर्वी पंजाबी ड्रेस  ही फॅशनची परमावधी होती.  आता साडी वरच्या ब्लाऊजचेच इतके प्रकार असतात, ड्रेस मध्ये तर सलवार कमीज, चनिया चोली, जीन्स-टाँप यापलीकडे माझ्या कल्पनेची धाव नाही जात.


 एखादा ड्रेस आवडला तर रंग दुसरा हवा, आणि रंग आवडला तर तो ओल्ड फँशनचा असतो. कधी दोन्हींचं सूत्र जमलं तर तो आपल्या मापाला येत नाही. (आणि मग आपण आपलं वजन कमी करण्याची भीष्मप्रतिज्ञा करतो, मनांतल्या मनांत )


'एक नंबर आदमी, दस...अहं...सौ नूर कपडा' हे वचन अक्षरश: सार्थ ठरवण्याच्या जमान्यांत कपाट आपल्या कपड्यांनी कितीही ओसंडून वाहत असलं तरी नवा 'नूर' असलेला कपडा आपल्या वॉर्डरोबमध्ये हवाच... कीं.........


सौ. भारती महाजन- रायबागकर चेन्नई

bharati.raibagkar@gmail.com

9763204334